Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अक्षय तृतीयेच्या दिवशी होणारे; बालविवाह रोखण्यासाठी प्रशासन सज्ज

अमरावती : अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्ताच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यात बालविवाह होण्याची शक्यता लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे.

लोकसहभागातून जलक्रांती! बालमटाकळीत ९६० मीटर लांबीच्या बंधाऱ्याचे खोलीकरण सुरू
भेंडवळची घट मांडणी: यंदा कापूस अन् ज्वारीला सोन्याचे दिवस; तर राजा कायम राहील मात्र तणावात
भेंडवळच्या भविष्यावरून अंनिसचे खुले आव्हान;श्याम मानव यांनी जाहीर केले 80 लाखांचे बक्षीस

अमरावती : अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्ताच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यात बालविवाह होण्याची शक्यता लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे. बालविवाह लावणार्‍यांविरुद्ध थेट कारावासाची कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा प्रशासनाने दिला आहे. जिल्हा महिला व बाल विकास विभागाच्या पुढाकारातून शहरासह ग्रामीण भागात व्यापक जनजागृती मोहीम राबवण्यात येत आहे. या मोहिमेचा उद्देश बालविवाह हा केवळ सामाजिक प्रश्‍न नसून गंभीर व दखलपात्र गुन्हा आहे, याची जाणीव सर्व स्तरांपर्यंत पोहोचवणे हा आहे.
बालविवाह प्रतिबंधक कायदा 2006 नुसार अठरा वर्षांखालील मुलगी किंवा एकवीस वर्षांखालील मुलगा यांच्या विवाहाला कायदेशीर मान्यता नाही. अशा विवाहात सहभागी होणारे पालक, नातेवाईक, विवाह लावणारे पुजारी तसेच आयोजनात सहभागी असलेली कोणतीही व्यक्ती यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. बालविवाह रोखण्यासाठी ग्रामस्तरापासून शहरापर्यंत यंत्रणा सक्रिय करण्यात आली आहे. ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका, पोलीस पाटील, शाळा प्रशासन आणि स्वयंसेवी संस्थांच्या समन्वयातून विशेष देखरेख ठेवली जाणार आहे. जिल्ह्यातील सर्व संबंधित यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले असून संशयास्पद हालचालींवर तातडीने कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. बालविवाह होत असल्याची माहिती मिळाल्यास त्वरित मदत क्रमांक 1798 वर संपर्क साधावा किंवा स्थानिक प्रशासनाला कळवावे, असे आवाहन करण्यात आले आहे. माहिती देणार्‍याची ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवली जाईल, अशी खात्री अधिकार्‍यांनी दिली आहे. अक्षय तृतीया हा साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक मानला जातो. या दिवशी मोठ्या प्रमाणावर विवाह सोहळे पार पडत असल्याने काही जण अज्ञान, अंधश्रद्धा आणि सामाजिक दबावामुळे बालविवाह घडवून आणतात. अनेक विवाहांमध्ये हे प्रकार लक्षात येणार नाहीत, असा गैरसमज करून काही जण कायद्याला चुकवण्याचा प्रयत्न करतात. काही प्रकरणांत मुलगा किंवा मुलीचे वय माहीत नसल्याचे कारण पुढे केले जाते; मात्र अशा सबबी ग्राह्य धरल्या जाणार नाहीत, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. बालविवाह रोखण्यासाठी यंदा प्रथमच इतक्या व्यापक पातळीवर कठोर पावले उचलण्यात आली असून, संपूर्ण जिल्ह्यात सतर्कता वाढवण्यात आली आहे. समाजानेही या मोहिमेला सहकार्य करून बालविवाहास आळा घालावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

COMMENTS