शेवगाव : तालुक्यात सध्या सणासुदीच्या पार्श्वभूमीवर अन्नपदार्थांच्या मागणीत मोठी वाढ झाली असून, त्याचबरोबर अन्नभेसळीचे प्रकारही वाढल्याची गंभीर बा

शेवगाव : तालुक्यात सध्या सणासुदीच्या पार्श्वभूमीवर अन्नपदार्थांच्या मागणीत मोठी वाढ झाली असून, त्याचबरोबर अन्नभेसळीचे प्रकारही वाढल्याची गंभीर बाब समोर येत आहे. विशेषतः दुधामध्ये मोठ्या प्रमाणात भेसळ होत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून पुढे येत असून, यामुळे सर्वसामान्यांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सणासाठी लागणाऱ्या दुधात पाणी तसेच इतर घातक रसायनांची भेसळ केली जात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासन विभागाकडून अपेक्षित ती कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
दरम्यान, संबंधित विभागातील अधिकाऱ्यांवर कार्यक्षमतेचा अभाव असल्याचे आरोप होत असून, “कर्मचारी कमी आहेत” ही नेहमीची कारणे पुढे केली जात असल्याची चर्चा आहे. काही नागरिकांनी तर दूध भेसळ प्रकरणात आर्थिक गैरव्यवहार व संगनमत असल्याचा गंभीर आरोपही केला आहे. याचबरोबर जिल्हा गुन्हे अन्वेषण विभागाकडूनही या प्रकाराकडे दुर्लक्ष होत असल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.
त्यामुळे संबंधित यंत्रणांनी तात्काळ संयुक्त कारवाई करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे. सणासुदीच्या काळात नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित मुद्द्यांवर तडजोड होऊ नये, यासाठी प्रशासनाने तत्परतेने पावले उचलणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त होत आहे.

COMMENTS