अहिल्यानगर : स्वयंघोषित ‘कॅप्टन’ म्हणून ओळख निर्माण करून भोंदूगिरीच्या माध्यमातून अनेकांना जाळ्यात ओढणारा अशोक खरात आता आंतरराष्ट्रीय आर्थिक व्यव

अहिल्यानगर : स्वयंघोषित ‘कॅप्टन’ म्हणून ओळख निर्माण करून भोंदूगिरीच्या माध्यमातून अनेकांना जाळ्यात ओढणारा अशोक खरात आता आंतरराष्ट्रीय आर्थिक व्यवहारांच्या संशयात सापडला आहे. त्याच्या कारवायांची व्याप्ती राज्याच्या सीमांपलीकडे गेल्याचे स्पष्ट होत असून, काळा पैसा परदेशात पाठवण्यासाठी हवाला मार्गाचा वापर केल्याची धक्कादायक माहिती विशेष तपास पथकाच्या हाती लागली आहे.
तपास यंत्रणांकडून मिळालेल्या माहितीनुसार, खरातच्या आर्थिक व्यवहारांचे धागेदोरे थेट दुबईपर्यंत पोहोचले आहेत. देशातून परदेशात आणि पुन्हा परदेशातून देशात मोठ्या प्रमाणावर पैशांची देवाणघेवाण करण्यात येत होती. या व्यवहारांसाठी खासगी एजंट्स, बेकायदेशीर मार्ग आणि बनावट नोंदींचा वापर केल्याचे प्राथमिक पुराव्यांवरून समोर येत आहे. विशेष म्हणजे, या संपूर्ण जाळ्याला काही प्रभावशाली व्यक्तींचे पाठबळ मिळाल्याचा संशय व्यक्त होत आहे. काही राजकीय क्षेत्रातील व्यक्ती, प्रभावी भक्तगट आणि काही भ्रष्ट शासकीय अधिकारी यांच्या मदतीमुळेच हा आर्थिक व्यवहार दीर्घकाळ निर्बंधांशिवाय सुरू राहिला, अशी चर्चा तपासाच्या वर्तुळात आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित व्यक्तींची भूमिकाही तपासली जाण्याची शक्यता आहे. विशेष तपास पथकाला खरातच्या व्यवहारांशी संबंधित डायर्या, डिजिटल माहिती आणि बँक व्यवहारांचे तपशील हाती लागले आहेत. या पुराव्यांच्या आधारे प्रकरण केवळ आर्थिक गुन्ह्यापुरते मर्यादित न राहता परकीय चलन विनिमय नियमांचे उल्लंघन झाल्याच्या दिशेनेही तपास सुरू आहे. प्रकरणाची व्याप्ती वाढत असल्याने सक्तवसुली यंत्रणाही या तपासात सहभागी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
या प्रकरणाने केवळ एका व्यक्तीच्या गैरकृत्यांचा प्रश्न उपस्थित केला नाही, तर अंधश्रद्धा, आर्थिक गैरव्यवहार आणि प्रभावशाली साखळ्यांचा संभाव्य संगनमत यांचेही गंभीर चित्र समोर आणले आहे. त्यामुळे या प्रकरणाचा तपास अधिक व्यापक आणि सखोल होण्याची गरज व्यक्त होत आहे.
हेल्पलाईनवर 100 हून अधिक तक्रारी प्राप्त
खरातच्या भोंदूगिरीविरोधात स्थापन करण्यात आलेल्या विशेष तपास पथकाच्या हेल्पलाइनवर तक्रारींचा ओघ वाढत आहे. आतापर्यंत शंभरहून अधिक तक्रारी प्राप्त झाल्या असून, त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर महिलांचा समावेश आहे. अनेक तक्रारदारांनी फोनवरून आपली व्यथा मांडली असली, तरी प्रत्यक्ष लेखी तक्रार देण्यास मात्र काहीजण पुढे येत नसल्याचे दिसून येत आहे. तक्रारदारांमध्ये भीतीचे वातावरण असल्याची बाबही समोर आली आहे. सामाजिक बदनामीची भीती, तसेच आरोपीच्या प्रभावामुळे अनेकजण मागे हटत असल्याचे संकेत आहेत. ही स्थिती लक्षात घेऊन तपास पथकाने तक्रारदारांना पूर्ण सुरक्षिततेची हमी देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. अधिकाधिक लोकांनी पुढे येऊन माहिती द्यावी, यासाठी संवाद आणि विश्वासार्हता निर्माण करण्यावर भर दिला जात आहे.
8 बलात्काराचे 2 फसवणुकीचे गुन्हे दाखल
अशोक खरात याच्याविरोधात आतापर्यंत सरकारवाडा पोलिसात एकूण 10 गुन्हे दाखल झाले आहेत. त्यातील 2 आर्थिक फसवणुकीचे आणि 8 महिला अत्याचाराचे गुन्हे आहेत. राजेंद्र जासूद आणि राजेंद्र भागवत यांनी आर्थिक फसवणुकीचे गुन्हे दाखल केले आहेत. भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणात पीडित महिलांचे व्हिडिओ व्हायरल करणार्यांचा विरोधात पोलिसांकडून मोठी कारवाई सुरु करण्यात आली आहे. सायबर पोलिसांनी नव्याने 65 जणांवर गुन्हे दाखल केले आहेत.

COMMENTS