Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

घाऊक महागाईचा वर्षभरातील उच्चांक महागाई 2.13 टक्क्यांवर ; अन्नधान्य व दैनंदिन वस्तूंचे दर वाढले

नवी दिल्ली : देशातील घाऊक महागाई दरात फेब्रुवारी महिन्यात वाढ नोंदवली गेली असून तो वर्षभरातील उच्चांकावर पोहोचला आहे. फेब्रुवारीमध्ये घाऊक महागाई

लष्कराच्या अधिकार्‍याला पोलिस ठाण्यात मारहाण
एक देश, एक निवडणुकीवर प्रश्‍नचिन्ह
महावितरणकडून थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याच्या कारवाईस वेग


नवी दिल्ली : देशातील घाऊक महागाई दरात फेब्रुवारी महिन्यात वाढ नोंदवली गेली असून तो वर्षभरातील उच्चांकावर पोहोचला आहे. फेब्रुवारीमध्ये घाऊक महागाई 2.13 टक्क्यांवर गेली असून गेल्या बारा महिन्यांतील ही सर्वाधिक पातळी मानली जात आहे. जानेवारी महिन्यात हा दर 1.81 टक्के होता, तर डिसेंबरमध्ये तो केवळ 0.83 टक्के होता. वाणिज्य मंत्रालयाने 16 मार्च रोजी ही अधिकृत आकडेवारी जाहीर केली.
महागाईत झालेली ही वाढ मुख्यत्वे अन्नधान्य, भाज्या, तसेच दैनंदिन वापराच्या वस्तूंच्या दरवाढीमुळे झाल्याचे निरीक्षण व्यक्त करण्यात येत आहे. प्राथमिक वस्तूंच्या दरवाढीचा परिणाम थेट घाऊक महागाईवर झाल्याचे दिसून येते. जानेवारीत 2.21 टक्के असलेला प्राथमिक वस्तूंचा महागाई दर फेब्रुवारीमध्ये वाढून 3.27 टक्क्यांवर गेला. खाद्यपदार्थांच्या किमतीतही लक्षणीय बदल झाला आहे. जानेवारीमध्ये अन्नवस्तूंचा दर घट दर्शवत होता; मात्र फेब्रुवारीमध्ये तो वाढून 1.85 टक्क्यांवर पोहोचला. धान्य, गहू, भाजीपाला आणि इतर आवश्यक अन्नपदार्थांच्या दरवाढीचा यावर परिणाम झाल्याचे सांगितले जात आहे. इंधन आणि ऊर्जा क्षेत्रातही किंमतींमध्ये बदल दिसून आला. या घटकातील महागाई दर अद्याप घट दर्शवत असला तरी त्यात थोडी वाढ झाली आहे. जानेवारीत उणे 4.01 टक्के असलेला हा दर फेब्रुवारीमध्ये उणे 3.78 टक्क्यांवर आला. उत्पादन क्षेत्रातील वस्तूंच्या दरांमध्येही किरकोळ वाढ नोंदली गेली असून हा दर 2.92 टक्क्यांपर्यंत गेला आहे. घाऊक महागाई निर्देशांकात उत्पादित वस्तूंचा वाटा सर्वाधिक मानला जातो. या घटकाचे वजन सुमारे 64 टक्क्यांहून अधिक आहे. त्यानंतर प्राथमिक वस्तूंचा वाटा सुमारे 22 टक्के असून इंधन व ऊर्जा क्षेत्राचा वाटा सुमारे 13 टक्के आहे. प्राथमिक वस्तूंमध्ये धान्य, अन्नधान्य, तेलबिया, खनिजे तसेच कच्चे खनिज तेल यांचा समावेश होतो.

किरकोळ महागाई देखील 3.21 टक्क्यांवर
किरकोळ महागाईतही वाढ नोंदवली गेली आहे. फेब्रुवारी महिन्यात किरकोळ महागाई दर 3.21 टक्क्यांवर पोहोचला असून जानेवारीत तो 2.74 टक्के होता. सामान्य ग्राहकांना बाजारात द्याव्या लागणार्‍या किमतींवर आधारित हा दर ठरवला जातो. आंतरराष्ट्रीय परिस्थितीचा महागाईवर परिणाम होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. मध्यपूर्वेत सुरू असलेल्या तणावामुळे कच्च्या खनिज तेलाच्या किमतींमध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. युद्धाची परिस्थिती दीर्घकाळ टिकल्यास तेलाच्या किमती प्रति बॅरल 150 डॉलरपर्यंत जाऊ शकतात, असे अर्थतज्ज्ञांचे मत आहे. कच्च्या तेलाचे दर वाढल्यास पेट्रोल आणि डिझेल महाग होतात. त्याचा परिणाम मालवाहतूक खर्चावर होतो. वाहतूक खर्च वाढल्याने फळे, भाजीपाला तसेच इतर दैनंदिन गरजेच्या वस्तूंच्या किमतीही वाढतात.

COMMENTS