नांदेड : नांदेड वाघाळा महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पक्षाच्या वतीने स्वीकृत सदस्य पदासाठी जाहीर करण्यात आलेल्या पाच नावांवरून पक्षातील एकनिष्ठ क

नांदेड : नांदेड वाघाळा महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पक्षाच्या वतीने स्वीकृत सदस्य पदासाठी जाहीर करण्यात आलेल्या पाच नावांवरून पक्षातील एकनिष्ठ कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी उसळली आहे. अनेक वर्षे पक्षासाठी निस्वार्थपणे काम करणार्या कार्यकर्त्यांना डावलून नव्याने आलेल्या किंवा वादग्रस्त पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींना संधी दिल्याचा आरोप करत नाराज कार्यकर्त्यांनी उघडपणे संताप व्यक्त केला आहे.
महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत जाहीर करण्यात आलेल्या यादीत अमित तेहरा, आशुतोष जोशी, दिलीप कंदकुर्ते, डॉ. अंकुश देवसरकर आणि सुप्रिया संजय पाटील यांचा समावेश करण्यात आला आहे. या निवडीमुळे पक्षाच्या तळागाळातील कार्यकर्त्यांमध्ये प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून पक्षासाठी आयुष्य झिजविणार्या कार्यकर्त्यांची किंमत नेमकी किती? असा थेट सवाल विचारला जात आहे. विशेषतः दिलीप कंदकुर्ते यांच्या नावावरून कार्यकर्त्यांमध्ये मोठी चर्चा सुरू झाली आहे. मागील दोन विधानसभा निवडणुकांमध्ये त्यांनी पक्षाविरुद्ध बंडखोरी करत अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढविली होती. अशा पार्श्वभूमीवर त्यांनाच स्वीकृत सदस्य पदाची संधी मिळाल्याने बंडखोरीला बक्षीस दिले जात आहे का? असा संतप्त सवाल कार्यकर्त्यांकडून उपस्थित केला जात आहे. याशिवाय अमित तेहरा आणि आशुतोष जोशी यांच्या पक्षातील कार्याबद्दलही कार्यकर्त्यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. पक्ष संघटनेसाठी त्यांनी नेमके कोणते योगदान दिले? असा थेट प्रश्न विचारत अनेक ज्येष्ठ कार्यकर्ते नाराजी व्यक्त करत आहेत. पक्षासाठी दोन ते तीन दशके झटणार्या कार्यकर्त्यांना मात्र पदांपासून दूर ठेवले जात असल्याची भावना व्यक्त होत आहे.
डॉ. अंकुश देवसरकर यांच्या निवडीवरूनही अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. ते पक्षात नेमके कधी आले आणि त्यांच्या कामगिरीचे मोजमाप काय? असा सवाल विचारत काही कार्यकर्त्यांनी ही निवड अचानक आणि अनपेक्षित असल्याचे मत मांडले आहे. तळागाळातील कार्यकर्त्यांनी स्पष्ट शब्दांत नाराजी व्यक्त करत, पक्ष संघटना उभी करण्यासाठी आम्ही वर्षानुवर्षे गावागावांत काम केले. निवडणुकांमध्ये प्रचारासाठी दिवस-रात्र मेहनत घेतली. परंतु पदवाटपाच्या वेळी मात्र आम्हालाच कायम बाजूला ठेवले जाते, अशी खंत व्यक्त केली. किती दिवस आम्ही सतरंज्या उचलायच्या आणि घरच्या भाकरी खाऊन लष्कराच्या भाकरी भाजायच्या? असा उपरोधिक सवालही काही कार्यकर्त्यांनी उपस्थित केला आहे. भाजपमध्ये गेल्या काही वर्षांत इतर पक्षांतून आलेल्या नेत्यांना मोठ्या प्रमाणात स्थान मिळत असल्याची भावना तळागाळात वाढताना दिसत आहे. विशेषतः काँग्रेसमधून आलेल्या काही नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना पक्षात पटकन पदे व नियुक्त्या मिळत असल्याने जुने कार्यकर्ते उपेक्षित राहिल्याची चर्चा रंगू लागली आहे. या पार्श्वभूमीवर पक्षाच्या स्थानिक नेतृत्वासमोर असंतोषाचे आव्हान उभे राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. संघटनेची खरी ताकद असलेले तळागाळातील कार्यकर्ते नाराज राहिल्यास त्याचा परिणाम भविष्यातील निवडणुकांवर होऊ शकतो, अशीही राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, या नाराजीवर पक्ष नेतृत्व काय भूमिका घेते आणि नाराज कार्यकर्त्यांचे समाधान कसे केले जाते याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

COMMENTS