उपमहापौरपदी शिवसेनेचे राजेंद्र जंजाळ छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेत भाजप-शिवसेना युतीअंतर्गत सत्तावाटप निश्चित झाले असून, भाजपचे
उपमहापौरपदी शिवसेनेचे राजेंद्र जंजाळ
छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेत भाजप-शिवसेना युतीअंतर्गत सत्तावाटप निश्चित झाले असून, भाजपचे समीर राजूरकर महापौरपदाची सूत्रे हाती घेणार आहेत. तर शिवसेनेकडून राजेंद्र जंजाळ यांची उपमहापौरपदी पुनर्नियुक्ती करण्यात आली आहे. महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर सत्तास्थापनेच्या प्रक्रियेला वेग आला होता. युतीतील सहकार्य कायम ठेवत शहराच्या विकासासाठी एकत्रितपणे काम करण्याचा निर्धार दोन्ही पक्षांनी व्यक्त केला आहे.
भाजपचे शहराध्यक्ष किशोर शितोळे यांनी सांगितले की, निवडणूक प्रक्रियेपासूनच भाजप आणि शिवसेना मैत्रीपूर्ण पद्धतीने वाटचाल करत आहेत. हिंदुत्वाच्या समान भूमिकेवर आधारित ही युती असून, राज्यासह शहरपातळीवरही एकत्र काम करण्याचा आमचा स्पष्ट विचार आहे. भाजपकडे महापौरपद तर शिवसेनेकडे उपमहापौरपद देण्याचा निर्णय याच समन्वयातून घेण्यात आला आहे. पाणीपुरवठ्यासारख्या मूलभूत प्रश्नांवर विशेष भर देत शहराच्या सर्वांगीण विकासासाठी दोन्ही पक्ष संयुक्तपणे प्रयत्न करतील, असेही त्यांनी नमूद केले. शिवसेनेचे नेते विलास पारकर म्हणाले की, महायुतीत भाजप हा मोठा भाऊ असून शिवसेना छोटा भाऊ आहे, हे आम्ही खुलेपणाने मान्य केले आहे. हिंदुत्व आणि विकास हेच आमच्या राजकारणाचे केंद्रबिंदू आहेत. ही महानगरपालिका निवडणूक कार्यकर्त्यांच्या मेहनतीतून जिंकली असून, युतीत कोणताही मतभेद नाही.

COMMENTS