कोपरगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने रविवारी (दि. २९) आयोजित राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवनाच्या भूमिपूजन व विविध विकास कामांच्या ल

कोपरगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने रविवारी (दि. २९) आयोजित राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवनाच्या भूमिपूजन व विविध विकास कामांच्या लोकार्पण सोहळ्यावर उपसभापती व काही संचालकांनी बहिष्कार टाकल्याची माहिती प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आली आहे.
प्रसिद्धीपत्रकात नमूद केल्याप्रमाणे, दुपारी १.३० वाजता होणारा हा कार्यक्रम राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री ना. जयकुमार रावल यांच्या हस्ते आयोजित करण्यात आला आहे. मात्र निमंत्रण पत्रिकेत जिल्ह्याचे पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा प्रोटोकॉलनुसार नामोल्लेख करण्यात आलेला नाही. तसेच माजी आमदार अशोकराव काळे यांचा ज्येष्ठतेनुसार उल्लेख न करता औपचारिकरीत्या नको त्या ठिकाणी नाव देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.
याशिवाय, कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी असलेल्या मंत्री रावल यांनाही नियोजनाबाबत अनभिज्ञ ठेवण्यात आल्याचे पत्रकात नमूद करण्यात आले आहे. उपसभापती व विद्यमान सदस्यांना विश्वासात न घेता राजकीय हेतूने सत्तेचा गैरवापर करून बाजार समितीचे सभासद, शेतकरी, व्यापारी, हमाल व मापाडी यांची दिशाभूल करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर सदर कार्यक्रमाचा निषेध नोंदवून उपसभापती व संचालकांनी जाहीर बहिष्कार टाकत असल्याचे स्पष्ट केले आहे.
दरम्यान, या निषेधासंदर्भातील लेखी पत्र पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री जयकुमार रावल, आमदार आशुतोष काळे, जिल्हा उपनिबंधक कार्यालय अहिल्यानगर, सहायक निबंधक कार्यालय कोपरगाव, सचिव कृषी उत्पन्न बाजार समिती, जिल्हा परिषद सदस्य राजेश परजणे तसेच शिवसेना नेते नितीन औताडे यांना पाठविण्यात आले आहे.
या पत्रावर उपसभापती गोवर्धन परजणे तसेच संचालक संजय माधवराव शिंदे, राजेंद्र शंकरराव निकोले, रामदास भिमाजी केकाण, शिवाजीराव बापूराव देवकर, ऋषिकेश मोहनराव सांगळे, खंडू पुंजाबा फेपाळे, लक्ष्मणराव विश्वनाथ शिंदे यांच्या सह्या आहेत.

COMMENTS