Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

हिंगोलीत शेतकर्‍याची कर्जामुळे आत्महत्या

हिंगोली : राज्य सरकारने शेतकरी कर्जमाफीची घोषणा केल्यानंतरही आर्थिक ताण कमी न झाल्याने एका शेतकर्‍याने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना हिंगोली ज

महाराष्ट्राची आर्थिक अधिक सक्षम : मुख्यमंत्री फडणवीस
गटनेते खुर्शीद आलम यांनी दोन दिवसीय सभा गाजवली,बीड शहरातील अनेक महत्वाचे प्रश्न मार्गी लागणार,
किनवट पालिकेचा अजब कारभार!35 लाखांची शववाहिनी धुळखात; नऊ महिन्यांपासून प्रशासनाला पडलाय ’विसर’

हिंगोली : राज्य सरकारने शेतकरी कर्जमाफीची घोषणा केल्यानंतरही आर्थिक ताण कमी न झाल्याने एका शेतकर्‍याने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना हिंगोली जिल्ह्यात उघडकीस आली आहे. या घटनेमुळे शेतकरी कुटुंबांवरील आर्थिक दबाव आणि शेतीतील अनिश्‍चिततेचा प्रश्‍न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कळमनुरी तालुक्यातील साळवा शिवारात दत्तराव डिगांबर माखणे (वय 48) यांचा मृतदेह आढळून आला. शेतातील पर्‍हाटीजवळ जळालेल्या अवस्थेत त्यांचा मृतदेह सापडल्याने परिसरात खळबळ उडाली. या प्रकरणी कळमनुरी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. दत्तराव माखणे हे साळवा गावचे रहिवासी होते. त्यांच्या कुटुंबात आई-वडील, पत्नी आणि एक मुलगा असून मुलीचे लग्न झालेले आहे. त्यांच्या नावावर सुमारे अडीच एकर शेती होती. या शेतीतून मिळणार्‍या उत्पन्नावरच कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत होता. शेतीच्या कामासाठी त्यांनी कळमनुरी येथील राष्ट्रीयीकृत बँकेतून कर्ज घेतले होते. मात्र गेल्या काही काळापासून शेतीतून अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याने आर्थिक अडचणी वाढत गेल्या. मागील वर्षी खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले होते. त्यानंतर रब्बी हंगामातही समाधानकारक उत्पादन न मिळाल्याने कर्जफेडीची चिंता वाढली होती. कर्जाचा ताण आणि आर्थिक अडचणींमुळे ते काही दिवसांपासून मानसिक तणावात असल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. मंगळवारी रात्री ते शेतात जाऊन येतो असे सांगून घरातून बाहेर पडले होते. मात्र रात्री उशिरापर्यंत ते परत न आल्याने कुटुंबीयांनी शोध घेण्यास सुरुवात केली. शेतात जाऊन पाहणी केली असता पर्‍हाटीजवळ त्यांचा मृतदेह आढळून आला. घटनास्थळी त्यांचा मोबाईल फोन, पाण्याची बाटली आणि चप्पल आढळून आल्याचेही सांगितले जाते. या घटनेमुळे साळवा गावात शोककळा पसरली असून शेतकरी कुटुंबावर मोठा आघात झाला आहे. दरम्यान, प्राथमिक माहितीनुसार कर्जाच्या तणावातून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.

COMMENTS