पाथर्डी : सततचा दुष्काळी व ऊसतोड मजुरांचा तालुका अशी ओळख असलेल्या तालुक्यात रोजगाराच्या संधी निर्माण व्हाव्यात यासाठी जुने बसस्थानक सार्वजनिक-खाजगी सहभाग तत्त्वावर विकसित करण्यात यावे अशी मागणी आमदार शिवाजीराव गर्जे यांनी परिवहन मंत्री प्रतापजी सरनाईक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. दिलेल्या निवेदनात गर्जे यांनी म्हटले आहे की, शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी ७२७६ चौरस मीटर क्षेत्रफळाचे जुने बसस्थानक आहे. सध्या या बसस्थानकाची मोठी दुरावस्था झाली आहे. बसस्थानकाच्या उत्तर-पूर्व कोपऱ्यात शेड उभारण्यात आले असले, तरी उर्वरित परिसर खड्ड्यांनी भरलेला असून संरक्षण भिंत नसल्याने खाजगी वाहने व मोकाट जनावरांचा वावर वाढून एसटी बस वाहतूक आणि प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. तालुक्यातील अनेक कुटुंबे आजही ऊसतोडणीसाठी स्थलांतर करतात. स्थानिक पातळीवर रोजगार नसल्याने बेरोजगारी वाढत आहे असून तरुणांना शहरांकडे धाव घ्यावी लागत आहे. बसस्थानकाचा विकास हा केवळ पायाभूत सुविधांचा प्रश्न नसून स्थानिक युवकांच्या भविष्याशी निगडित विषय आहे. बसस्थानकाचा सार्वजनिक-खाजगी सहभाग तत्त्वावर अथवा शासनाच्या योजनेंतर्गत विकास केल्यास आधुनिक सुविधा उपलब्ध होतील. दुकाने, व्यावसायिक गाळे व विविध सेवा व्यवसायांच्या माध्यमातून स्थानिक बेरोजगार तरुणांना मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण होतील. त्यामुळे शहराच्या वैभवात भर पडण्यासोबतच अनेक कुटुंबांच्या आयुष्यात स्थैर्य येऊ शकत असल्याने या महत्त्वपूर्ण प्रस्तावाला प्राधान्याने मंजुरी देऊन तातडीने कार्यवाही करावी, अशी विनंती निवेदनाच्या शेवटी गर्जे यांनी परिवहन मंत्र्यांकडे केली आहे.

पाथर्डी : सततचा दुष्काळी व ऊसतोड मजुरांचा तालुका अशी ओळख असलेल्या तालुक्यात रोजगाराच्या संधी निर्माण व्हाव्यात यासाठी जुने बसस्थानक सार्वजनिक-खाजगी सहभाग तत्त्वावर विकसित करण्यात यावे अशी मागणी आमदार शिवाजीराव गर्जे यांनी परिवहन मंत्री प्रतापजी सरनाईक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
दिलेल्या निवेदनात गर्जे यांनी म्हटले आहे की, शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी ७२७६ चौरस मीटर क्षेत्रफळाचे जुने बसस्थानक आहे. सध्या या बसस्थानकाची मोठी दुरावस्था झाली आहे. बसस्थानकाच्या उत्तर-पूर्व कोपऱ्यात शेड उभारण्यात आले असले, तरी उर्वरित परिसर खड्ड्यांनी भरलेला असून संरक्षण भिंत नसल्याने खाजगी वाहने व मोकाट जनावरांचा वावर वाढून एसटी बस वाहतूक आणि प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
तालुक्यातील अनेक कुटुंबे आजही ऊसतोडणीसाठी स्थलांतर करतात. स्थानिक पातळीवर रोजगार नसल्याने बेरोजगारी वाढत आहे असून तरुणांना शहरांकडे धाव घ्यावी लागत आहे. बसस्थानकाचा विकास हा केवळ पायाभूत सुविधांचा प्रश्न नसून स्थानिक युवकांच्या भविष्याशी निगडित विषय आहे. बसस्थानकाचा सार्वजनिक-खाजगी सहभाग तत्त्वावर अथवा शासनाच्या योजनेंतर्गत विकास केल्यास आधुनिक सुविधा उपलब्ध होतील.
दुकाने, व्यावसायिक गाळे व विविध सेवा व्यवसायांच्या माध्यमातून स्थानिक बेरोजगार तरुणांना मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण होतील. त्यामुळे शहराच्या वैभवात भर पडण्यासोबतच अनेक कुटुंबांच्या आयुष्यात स्थैर्य येऊ शकत असल्याने या महत्त्वपूर्ण प्रस्तावाला प्राधान्याने मंजुरी देऊन तातडीने कार्यवाही करावी, अशी विनंती निवेदनाच्या शेवटी गर्जे यांनी परिवहन मंत्र्यांकडे केली आहे.

COMMENTS