चार शेळ्यांचा फडशा; शेतकऱ्यांत भीती देवळाली प्रवरा : राहुरी तालुक्यात बिबट्यांचा पुन्हा धुमाकूळ पाहायला मिळाला आहे. उंबरे गावात मध्यरात्री बिबट्या

चार शेळ्यांचा फडशा; शेतकऱ्यांत भीती
देवळाली प्रवरा : राहुरी तालुक्यात बिबट्यांचा पुन्हा धुमाकूळ पाहायला मिळाला आहे. उंबरे गावात मध्यरात्री बिबट्यांनी शेतकरी वस्तीवर हल्ला करत चार शेळ्या ठार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
राहुरी तालुक्याच्या पूर्व भागातील उंबरे येथे शेतकरी लक्ष्मण सोपान क्षीरसागर यांच्या वस्तीवर सोमवारी, २ मार्च रोजी मध्यरात्री दोन ते तीन बिबट्यांनी अचानक हल्ला चढवला. शेडमध्ये जाळीत बांधलेल्या चार शेळ्यांचा बिबट्यांनी जागीच फडशा पाडला.
शेळ्यांच्या ओरडण्याचा आवाज ऐकून घरातील सदस्य जागे झाले, मात्र तोपर्यंत बिबट्यांनी हल्ला करून नुकसान केले होते. ऊसतोड हंगाम संपल्याने परिसरात बिबट्यांना लपण्यासाठी जागा आणि भक्ष्य कमी पडत असल्याने ते आता नागरी वस्तीकडे वळत असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
घटनेची माहिती मिळताच वनरक्षक बी.आर. आडागळे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. नागरिकांच्या मागणीनुसार परिसरात लवकरच पिंजरा लावण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, बिबट्यांच्या वाढत्या हालचालीमुळे उंबरे परिसरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून वन विभागाने तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

COMMENTS