नांदेड ः नांदेडच्या जनतेने भरभरून दिलेल्या विश्वासातून प्रथमच भारतीय जनता पक्षाचा महापौर निवडून येणे, ही शहराच्या राजकीय इतिहासातील महत्त्वाची घट

नांदेड ः नांदेडच्या जनतेने भरभरून दिलेल्या विश्वासातून प्रथमच भारतीय जनता पक्षाचा महापौर निवडून येणे, ही शहराच्या राजकीय इतिहासातील महत्त्वाची घटना आहे. या विश्वासाला साजेसे काम नगरसेवक व पदाधिकार्यांनी करून जनतेकडून प्रशंसा मिळवावी, असे आवाहन माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण यांनी केले. नांदेड महानगरपालिकेच्या नवनिर्वाचित महापौर व उपमहापौरांच्या पदग्रहण समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
नांदेडच्या राजकीय परंपरेचा उल्लेख करताना त्यांनी स्व. शंकरराव चव्हाण यांचा नगराध्यक्ष ते देशाचे गृहमंत्री असा प्रेरणादायी प्रवास अधोरेखित केला. नव्या नेतृत्वाने विकास, पारदर्शकता व लोकहित या मूल्यांवर काम करावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. नांदेड शहरातील जनतेने भाजपावर मोठा विश्वास टाकून 45 नगरसेवक निवडून दिले असून शिवसेनेच्या बिनशर्त पाठिंब्यामुळे युती अधिक बळकट झाली आहे. त्यामुळे नागरिकांच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी नगरसेवकांनी तात्काळ कामाला लागावे, असे त्यांनी सांगितले. निवडणूक निकालानंतर लगेचच पालिका आयुक्तांशी चर्चा करून शंभर दिवसांचा कृती आराखडा तयार करण्याच्या सूचना दिल्याचे त्यांनी सांगितले. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी ऑनलाईन सेवा वाढवून पीनागरिकांना पालिकेत खेटे मारावे लागू नयेत, यावर भर देण्यात आला. स्टार्ट अर्ली, गो स्लोली, रिच सेफली हा संदेश देत वेळ न दवडता काम सुरू करण्याचे आवाहन त्यांनी केले. वैचारिक मतभेद असू शकतात; मात्र राजकारणात मनभेद नसावेत, असे सांगून धोरणात्मक निर्णय घेताना विकासाची गाडी रुळावरून घसरू नये, याची काळजी घ्यावी, असे त्यांनी स्पष्ट केले. विकासकामांत अडथळे निर्माण करणार्यांना कठोरपणे बाजूला काढण्याची तयारी असल्याचेही त्यांनी नमूद केले.
यावेळी कविता मुळे यांनी सामान्य कुटुंबातील महिलेला महापौरपदाची संधी दिल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. कार्यक्रमास डॉ. अजित गोपछडे, माजी मंत्री डी. पी. सावंत, भाजप महानगराध्यक्ष अमरभाऊ राजूरकर, माजी आमदार राम पाटील रातोळीकर, डॉ. संतुक हंबर्डे तसेच महापालिका आयुक्त महेशकुमार डोईफोडे उपस्थित होते. प्रास्ताविक आयुक्तांनी, सूत्रसंचालन संतोष देवराये यांनी, तर आभार प्रदर्शन अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम यांनी केले.

COMMENTS