राज्यसभेसाठी शिंदेंचे धक्कातंत्र; ज्योती वाघमारेंना संधीमुंबई : राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारणात हालचाली वेगाने सुरू असून

राज्यसभेसाठी शिंदेंचे धक्कातंत्र; ज्योती वाघमारेंना संधी
मुंबई : राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारणात हालचाली वेगाने सुरू असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनपेक्षित निर्णयाची चाल खेळल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली असून शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला तांत्रिकदृष्ट्या एकच जागा येत असताना, पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांऐवजी सोलापूरच्या प्राध्यापक ज्योती वाघमारे यांना संधी देण्यात आली आहे. त्यांनी गुरूवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
सुरुवातीला माजी खासदार राहुल शेवाळे यांचे नाव आघाडीवर असल्याचे सांगितले जात होते; मात्र ऐनवेळी समीकरणे बदलल्याचे संकेत मिळत असून वाघमारे यांच्या नावाला अधिक पाठबळ मिळाल्याने त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. राज्यातील राज्यसभा निवडणुकीसाठी महायुतीतील घटक पक्षांमध्ये उमेदवारीच्या हालचाली वाढल्या आहेत. भाजपने चार उमेदवारांची घोषणा केल्यानंतर आता शिवसेना शिंदे गटाने ज्योती वाघमारे यांना तर राष्ट्रवादीकडून पार्थ पवारांना उमेदवारी देण्यात आली आहे. शिवसेना शिंदे गटाची स्थापना झाल्यापासून ज्योती वाघमारे यांनी पक्षाची भूमिका ठामपणे मांडण्याचे काम केले आहे. विविध राजकीय मुद्द्यांवर माध्यमांसमोर पक्षाची बाजू प्रभावीपणे मांडत त्यांनी आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. विरोधकांकडून होणार्या आरोपांना आक्रमक आणि अभ्यासपूर्ण पद्धतीने उत्तर देत त्या पक्षाच्या प्रमुख प्रवक्त्यांपैकी एक म्हणून पुढे आल्या आहेत. सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात सक्रिय असलेल्या वाघमारे या फुले-शाहू-आंबेडकर विचारधारेतून पुढे आलेल्या आहेत. यापूर्वी त्या काँग्रेस पक्षातही कार्यरत होत्या. काँग्रेसच्या महिला विभागात त्यांनी महत्त्वाची जबाबदारी सांभाळली होती. विविध प्रचारसभांचे नियोजन आणि सूत्रसंचालन करत त्यांनी राजकीय संघटनात्मक कामाचा अनुभवही घेतला आहे. नंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश करून शिंदे गटासोबत काम सुरू केले. पक्षाच्या भूमिकेचे प्रभावीपणे समर्थन करणार्या प्रवक्त्या म्हणून त्यांनी अल्पावधीतच आपले स्थान निर्माण केले. त्यामुळे राज्यसभेसाठी त्यांचे नाव पुढे येत असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात जोर धरत आहे.

COMMENTS