Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कुरुंदकर व्याख्यानमालेत विचारांचा दीप: डॉ. आसाराम लोमटे यांचे यंदाचे विशेष व्याख्यान

नांदेड । प्रतिनिधीनांदेडच्या सांस्कृतिक आणि वैचारिक परंपरेला समृद्ध करणारी नरहर कुरुंदकर व्याख्यानमाला यंदा आपल्या 44व्या वर्षात पदार्पण करत असून,

लिंबगाव ते तळणी रस्त्याच्या दुरवस्थेमुळे वाहन चालकांची गैरसोय
जाहिरातबाजीचा अतिरेक : नांदेड शहर बॅनर्सखाली गुदमरतेय, प्रशासनाची उदासीनता!
शरीर नव्हे, आत्माच खरा सुंदर! : ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज भारतींचा परखड सामाजिक संदेश

नांदेड । प्रतिनिधी
नांदेडच्या सांस्कृतिक आणि वैचारिक परंपरेला समृद्ध करणारी नरहर कुरुंदकर व्याख्यानमाला यंदा आपल्या 44व्या वर्षात पदार्पण करत असून, या वर्षीच्या व्याख्यानमालेस साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित ज्येष्ठ लेखक, संवेदनशील पत्रकार आणि वैचारिक लेखक डॉ. आसाराम लोमटे यांची उपस्थिती लाभणार आहे. नरहर कुरुंदकर प्रतिष्ठान व रूपवेध ग्रंथालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या व्याख्यानमालेत 23 व 24 फेब्रुवारी 2026 रोजी दोन महत्त्वपूर्ण विषयांवर त्यांची व्याख्याने होणार आहेत.
परभणी येथे पूर्णवेळ पत्रकार म्हणून कार्यरत असलेले डॉ. लोमटे यांनी कथा, कादंबरी आणि वैचारिक लेखनाच्या माध्यमातून ग्रामीण वास्तव, मानवी जीवनातील वेदना आणि सामाजिक प्रश्न यांना नेमक्या शब्दांत अभिव्यक्त केले आहे. ‘इडा पिडा टळो’, ‘आलोक’ आणि ‘वाळसरा’ हे त्यांचे कथासंग्रह, ‘तसनस’ ही कादंबरी तसेच ‘धूळपेर’ हा लेखसंग्रह साहित्यविश्वात विशेष दखल घेणारे ठरले आहेत. त्यांच्या लेखणीतील वास्तवदर्शी संवेदना आणि विचारांची खोली यामुळे महाराष्ट्रातील विविध मान्यवर संस्थांनी त्यांना गौरविले आहे. विशेष म्हणजे, 2016 साली ‘आलोक’ या कथासंग्रहासाठी त्यांना प्रतिष्ठेचा साहित्य अकादमी पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. कृषीजीवन, ग्रामीण प्रश्न आणि समाजातील बदलत्या वास्तवावर त्यांनी सातत्याने लेखन करून सामाजिक संवेदनशीलतेला नवी दिशा दिली आहे. या व्याख्यानमालेत दि. 23 फेब्रुवारी रोजी ‘समाज, साहित्य आणि संवेदनशीलता’ या विषयावर तर दि. 24 फेब्रुवारी रोजी ‘भारतीय साहित्य व साहित्यातील भारतीयता’ या विषयावर ते विचारमंथन करणार आहेत. साहित्य, समाज आणि संस्कृती यांचा परस्परसंबंध उलगडत, समकालीन प्रश्नांना वैचारिक संदर्भ देणारे हे संवाद रसिकांसाठी चिंतनाची मेजवानी ठरणार आहेत. सायन्स कॉलेजच्या पूरणमल लाहोटी सभागृहात दररोज सायंकाळी 6 वाजता होणार्‍या या व्याख्यानांचा लाभ साहित्यप्रेमी, विद्यार्थी, अभ्यासक आणि नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन प्रा. सौ. श्यामल पत्की यांनी केले आहे. विचारांची परंपरा जपणार्‍या या व्याख्यानमालेतून समाजजीवन अधिक समृद्ध आणि सजग होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

COMMENTS