नवी दिल्ली : भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी लोकसभेत काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याविरोधात स्वतंत्र ठराव मांडला

नवी दिल्ली : भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी लोकसभेत काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याविरोधात स्वतंत्र ठराव मांडला. राहुल गांधी देशाची दिशाभूल करत असल्याचा आरोप करत त्यांनी त्यांच्या संसदेतील सदस्यत्व रद्द करण्याची तसेच भविष्यात निवडणूक लढवण्यास कायमस्वरूपी बंदी घालण्याची मागणी केली.
दुबे यांनी स्पष्ट केले की हा हक्कभंगाचा प्रस्ताव नसून स्वतंत्र स्वरूपाचा ठराव आहे, ज्यावर सभागृहात थेट चर्चा होऊ शकते आणि निर्णय घेतला जाऊ शकतो. दरम्यान तत्पूर्वी अर्थसंकल्पीय चर्चेदरम्यान लोकसभेत पुन्हा एकदा गदारोळाचे वातावरण निर्माण झाले. सकाळी 11 वाजता सभागृहाचे कामकाज सुरू होताच विरोधी पक्षाच्या सदस्यांनी घोषणाबाजी करत अध्यक्षांच्या आसनासमोरील जागेत धाव घेतली. हातात फलक आणि पोस्टर्स घेतलेल्या सदस्यांमुळे प्रश्नोत्तराचा तास अवघ्या काही मिनिटांतच विस्कळीत झाला. अध्यक्षस्थानी असलेल्या सभापती के. पी. टेनेटी यांनी सात मिनिटांतच सभागृह तहकूब करण्याचा निर्णय घेतला. दुपारी 12 वाजता कामकाज पुन्हा सुरू करण्यात आले. त्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यसभेत उपस्थित होते.
यावेळी बोलतांना दुबे यांनी आरोप केला की राहुल गांधी बाह्य शक्तींच्या प्रभावाखाली देशाबाबत चुकीची माहिती पसरवत आहेत. विशेषतः अमेरिकेतील उद्योगपती जॉर्ज सोरोस यांचा उल्लेख करत त्यांनी देशाच्या धोरणांबाबत संभ्रम निर्माण केला जात असल्याचे म्हटले. त्यांच्या मते, अशा विधानांमुळे भारताची आंतरराष्ट्रीय प्रतिमा बाधित होते. याआधी राहुल गांधी यांनी लोकसभेत भारत-अमेरिका व्यापार कराराच्या संदर्भात केंद्र सरकारवर टीका केली होती. जागतिक स्तरावर ऊर्जा आणि वित्तीय साधनांचा राजकीय दबावासाठी वापर होत असल्याचा उल्लेख करत त्यांनी भारताच्या ऊर्जा सुरक्षेच्या निर्णयांमध्ये अमेरिकेला अधिक प्रभाव दिला जात असल्याचा आरोप केला. देशाच्या दीर्घकालीन हितांशी तडजोड होत असल्याची शंका त्यांनी व्यक्त केली होती. भाजपच्या अनेक नेत्यांनी राहुल गांधींच्या या भूमिकेवर टीका केली. काहींनी त्यांच्या वक्तव्यांना ‘अपरिपक्व’ ठरवत विरोधक देशाची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला.
लोकसभा अध्यक्षांशी अयोग्य वर्तन ः मंत्री रिजिजू
या वादाच्या पार्श्वभूमीवर संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी समाजमाध्यम ‘एक्स’वर एक व्हिडिओ प्रसिद्ध केला. 4 फेब्रुवारी रोजी लोकसभा अध्यक्षांच्या दालनात झालेल्या कथित गोंधळाचा हा व्हिडिओ असल्याचा दावा करण्यात आला. रिजिजू यांनी विरोधी सदस्यांनी अयोग्य वर्तन केल्याचा आरोप केला. काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी मात्र हे आरोप फेटाळून लावत आपण कोणालाही चिथावणी दिली नसल्याचे स्पष्ट केले. आपण शांतपणे आपले मत मांडल्याचे त्यांनी सांगितले. सध्याच्या घडामोडींमुळे संसदेत राजकीय तणाव वाढलेला दिसत आहे.

COMMENTS