उत्पादन खर्चही निघेना ; शेतकरी हवालदिल श्रीगोंदा : तालुक्यासह नगर जिल्हा तसेच पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि नाशिक जिल्ह्यात यंदा मोठ्या प्रमाणात

उत्पादन खर्चही निघेना ; शेतकरी हवालदिल
श्रीगोंदा : तालुक्यासह नगर जिल्हा तसेच पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि नाशिक जिल्ह्यात यंदा मोठ्या प्रमाणात रब्बी हंगामातील कांद्याचे उत्पादन झाले. मात्र बाजारात कांद्याला अत्यंत कमी दर मिळत असून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे.
सध्या बाजारात एक नंबर व दोन नंबर कांद्याला प्रतिकिलो सुमारे ९ रुपये, चिंगळी कांद्याला २ रुपये, तर भुगी कांद्याला केवळ १ रुपया किलो दर मिळत असल्याची स्थिती आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या लागवड, मशागत, खते, औषधे, पाणी व काढणीचा खर्चही निघत नसल्याची खंत व्यक्त होत आहे.
कांदा पिकासाठी एका एकराला सरासरी ७० ते ८० हजार रुपये खर्च येतो. रात्रंदिवस पाणी देणे, महागडी खते खरेदी करणे, बदलत्या व खराब वातावरणामुळे वारंवार फवारण्या करणे अशा अनेक अडचणींवर मात करत शेतकऱ्यांनी कांद्याचे उत्पादन घेतले. मात्र मिळणारा बाजारभाव अत्यंत कमी असल्याने उत्पादन खर्चाच्या निम्मेही पैसे हातात पडत नसल्याची परिस्थिती आहे.
कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडले असून भविष्यात शासनाने तातडीने हस्तक्षेप करून दर स्थिर ठेवण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. अन्यथा शेतकऱ्यांना आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल, असा इशाराही व्यक्त केला जात आहे.

COMMENTS