Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महाराष्ट्राचे मनोरंजनातून प्रबोधन करणारे असुरक्षित का?

     महाराष्ट्राची लोकसंस्कृती ही विविधरंगी आणि सशक्त परंपरांनी समृद्ध आहे. या परंपरेत तमाशा ही कला केवळ करमणुकीचे साधन नसून जनजाग

दखल – जन सुरक्षा कायदा जनविरोधी नाही !
न्यायालयाचा माहिती आयुक्तांना दणका !
ग्रामपंचायत जिंकण्याचा पक्षीय दावा चूकीचा ! 
The current image has no alternative text. The file name is: dakhal-2-1-1-1-1-1.png

     महाराष्ट्राची लोकसंस्कृती ही विविधरंगी आणि सशक्त परंपरांनी समृद्ध आहे. या परंपरेत तमाशा ही कला केवळ करमणुकीचे साधन नसून जनजागृतीचा प्रभावी मंच म्हणून उभी राहिला आहे. ग्रामीण भागातील सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक प्रश्नांना थेट भिडण्याचे सामर्थ्य तमाशात आहे. म्हणूनच तमाशा ही लोकांच्या भावना, वेदना आणि आशा यांची अभिव्यक्ती मानली जाते.

या कलेला आकार देणारे अनेक दिग्गज कलावंत महाराष्ट्राने पाहिले आहेत. विठाबाई नारायणगावकर यांचे नाव घेतल्याशिवाय तमाशाचा इतिहास पूर्ण होत नाही. त्यांच्या लावण्यांतील ठसकेबाजपणा, आवाजातील ताकद आणि सादरीकरणातील आत्मविश्वास यांनी तमाशाला एक वेगळे स्थान मिळवून दिले. त्यांनी स्त्री कलाकारांच्या सन्मानासाठीही मोठा संघर्ष केला.

दत्ता महाडिक हे तमाशातील विनोदी आणि सामाजिक भाष्य करणारे प्रभावी कलाकार होते. त्यांच्या सोंगाड्या भूमिकेतून त्यांनी समाजातील विसंगतींवर नेमके बोट ठेवले. प्रेक्षकांना हसवतानाच विचार करायला भाग पाडणे, हे त्यांच्या कलेचे वैशिष्ट्य होते. अशा या समृद्ध परंपरेच्या पार्श्वभूमीवर, तमाशा कलावंतांना भररस्त्यात मारहाण केली जाणे ही अत्यंत संतापजनक आणि लाजिरवाणी घटना आहे. ज्या कलावंतांनी आयुष्यभर समाजाचे प्रबोधन केले, त्यांनाच अशा प्रकारे अपमानित करणे हे आपल्या समाजातील दुटप्पीपणाचे द्योतक आहे. महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा ही केवळ इतिहासाच्या पानांत बंदिस्त नाही, तर ती आजही लोककला, लोकपरंपरा आणि जनतेच्या भावविश्वातून जीवंत आहे. तमाशा, जलसा, भारूड, कीर्तन ही केवळ मनोरंजनाची साधने नसून समाजप्रबोधनाची प्रभावी माध्यमे राहिली आहेत. विशेषतः तमाशाने ग्रामीण आणि बहुजन समाजात विचारांची जागृती घडवून आणण्याचे कार्य केले आहे. अशा या तमाशा कलेला अलीकडेच पद्मश्री पुरस्काराद्वारे सन्मानित करण्यात आले. रघुवीर खेडकर यांचा गौरव हा केवळ एका कलावंताचा नव्हे, तर संपूर्ण परंपरेचा सन्मान होता.

परंतु, या गौरवाच्या छायेतच घडलेली एक घटना आपल्या समाजाच्या मानसिकतेवर प्रश्नचिन्ह उभे करते. तमाशा कलावंतांना भररस्त्यात मारहाण केली जाणे ही केवळ गुन्हेगारी घटना नाही; ती आपल्या सामाजिक अधःपतनाची लक्षणे आहेत. ज्या कलावंतांनी आयुष्यभर समाजाला विचार दिले, मनोरंजनाच्या माध्यमातून अन्यायावर बोट ठेवले, त्यांनाच अशा प्रकारे अपमानित करणे ही अत्यंत संतापजनक बाब आहे. यामागे केवळ काही व्यक्तींचा गुंडगिरीचा प्रकार म्हणून पाहणे धोकादायक ठरेल. ही घटना आपल्या समाजात अजूनही खोलवर रुजलेल्या सरंजामी मानसिकतेचे प्रतिबिंब आहे. कला आणि कलावंतांकडे आजही दुय्यम नजरेने पाहिले जाते. तमाशा म्हटले की काही लोकांच्या मनात कमीपणाची भावना निर्माण होते—हीच मानसिकता अशा हिंसक कृत्यांना खतपाणी घालते. प्रत्यक्षात, तमाशा ही लोकशिक्षणाची विद्यापीठे आहेत, जिथे समाजातील प्रश्नांवर थेट भाष्य केले जाते.

आज प्रश्न केवळ एका घटनेचा नाही, तर मूल्यांचा आहे. आपण खरोखरच कला आणि कलाकारांचा सन्मान करतो का, की केवळ पुरस्कार आणि गौरव सोहळ्यांपुरतेच ते मर्यादित ठेवतो, हा प्रश्न उभा राहतो. जर राज्य सरकार आणि समाज या दोघांनीही याबाबत गांभीर्याने विचार केला नाही, तर अशा घटना पुन्हा पुन्हा घडत राहतील.

राज्य सरकारने या प्रकरणात कठोर आणि तातडीची कारवाई करणे अत्यावश्यक आहे. दोषींवर केवळ गुन्हा दाखल करून भागणार नाही, तर त्यांना कठोर शिक्षा होणे गरजेचे आहे, जेणेकरून भविष्यात कोणीही कलावंतांवर हात उचलण्याचे धाडस करणार नाही. त्याचबरोबर, कलावंतांच्या सुरक्षेसाठी ठोस धोरण आखणेही तितकेच महत्त्वाचे आहे.

पण केवळ शासनाकडे बोट दाखवून आपण मोकळे होऊ शकत नाही. समाज म्हणून आपलीही जबाबदारी आहे. आपण आपल्या दैनंदिन व्यवहारात, विचारांत आणि भाषेतून कलावंतांविषयी आदर व्यक्त केला पाहिजे. मुलांना आणि पुढच्या पिढीला या लोककलांचे महत्त्व समजावून सांगितले पाहिजे. कारण, जे समाज आपल्या कलाकारांचा सन्मान करत नाहीत, ते समाज सांस्कृतिकदृष्ट्या कधीच समृद्ध होऊ शकत नाहीत. ही घटना आपल्याला जागे करणारी आहे. ती केवळ निषेध करण्यापुरती मर्यादित न ठेवता, आपल्या विचारांत आणि कृतीत बदल घडवून आणण्याची गरज आहे. तमाशा हा केवळ रंगमंचावरचा खेळ नाही; तो आपल्या समाजाचे आरसे आहे. त्या आरशावर दगड मारणाऱ्यांना थांबवणे हीच खरी प्रबोधनाची सुरुवात ठरेल.

COMMENTS