Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ज्येष्ठांना न्याय द्या, अन्यथा आंदोलन-डॉ. हंसराज वैद्य

नांदेड : राज्यात सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नागरिकांच्या प्रलंबित प्रश्नांकडे शासनाने तातडीने लक्ष देण्याची गर

अफवांना पूर्णविराम : नांदेड जिल्ह्यात पेट्रोल-डिझेलचा मुबलक साठा; नागरिकांनी घाबरू नये – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
पीपल्स कॉलेज प्राचार्य निवड प्रक्रियेला ‘ब्रेक’; घाईगडबडीच्या निर्णयावर पडदा, एप्रिलमध्ये मुलाखती
नांदेड-बिदर आणि बोधन-लातूर रेल्वे प्रकल्पांना गती द्या; राज्यसभेत डॉ. अजित गोपछडे यांची मराठवाड्यातील प्रलंबित प्रकल्पांवर जोरदार मागणी

नांदेड : राज्यात सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नागरिकांच्या प्रलंबित प्रश्नांकडे शासनाने तातडीने लक्ष देण्याची गरज व्यक्त करत, ज्येष्ठ नागरिक संघ फेडरेशनचे उत्तर मराठवाडा प्रादेशिक विभागाचे (फेस्कॉम) अध्यक्ष डॉ. हंसराज वैद्य यांनी तीव्र भूमिका मांडली आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या मानधनासह विविध प्रलंबित मागण्यांवर त्वरित निर्णय न झाल्यास राज्यभर आंदोलन उभारण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
डॉ. वैद्य यांनी सांगितले की, विधानमंडळाच्या अधिवेशनात अनेक आमदारांनी ज्येष्ठ नागरिकांच्या प्रश्नांची गंभीरता अधोरेखित केली आहे. नाशिक येथे पार पडलेल्या 35 व्या राज्यस्तरीय ज्येष्ठ नागरिक अधिवेशनात सर्वानुमते ज्येष्ठांच्या मागण्यांचा ठराव मंजूर करून तो शासन दरबारी सादर करण्यात आला आहे. या अधिवेशनात उपस्थित असलेल्या मंत्र्यांनीही ज्येष्ठांच्या प्रश्नांची गांभीर्याने दखल घेत, मंत्रिमंडळात त्यावर सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, अद्यापही या मागण्यांबाबत ठोस कार्यवाही झालेली नसल्याची खंत व्यक्त करत डॉ. वैद्य म्हणाले की, राज्यातील 36 जिल्ह्यांतून आलेल्या सुमारे चार हजार ज्येष्ठ नागरिक प्रतिनिधींनी या अधिवेशनात सहभाग घेतला होता. या सर्वांच्या अपेक्षा शासनाकडून उंचावल्या असून, त्यांची पूर्तता होणे आवश्यक आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना सन्मानपूर्वक जीवन जगता यावे यासाठी मानधन योजना आणि इतर कल्याणकारी उपाययोजना तातडीने राबविण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उद्देशून त्यांनी नम्र आवाहन केले की, ज्येष्ठ नागरिकांच्या प्रश्नांकडे सहानुभूतीने पाहून त्वरित निर्णय घ्यावेत. अन्यथा, वाढत्या उन्हाच्या पार्श्वभूमीवरही ज्येष्ठ नागरिकांना रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडावे लागेल, अशी परिस्थिती निर्माण होईल. यावेळी त्यांनी शासनाला इशारा देताना स्पष्ट केले की, आंदोलनाच्या काळात जर कोणत्याही ज्येष्ठ नागरिकाच्या जीवितास धोका निर्माण झाला, तर त्याची संपूर्ण जबाबदारी राज्य शासनावर राहील. त्यामुळे वेळ न दवडता ज्येष्ठांच्या मागण्यांवर सकारात्मक आणि ठोस निर्णय घेणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. राज्यातील ज्येष्ठ नागरिकांच्या प्रश्नांकडे शासनाचे दुर्लक्ष होत असल्याची खंत व्यक्त करत, त्यांच्या सन्मानपूर्वक जगण्याच्या हक्कासाठी आता निर्णायक लढ्याची हाक दिली जात आहे. आयुष्यभर समाजासाठी योगदान दिलेल्या या ज्येष्ठांना आज मानधनासारख्या मूलभूत मागण्यांसाठी रस्त्यावर उतरावे लागणे ही अत्यंत वेदनादायक बाब आहे. वाढत्या वयातही अन्यायाविरोधात उभे राहण्याची वेळ येणे हे शासनाच्या संवेदनशीलतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहे. त्यामुळे शासनाने सहानुभूतीने आणि तत्परतेने निर्णय घेत ज्येष्ठांना न्याय द्यावा, अन्यथा हा शांततेचा आवाज लवकरच आंदोलनात परिवर्तित होण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत. एकंदरीत, ज्येष्ठ नागरिकांच्या सन्मान आणि सुरक्षिततेसाठी शासनाने तातडीने पावले उचलावीत, अशी अपेक्षा व्यक्त करत डॉ. वैद्य यांनी आगामी काळात आंदोलन अधिक तीव्र करण्याचे संकेत दिले आहेत.
———-

COMMENTS