वॉशिंग्टन : पश्चिम आशियातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणच्या नव्या सर्वोच्च नेत्याबाबत कठ

वॉशिंग्टन : पश्चिम आशियातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणच्या नव्या सर्वोच्च नेत्याबाबत कठोर भूमिका व्यक्त केली आहे. इराणने अमेरिकेच्या अटी मान्य केल्या नाहीत, तर त्या देशाच्या नेतृत्वावर थेट कारवाई होऊ शकते, असा इशारा त्यांनी दिल्याचे वृत्त आहे.
माध्यमांशी बोलताना ट्रम्प यांनी सांगितले की, इराणने आपला अण्वस्त्र कार्यक्रम पूर्णपणे थांबवणे ही अमेरिकेची प्रमुख अपेक्षा आहे. ही मागणी नाकारल्यास इराणच्या नव्या सर्वोच्च नेत्यावर कठोर पावले उचलली जाऊ शकतात, असेही त्यांनी सूचित केले. काही अमेरिकी अधिकार्यांच्या मते, अशी कारवाई आवश्यक ठरल्यास ती इस्त्रायली लष्कराच्या माध्यमातून केली जाऊ शकते. इराणचे माजी सर्वोच्च नेते अली खामेनेई यांच्या निधनानंतर त्यांचे पुत्र मुजतबा खामेनेई यांची या पदावर नियुक्ती झाल्याचे सांगितले जाते. या निवडीबाबत आपण समाधानी नसल्याचे ट्रम्प यांनी स्पष्ट केले. इराणच्या पुढील नेतृत्वाच्या निर्णयात अमेरिकेचीही भूमिका असावी, असे मतही त्यांनी व्यक्त केले. अहवालांनुसार, अली खामेनेई यांनी आपल्या मृत्युपत्रात मुलगा उत्तराधिकारी होऊ नये, अशी सूचना केल्याचे म्हटले जाते. तरीही इराणच्या प्रभावशाली क्रांतिकारी रक्षक दलाच्या पाठबळामुळे मुजतबा खामेनेई यांची सर्वोच्च नेतेपदी निवड झाल्याचे सांगितले जाते. तज्ज्ञांच्या मते, मुजतबा यांनी यापूर्वी कोणतेही औपचारिक शासकीय पद सांभाळले नसले, तरी ते दीर्घकाळ पडद्यामागून प्रभावी राजकीय भूमिका बजावत असल्याचे मानले जाते. निवडणुकांमध्ये हस्तक्षेप केल्याचे आरोपही त्यांच्यावर यापूर्वी झाले होते. दरम्यान, इस्त्रायलच्या लष्करानेही स्पष्ट केले आहे की दहशतवादाला पाठिंबा देणार्या कोणत्याही इराणी नेतृत्वावर ते कारवाई करण्यास मागे हटणार नाहीत. त्यामुळे पश्चिम आशियातील तणाव आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दुसरीकडे ट्रम्प यांनी असा दावा केला आहे की इराणमधील अनेक लष्करी तळांवर मोठ्या प्रमाणावर हल्ले झाले असून त्यांच्या संरक्षण यंत्रणेला मोठा फटका बसला आहे. परिस्थिती पाहता अमेरिका इच्छित असेल तेव्हा हा संघर्ष संपवू शकते, असेही त्यांनी म्हटले. मात्र युद्ध समाप्त करण्यासाठी अमेरिका नेमकी कोणती रणनीती अवलंबणार, याबाबत स्पष्ट माहिती अद्याप समोर आलेली नाही.
युद्ध थांबवण्यासाठी इराणच्या तीन अटी
इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियन यांनी सामाजिक माध्यमावरील संदेशातून युद्ध थांबवण्यासाठी काही अटी मांडल्या आहेत. रशिया आणि पाकिस्तानच्या नेत्यांशी संवाद साधताना त्यांनी प्रदेशातील शांततेसाठी इराण कटिबद्ध असल्याचे सांगितले. त्यांच्या मते, संघर्ष समाप्त करण्यासाठी तीन बाबी आवश्यक असून त्यामध्ये प्रथम इराणच्या वैध अधिकारांना मान्यता देणे. दुसरी झालेल्या नुकसानीची नुकसानभरपाई देणे अणि तिसरी महत्वाची बाब म्हणजे भविष्यातील हल्ल्यांपासून संरक्षणासाठी ठोस आंतरराष्ट्रीय हमी. या तीन अटी इराणने अमेरिकेसमोर ठेवल्या आहेत.

COMMENTS