अहिल्यानगर : नाशिकमध्ये उघडकीस आलेल्या तथाकथित भोंदू मांत्रिक अशोक खरात प्रकरणात राज्य सरकारने सुरुवातीपासूनच गांभीर्याने लक्ष घातल्याचे महत्त्वप

अहिल्यानगर : नाशिकमध्ये उघडकीस आलेल्या तथाकथित भोंदू मांत्रिक अशोक खरात प्रकरणात राज्य सरकारने सुरुवातीपासूनच गांभीर्याने लक्ष घातल्याचे महत्त्वपूर्ण तपशील पुढे आले आहेत. उपलब्ध माहितीनुसार, या प्रकरणाची दखल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुमारे दोन आठवडे आधीच घेतली होती. त्यांनी प्रकरणाचे स्वरूप लक्षात घेऊन तातडीने पोलिसांना आवश्यक ती कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश दिले होते.
मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर राज्याच्या पोलीस यंत्रणेत तत्काळ हालचाल सुरू झाली. पोलीस महासंचालकांच्या नेतृत्वाखाली या प्रकरणाची सखोल चौकशी करत नियोजनबद्ध पद्धतीने कारवाईची रूपरेषा आखण्यात आली. त्यामुळे अलीकडे झालेली पोलिसांची कारवाई ही अचानक उचललेले पाऊल नसून, व्यवस्थित आखलेल्या रणनीतीचा भाग असल्याचे स्पष्ट होते. विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार, या प्रकरणातील महत्त्वाचे पुरावे आधीच गोळा करण्यात आले होते. आरोपीविरुद्धचे व्हिडिओ क्लिप्स, तसेच इतर संवेदनशील माहिती पोलिसांनी काळजीपूर्वक ताब्यात घेतली होती. या पुराव्यांच्या आधारे प्रकरण अधिक बळकट करण्यात आले आणि त्यानंतरच कठोर कारवाईची अंमलबजावणी करण्यात आली. राज्याच्या गृह विभागाने दिलेल्या आदेशानुसार, खरातविरोधात नाशिक शहर, नाशिक ग्रामीण आणि अहिल्यानगर जिल्ह्यात नोंदवलेले तीन स्वतंत्र गुन्हे आता एकत्रितपणे तपासले जाणार आहेत. यासाठी संबंधित सर्व पोलीस ठाण्यांना त्यांच्या ताब्यातील पुरावे, कागदपत्रे आणि जप्त साहित्य तातडीने विशेष तपास पथकाकडे सुपूर्द करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या पद्धतीमुळे तपास अधिक समन्वयाने आणि व्यापक पातळीवर होणार आहे. या प्रकरणात नोंदवलेल्या गुन्ह्यांचे स्वरूप अत्यंत गंभीर आहे. एका महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप, अश्लील चित्रफीत प्रसारित करण्याची धमकी देत मोठी खंडणी मागितल्याचा गुन्हा, तसेच वैयक्तिक छायाचित्रे सामाजिक माध्यमांवर प्रसारित केल्याचा आरोप अशा विविध प्रकारच्या गुन्ह्यांमुळे प्रकरणाची भीषणता स्पष्ट होते. या सर्व गुन्ह्यांच्या मुळाशी एक संगनमत किंवा जाळे कार्यरत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे
एसआयटीकडून खरातची दोन चौकशी
नाशिकसह संपूर्ण राज्यात खळबळ माजवणार्या स्वयंघोषित अंकशास्त्रज्ञ हायप्रोफाईल असलेल्या अशोक खरात प्रकरणी राज्य सरकारने विशेष तपास पथकाची अर्थात एसआयटीची स्थापना केली असून, या पथकाचे नेतृत्व आयपीएस अधिकारी तेजस्विनी साततपुते यांच्याकडे सोपवण्यात आले आहे. सातपुते यांनी गुरूवारी खरात याची दोन तास चौैकशी केल्याचे समोर आले आहे.
शिर्डी, नाशिकमध्ये तीन गुन्हे दाखल
अशोक खरात याच्यावर तीन वेगवेगळ्या पोलिस स्टेशनमध्ये तीन गुन्हे दाखल आहेत. नाशिकच्या सरकारवाडा पोलिस ठाण्यात एका 35 वर्षीय महिलेवर लैंगिक शोषण आणि बलात्काराचा आरोपाचा गुन्हा दाखल आहे. नाशिक ग्रामीणच्या वावी पोलिस ठाण्यात अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन 5 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल आहे. तर अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी पोलिस ठाण्यात पीडितेचे वैयक्तिक फोटो सोशल मीडियावर प्रसारित केल्याचा आरोपाचा गुन्हा दाखल असून 58 व्हिडिओप्रकरणात आणखी काही महिला पुढे येऊन गुन्हे दाखल करण्याची शक्यता आहे.

COMMENTS