नांदेड : नांदेड शहरासह जिल्ह्यातील अनेक भागांना 30 मार्चच्या मध्यरात्री अवकाळी पावसाने जोरदार झोडपले. दिवसभर वाढलेल्या कडक उन्हामुळे त्रस्त झालेल

नांदेड : नांदेड शहरासह जिल्ह्यातील अनेक भागांना 30 मार्चच्या मध्यरात्री अवकाळी पावसाने जोरदार झोडपले. दिवसभर वाढलेल्या कडक उन्हामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना या पावसामुळे काही काळ दिलासा मिळाला असला, तरी त्यानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीने नागरिकांच्या अडचणीत भर टाकली. अचानक आलेल्या जोरदार वार्यासह पावसामुळे अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या तुटल्या, तर काही भागात वीजपुरवठा खंडित झाला.
वजिराबाद, शिवाजीनगर, श्रीनगर ,भाग्यनगर, तरोडा नाका तसेच ग्रामीण भागातील काही गावांमध्ये रात्री उशिरापर्यंत वीज नसल्याने नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले. उष्णतेचा पारा दिवसेंदिवस चढत असताना, वीज खंडित झाल्याने घरातील पंखे व थंडावा देणारी साधने बंद पडली. परिणामी, उकाडा आणि वाढलेला डासांचा त्रास यामुळे नागरिकांची झोप उडाली. दरम्यान, या अवकाळी पावसाचा फटका शेतकर्यांनाही बसला आहे. जिल्ह्यातील अनेक भागात आंबा बागांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. जोरदार वार्यामुळे कच्च्या आंब्यांची गळ झाली असून, फळबाग धारक शेतकर्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. आधीच बदलत्या हवामानामुळे चिंतेत असलेल्या शेतकर्यांसाठी हा पाऊस आणखी संकट घेऊन आला आहे. महावितरण विभागाने काही भागात वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू केल्याचे सांगितले आहे. तरीही काही ठिकाणी दुरुस्तीचे काम सुरू असल्याने वीजपुरवठा उशिराने पूर्ववत होण्याची शक्यता आहे. अवकाळी पावसामुळे तात्पुरता दिलासा मिळाला असला, तरी त्याचे परिणाम मात्र नागरिक आणि शेतकरी दोघांसाठीही चिंताजनक ठरत आहेत. प्रशासनाने तत्काळ उपाययोजना करून वीजपुरवठा आणि नुकसानग्रस्त शेतकर्यांना मदत देण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

COMMENTS