Homeताज्या बातम्याक्रीडा

जम्मू-काश्मीर संघाने प्रथमच पटकावला रणजी ट्रॉफी  

कर्नाटकावर मात करत जेतेपदावर केले शिक्कामोर्तबनवी दिल्ली ः भारतीय देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेच्या इतिहासात यंदा एक नवा आणि अभिमानास्पद अध्याय जोडला

उर्वशी रौतेला -सुर्यकुमार यादव एकत्र
कर्जतमध्ये रंगणार ‘महाराष्ट्र केसरी’ कुस्तीचा थरार!
नगरच्या नयना खेडकर हिने चीनमध्ये कुंग फू खेळात पटकाविले रौप्य पदक

कर्नाटकावर मात करत जेतेपदावर केले शिक्कामोर्तब
नवी दिल्ली ः भारतीय देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेच्या इतिहासात यंदा एक नवा आणि अभिमानास्पद अध्याय जोडला गेला. 2025-26 हंगामातील रणजी ट्राफीच्या अंतिम सामन्यात जम्मू-काश्मीर संघाने बलाढ्य कर्नाटकवर मात करत प्रथमच विजेतेपद पटकावले. विशेष म्हणजे, अंतिम फेरीत प्रवेश करण्याची ही त्यांची पहिलीच वेळ होती आणि पहिल्याच प्रयत्नात त्यांनी जेतेपदावर शिक्कामोर्तब केले.
रणजी ट्राफी ही देशातील सर्वात प्रतिष्ठेची प्रथम श्रेणी क्रिकेट स्पर्धा मानली जाते. या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पाच दिवसांचा खेळ संपल्यानंतरही स्पष्ट निकाल लागला नाही, तरी नियमांनुसार पहिल्या डावातील आघाडीच्या आधारे विजेता निश्‍चित केला जातो. याच नियमानुसार जम्मू-काश्मीर संघाला विजयी घोषित करण्यात आले, कारण त्यांनी पहिल्या डावात कर्नाटकवर मोठी आघाडी मिळवली होती. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारलेल्या जम्मू-काश्मीरने पहिल्या डावात तब्बल 584 धावांचा डोंगर उभा केला. दुसर्‍या विकेटसाठी शुभम पुंडीर आणि यावर हसन यांनी 139 धावांची भागीदारी करत संघाला मजबूत सुरुवात करून दिली. यावर 88 धावांवर बाद झाला, मात्र शुभमने आपली लय कायम राखत अब्दुल समदसोबत चौथ्या विकेटसाठी 124 धावा जोडल्या. शुभम पुंडीरने 14 चौकारांसह 121 धावांची देखणी खेळी साकारली. अब्दुल समदने 61 धावा केल्या. कर्णधार पारस डोगराने 70 धावा करत नेतृत्वाची जबाबदारी पार पाडली, तर साहिल लोत्राने 72 धावांचे महत्त्वपूर्ण योगदान दिले. कर्नाटककडून प्रसिद्ध कृष्णाने 5 बळी घेतले. विद्याधर पाटील, विजयकुमार विशाक, श्रेयस गोपाल आणि शिखर शेट्टी यांनी प्रत्येकी एक फलंदाज बाद केला. पहिल्या डावात प्रत्युत्तर देताना कर्नाटकची सुरुवात अत्यंत निराशाजनक ठरली. वेगवान गोलंदाज औकिब नबीने अचूक आणि भेदक मारा करत वरच्या फळीला हादरे दिले. के.एल. राहुल केवळ 13 धावांवर बाद झाला. त्यानंतर करुण नायर आणि स्मरण आर यांना खातेही उघडता आले नाही. औकिबच्या प्रभावी गोलंदाजीमुळे कर्नाटकवर सुरुवातीपासूनच दबाव निर्माण झाला. पहिल्याच अंतिम सामन्यात विजेतेपद पटकावत जम्मू-काश्मीर संघाने देशांतर्गत क्रिकेटमध्ये आपली ताकद सिद्ध केली आहे. शिस्तबद्ध फलंदाजी, अचूक गोलंदाजी आणि योग्य डावपेच यांच्या जोरावर मिळवलेला हा विजय राज्यासाठी ऐतिहासिक ठरला आहे. रणजी चषकाच्या इतिहासात आता जम्मू-काश्मीरचे नाव सुवर्णाक्षरांनी नोंदले गेले आहे.

दुसर्‍या डावातील निर्णायक शतके
दुसर्‍या डावात कामरान इक्बाल आणि साहिल लोत्रा यांनी शतकांच्या जोरावर संघाची पकड अधिक मजबूत केली. यावर हसन एक धाव करून बाद झाला असला, तरी कामरानने डाव सावरला. जम्मू-काश्मीरने दुसर्‍या डावात 4 बाद 342 धावा केल्या. कामरान इक्बालने नाबाद 160 धावांची शानदार खेळी केली, तर साहिल लोत्राने नाबाद 101 धावा करत त्याला समर्थ साथ दिली. पाचव्या दिवशी दुपारच्या विश्रांतीनंतर कर्णधार पारस डोगराने डाव घोषित केला. सामना अनिर्णित राहिला तरी पहिल्या डावातील भक्कम आघाडीमुळे नियमांनुसार जम्मू-काश्मीरला विजयी घोषित करण्यात आले.

COMMENTS