नवी दिल्ली : देशातील द्रवीभूत पेट्रोलियम गॅसच्या उपलब्धता आणि वाढत्या किमतींच्या प्रश्नावरून सोमवारी राज्यसभेत सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये

नवी दिल्ली : देशातील द्रवीभूत पेट्रोलियम गॅसच्या उपलब्धता आणि वाढत्या किमतींच्या प्रश्नावरून सोमवारी राज्यसभेत सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. पश्चिम आशियात सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर देशातील गॅस पुरवठ्यावर परिणाम होत असल्याचा मुद्दा विरोधी पक्षाने उपस्थित केला, तर सरकारने या आरोपांना राजकीय रंग देण्याचा प्रयत्न असल्याचे म्हणत विरोधकांवर पलटवार केला.
राज्यसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी हा मुद्दा उपस्थित करताना सांगितले की, पश्चिम आशियातील तणाव आणि संघर्षामुळे भारतातील गॅस पुरवठ्याची साखळी प्रभावित होत असल्याचे संकेत मिळत आहेत. भारत आपल्या एकूण गॅस गरजांपैकी सुमारे साठ टक्के गॅस आयातीवर अवलंबून आहे. त्यातील मोठा भाग होर्मुझच्या सामुद्रधुनीतून येतो. या मार्गावरील अस्थिरतेमुळे देशातील पुरवठा व्यवस्था अडचणीत येऊ शकते, अशी चिंता त्यांनी व्यक्त केली. खरगे यांनी दावा केला की, देशातील अनेक शहरांमध्ये गॅस सिलिंडर मिळण्यासाठी मोठी प्रतीक्षा करावी लागत आहे. काही ठिकाणी सिलिंडरच्या किमतीही प्रचंड वाढल्याच्या तक्रारी येत आहेत. सामान्य नागरिकांबरोबरच हॉटेल, खानावळी, वसतिगृहे आणि लहान उद्योगांनाही याचा मोठा फटका बसत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या म्हणण्यानुसार, अनेक शहरांमध्ये गॅस सिलिंडर बुक केल्यानंतर मिळण्यासाठी सुमारे पंचवीस दिवसांची प्रतीक्षा करावी लागत आहे, तर ग्रामीण आणि दुर्गम भागात ही प्रतीक्षा चाळीस ते पंचेचाळीस दिवसांपर्यंत वाढल्याची स्थिती आहे. या परिस्थितीमुळे नागरिकांमध्ये घबराट निर्माण होऊन जास्त प्रमाणात बुकिंग करणे आणि साठेबाजी वाढण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी नमूद केले. खरगे यांनी सरकारवर तयारीचा अभाव असल्याचा आरोप करत सांगितले की, पश्चिम आशियातील संघर्ष तीव्र होत असताना सरकारने भारतीय नागरिकांसाठी इशारा दिला होता. मात्र ऊर्जा पुरवठ्यावर होणार्या संभाव्य परिणामाचा विचार करून पर्यायी व्यवस्था करण्यासाठी आवश्यक ती पूर्वतयारी करण्यात आली नाही, असा आरोप त्यांनी केला. यावर आक्षेप घेत संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी खरगे यांच्या वक्तव्याला अडवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर सभागृहात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
सरकारच्या वतीने उत्तर देताना राज्यसभेतील सभागृह नेते जगत प्रकाश नड्डा यांनी विरोधकांवर संकटाच्या काळातही राजकारण केल्याचा आरोप केला. त्यांनी स्पष्ट केले की आंतरराष्ट्रीय परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या अडचणींसाठी भारत जबाबदार नाही. तसेच पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी या विषयावर सभागृहात आधीच सविस्तर माहिती दिली असल्याचे त्यांनी सांगितले.
विरोधक अराजकता भडकवण्याचा प्रयत्न : नड्डा
राज्यसभेत एलपीजी गॅसवरून वातावरण तापले असतांनाच सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच शाब्दिक चकमक झाली. यावेळी सभागृह नेते जे.पी. नड्डा यांनी खरगे यांच्या विधानावर तीव्र आक्षेप घेतला. त्यांनी स्पष्ट केले की, ही ’शून्य प्रहर’ आहे आणि विरोधी पक्षनेत्यांनी यापूर्वीच तीन मिनिटे भाषण केले आहे. नियम सर्वांना समान रीतीने लागू होतात. आम्हाला या गोष्टीचे खेद वाटतो की, राष्ट्रीय संकटाच्या काळातही राजकारण करण्यास विरोधक मागेपुढे पाहत नाहीत. हे संकट भारताच्या आतून निर्माण झालेले नाही. हे संकट आपल्यावर ओढवले आहे, याची आपणा सर्वांनाच पूर्ण जाणीव आहे. असे असतांना विरोधकांकडून पाठीशी ठाम उभे राहण्याऐवजी अराजकता भडकवण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका नड्डा यांनी केली.

COMMENTS