पालघर ः पालघर जिल्ह्यातील मस्तान नाका परिसरात घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे. बंद पडलेल्या दगड खाणीत साचलेल्या पाण्यात बुडून
पालघर ः पालघर जिल्ह्यातील मस्तान नाका परिसरात घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे. बंद पडलेल्या दगड खाणीत साचलेल्या पाण्यात बुडून दोन अल्पवयीन मुलांचा मृत्यू झाला. ही घटना मुंबई-अहमदाबाद महामार्गालगत मस्तान नाका उड्डाणपुलाच्या पश्चिमेकडील टाकवहाल हद्दीत घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, जिग्नेश विजय पवार (वय 8) आणि आयुष मुकेश पवार (वय 15) हे इतर काही मुलांसोबत खाणीत साचलेल्या पाण्यात आंघोळीसाठी गेले होते. पाण्याची खोली आणि तळाचा अंदाज न आल्याने दोघेही खोल भागात गेले आणि बुडाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच मनोर पोलीस ठाणे येथील अधिकारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. तसेच वसई विरार महापालिका अग्निशमन दल यांनी शोधमोहीम सुरू केली. दीर्घ प्रयत्नांनंतर जिग्नेश पवार याचा मृतदेह बाहेर काढण्यात यश आले, तर आयुष पवार याचा शोध उशिरापर्यंत सुरू होता. बचावकार्यादरम्यान नागरिकांना सुरक्षित अंतरावर ठेवण्यात आले होते. दरम्यान, हीच खाण यापूर्वीही जीवघेणी ठरली असल्याचे स्थानिकांनी सांगितले. सुमारे आठ महिन्यांपूर्वी एका महिलेचा याच ठिकाणी बुडून मृत्यू झाला होता. तरीदेखील परिसरात आवश्यक सुरक्षाव्यवस्था उभारण्यात आलेली नसल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

COMMENTS