भोंदू खरातला असलेला राजाश्रय!

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भोंदू खरातला असलेला राजाश्रय!

ऐसे कैसे झाले भोंदू।कर्म करूनी म्हणती साधू॥अंगी लावुनिया राख।डोळे झाकुनिया करती पाप॥दाखवुनिया वैराग्याची कळा।भोगी विषयाचा सोहळा॥तुका म्हणे सांगो

अशोक खरात प्रकरणाचा दणका; मुख्यमंत्री फडणवीसांच्या आदेशानंतर रूपाली चाकणकर यांचा राजीनामा
राजकीय नेत्यांनी मर्यादा पाळल्या पाहिजेत : मंत्री छगन भुजबळ
भरधाव टेम्पोने साईभक्तांना चिरडले, एकाचा मृत्यू
The current image has no alternative text. The file name is: Agralekh-1.jpeg

ऐसे कैसे झाले भोंदू।
कर्म करूनी म्हणती साधू॥
अंगी लावुनिया राख।
डोळे झाकुनिया करती पाप॥
दाखवुनिया वैराग्याची कळा।
भोगी विषयाचा सोहळा॥
तुका म्हणे सांगो किती।
जळो तयाची संगती॥
संत तुकाराम महाराजांनी 16 व्या शतकातंच खरा साधू आणि भोंदू साधू यांच्यातील फरक स्पष्ट केला आहे. दाखवुनिया वैराग्याची कळा भोगी विषयाचा सोहळा, याचे तंतोतंत वर्णन संत तुकाराम महाराजांनी तब्बल साडेचारशे वर्षांपूर्वी केले होते. ते वर्णन साडेचारशे वर्षांनंतरही तंतोतंत लागू पडते. खरंतर संत तुकाराम महाराजांना इतक्या परखडपणे 16 व्या शतकांत या बाबी का मांडाव्या लागल्या, त्याचे प्रमुख कारण म्हणजे भारतीय समाज हा अज्ञानाच्या गर्तेत गेलेला होता. अंधश्रद्धा, भोंदू साधूंच्या आहारी गेला होता, त्या गर्तेतून समाजाला बाहेर काढण्यासाठी संत तुकाराम महाराजांनी परखड शब्दांमध्ये समाजाला संदेश देत भोंदू बाबांच्या आहारी न जाता आपले चांगले कर्म करण्याचा संदेश दिला होता. 16 व्या शतकांनंतर औद्योगिक क्रांतीचा उदय झाला, त्यातून यंत्रांचा शोध लागला, विज्ञान प्रगत होत गेले, त्यातून मानवी समाज आधुनिकेतच्या दिशेने पाऊल टाकत आज अंतराळात जाऊन पोहोचला, तरी देखील भारतीय समाजावर असलेला अंधश्रद्धेचा पगडा काही जाऊ शकलेला नाही.
नाशिक येथील तथाकथित कॅप्टन अशोक खरात याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्यानंतर आणि त्याच्यासंदर्भातील 58 पेक्षा अधिक महिलांशी संबंधित व्हिडिओ समोर आल्यानंतर हा भोंदू, मांत्रिकाने किती महिलांवर अत्याचार केला असेल, त्याची मोजदाद नाही, असेच चित्र आहे. मुळातच हा भोंदू बाबा अनेक महिलांवर अत्यावर करत असतांना, त्याला तेव्हाच वाचा का फुटली नाही, त्याचे प्रमुख कारण म्हणजे कॅप्टन खरातच्या मागे असलेला राजाश्रय. अनेक राजकीय नेते मंडळी, कॅप्टन खरातच्या आश्रमात जात होती, पूजा, पाठ करत होती. त्यामुळे साहजिकच या राजकीय नेत्यांनी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे कॅप्टन खरातला मदत केली असण्याची दाट शक्यता आहे. वास्तविक पाहता रूपाली चाकणकर यांना आपल्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. मात्र इतर नेत्यांचे काय? हा प्रश्‍न अनुत्तरित राहतोच. काही नेते, सहज त्यांना कुणी नेले असण्याची शक्यता नाकारता येत नाही, कॅप्टन खरातसोबत त्यांचे फोटो असले म्हणजे त्यांचा गुन्ह्यात संबंध आहे, असेही काही नाही. मात्र एकप्रकारे खरातला राजश्रय मिळत होता, हे सत्य नाकारता येत नाही. त्यामुळे सरकारी दरबारी त्याचे असलेले वजन, त्याची प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मदत करणारे राजकीय नेते मंडळी, यांची संपूर्ण चौकशी करण्याची गरज आहे.
मुळातच अशोक खरातची मुळची पार्श्‍वभूमी तपासली असता हा नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील मिरगाव येथील श्री ईशानेश्‍वर मंदिर ट्रस्टचा अध्यक्ष असून मर्चंट नेव्हीमधून निवृत्त झाला. त्यानंतर त्याने अंकशास्त्रज्ञ म्हणून भोंदूगिरी सुरू केली. तब्बल 154 देशांमध्ये केलेला प्रवास, तिथली इत्थंभूत माहितीच्या आधारे त्याने आपल्या भोंदूगिरीचा जम बसवल्याचे दिसून येत आहे. या आश्रमात सातत्याने राजकीय नेत्यांचा वावर, सेलिब्रेटींचा वावर सातत्याने दिसून येत होता. त्याचबरोबर त्याने या भोंदूगिरीच्या माध्यमातून कोट्यावधी रूपयांची मालमत्ता जमा केल्याचे दिसून येत आहे. अंकशास्त्र, भविष्यकथन आणि अंधश्रद्धेच्या नावाखाली उभे राहिलेले आर्थिक साम्राज्य ही आपल्या समाजातील एक चिंताजनक वस्तुस्थिती आहे. अलीकडे उघडकीस आलेल्या एका प्रकरणात संशयिताने सुमारे दोनशे कोटी रुपयांहून अधिक मालमत्ता जमवल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणाने केवळ आर्थिक गैरव्यवहाराचाच प्रश्‍न निर्माण केला नाही, तर समाजातील अंधश्रद्धा, प्रशासनातील संभाव्य संगनमत आणि कायद्याच्या अंमलबजावणीतील त्रुटी यांवरही गंभीर प्रश्‍नचिन्ह उभे केले आहे. या प्रकरणात विविध ठिकाणी जमिनी, बंगले, कार्यालये आणि शेतजमिनींचा मोठा पसारा असल्याचे दिसून येते. विशेषतः एका जिल्ह्यातील विविध भागांतच अनेक ठिकाणी संपत्ती एकवटलेली असल्याचे चित्र स्पष्ट होते. शेकडो एकर शेती, कोट्यवधींचे भूखंड आणि नातेवाईकांच्या नावावर असलेल्या मालमत्तांची गुंतागुंत ही केवळ आर्थिक साखळी नसून, ती नियोजनबद्ध पद्धतीने उभारलेली व्यवस्था असल्याचे संकेत देते. अधिक धक्कादायक बाब म्हणजे काही व्यवहारांमध्ये प्रशासकीय पदांशी संबंधित व्यक्तींच्या कुटुंबीयांची नावे समोर येत आहेत. यामुळे या प्रकरणाला केवळ फसवणूक किंवा भोंदूगिरीचा रंग राहत नाही, तर त्यात संभाव्य सत्ताधारी-संरक्षणाची छाया दिसू लागते. प्रशासनातील व्यक्ती आणि संशयित यांच्यातील संबंधांचा तपास अधिक सखोल होणे आवश्यक आहे. अन्यथा, जनतेचा शासन व्यवस्थेवरील विश्‍वास डळमळीत होण्याची भीती आहे. अशा प्रकारच्या प्रकरणांमध्ये एक महत्त्वाचा प्रश्‍न कायम राहतो – एवढ्या मोठ्या प्रमाणावर संपत्ती उभी राहत असताना यंत्रणा काय करत होती? आर्थिक व्यवहार, जमीन खरेदी-विक्री, कर विवरणे आणि स्थानिक प्रशासन यांचे जाळे इतके व्यापक असताना या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष कसे झाले? ही केवळ एका व्यक्तीची चूक मानून चालणार नाही; तर संपूर्ण यंत्रणेमधील शिथिलतेचे ते लक्षण आहे. समाजाच्या दृष्टीने पाहिले, तर या प्रकरणाचा सर्वात गंभीर पैलू म्हणजे अंधश्रद्धेचा वाढता प्रभाव. शिक्षण, विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगातही मोठ्या प्रमाणावर लोक भविष्यकथन, अंकशास्त्र आणि भोंदूगिरीवर विश्‍वास ठेवतात, ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही. या विश्‍वासाचा गैरफायदा घेत काही लोक आर्थिक आणि सामाजिक शोषण करतात. त्यामुळे केवळ कायदेशीर कारवाई पुरेशी नाही; तर समाजमन बदलण्याची गरज आहे. अंधश्रद्धा निर्मूलनासाठीचे कायदे अस्तित्वात असले तरी त्यांची प्रभावी अंमलबजावणी आवश्यक आहे. तसेच, अशा प्रकरणांमध्ये तक्रार करण्यासाठी पीडितांना सुरक्षित आणि विश्‍वासार्ह वातावरण मिळाले पाहिजे. अनेकदा सामाजिक दबाव, भीती किंवा अज्ञानामुळे लोक पुढे येत नाहीत. यामुळे अशा भोंदूगिरीला खतपाणी मिळते. यापुढे अशा घटनांना आळा घालण्यासाठी बहुआयामी उपाययोजना आवश्यक आहेत. आर्थिक तपास यंत्रणांनी अधिक दक्षता बाळगणे, जमिनींच्या व्यवहारांवर काटेकोर नजर ठेवणे, तसेच संशयास्पद व्यवहारांवर त्वरित कारवाई करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर, प्रशासनातील व्यक्तींच्या भूमिकेची निष्पक्ष चौकशी होणेही तितकेच महत्त्वाचे आहे. शेवटी, या प्रकरणातून एक स्पष्ट संदेश मिळतो – अंधश्रद्धा आणि भोंदूगिरी ही केवळ वैयक्तिक श्रद्धेची बाब नसून, ती समाज आणि अर्थव्यवस्थेसाठीही घातक ठरू शकते. त्यामुळे कायदा, प्रशासन आणि समाज या तिन्ही स्तरांवर सजगता आवश्यक आहे. अन्यथा, अशा सावटाखाली आणखी किती ‘साम्राज्ये’ उभी राहतील, याचा अंदाज बांधणे कठीण ठरेल.

COMMENTS