पुणे : शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि पुण्यातील माजी नगरसेवक वसंत मोरे यांच्याविरुद्ध अट्रोसिटी अर्थात अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्

पुणे : शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि पुण्यातील माजी नगरसेवक वसंत मोरे यांच्याविरुद्ध अट्रोसिटी अर्थात अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात ही नोंद करण्यात आली असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
विश्वनाथ रुकाराम लहाडे (वय 72) यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. तक्रारीनुसार, 25 फेब्रुवारी रोजी पुणे महापालिकेत आयोजित पत्रकार परिषदेत मोरे यांनी लहाडे यांचा उल्लेख करत आक्षेपार्ह आणि अपमानास्पद वक्तव्य केल्याचा आरोप आहे. फिर्यादींच्या म्हणण्यानुसार, आपण अनुसूचित जातीतील असल्याची माहिती असतानाही मोरे यांनी जाणीवपूर्वक आपल्याबद्दल अवमानकारक भाष्य केले. त्या पत्रकार परिषदेत लहाडे इतके मद्यपान केले होते की त्यांना बोलताही येत नव्हते तसेच ओढ्यात उतरून गटारे साफ करत आहेत अशा आशयाचे वक्तव्य करण्यात आल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या वक्तव्याचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर प्रसारित झाल्यानंतर आपली सामाजिक प्रतिमा धुळीस मिळाली असून कुटुंबीयांनाही मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याचे लहाडे यांनी तक्रारीत नमूद केले आहे. या घटनेमुळे कुटुंबीयांमध्ये भीती आणि तणावाचे वातावरण निर्माण झाल्याचेही त्यांनी पोलिसांना सांगितले. तक्रारीची दखल घेत शिवाजीनगर पोलिसांनी अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंदवला असून प्रकरणाचा अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली. दरम्यान, या प्रकरणामुळे पुण्यातील राजकीय वर्तुळात चर्चा रंगली असून पुढील चौकशीकडे लक्ष लागले आहे.

COMMENTS