Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

झेंडावंदन मंत्री आणि नांदेडचे दुर्लक्ष : नांदेड जिल्ह्याच्या दुर्लक्षित प्रश्नाकडे पाहण्यासाठी पालकमंत्र्यांना वेळ सापडेना?

खुशमस्कर्‍यांची भोवताली गर्दी जमली, त्या गर्दीत माणुसकी हरवली ?नांदेड  ।  प्रतिनिधीनांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून जबाबदारी असलेले अतुल सावे ह

नांदेड दक्षिणच्या सर्वांगीण विकासासाठी शिवसेनाच सक्षम
भाजपातील खदखद उफाळली !
नांदेडमध्ये शेती व्यवहारातून दोन कोटींची फसवणूक; पाच जणांविरोधात गुन्हा दाखल

खुशमस्कर्‍यांची भोवताली गर्दी जमली, त्या गर्दीत माणुसकी हरवली ?
नांदेड  ।  प्रतिनिधी
नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून जबाबदारी असलेले अतुल सावे हे केवळ झेंडावंदन, औपचारिक बैठक आणि काही निवडक प्रतिष्ठितांच्या भेटीपुरतेच नांदेडशी नाते ठेवतात की काय, असा संतप्त सवाल नागरिकांमधून उपस्थित होत आहे. चार-पाच महिन्यांतून एखाद-दोन वेळा जिल्ह्यात येऊन औपचारिक उपस्थिती लावणे आणि परत जाणे, एवढ्यापुरताच त्यांचा नांदेड दौरा मर्यादित राहिला आहे. या दौर्यांतून जिल्ह्याच्या ज्वलंत प्रश्नांकडे लक्ष देण्याची साधी इच्छाही दिसून येत नाही.
नुकतीच खोब्रागडे नगरात घडलेली दुर्दैवी दुर्घटना संपूर्ण शहराला हादरवून गेली. मात्र पालकमंत्री म्हणून त्या दुर्घटनास्थळी प्रत्यक्ष भेट देणे, पीडित कुटुंबीयांचे सांत्वन करणे किंवा प्रशासनाला कठोर सूचना देणे, एवढाही वेळ त्यांना मिळाला नाही. त्याचप्रमाणे नांदेडच्या शासकीय रुग्णालयातील दयनीय परिस्थिती पाहण्यासाठी पाच-दहा मिनिटे काढणेही त्यांना गरजेचे वाटले नाही. रुग्णालयात बेडची कमतरता, औषधांचा तुटवडा, अपुर्‍या सुविधा आणि रुग्णांचे हाल – या सगळ्या गोष्टी केवळ वृत्तपत्रातील बातम्या ठराव्यात आणि पालकमंत्र्यांच्या नजरेस पडू नयेत, हीच जणू व्यवस्था निर्माण झाली आहे. पालकमंत्री म्हणजे जिल्ह्याचा पालक असतो. पण नांदेडला मिळालेला पालक फक्त झेंडावंदनापुरताच सीमित राहिल्यासारखा चित्र दिसत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये हे झेंडावंदन मंत्री नांदेडचे काय भले करणार? असा प्रश्न अधिक तीव्र होत आहे दरम्यान, पालकमंत्र्यांच्या नावाने कंत्राटदारी करणारी आणि जिल्हा नियोजन मंडळाच्या विकास कामांत टक्केवारी घेऊन वाटणी करणारी एक टोळी मात्र अत्यंत सुखावलेली आहे. पालकमंत्री जिल्ह्यात फारसे येत नसल्यामुळे या मंडळींना मनमानी कारभार करण्याची मोकळीक मिळते. कुणी विचारणा करणारा नाही, कुणी थेट पाहणी करणारा नाही आणि कुणी जाब विचारणारा नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. परिणामी विकासकामे कागदावर पूर्ण आणि प्रत्यक्षात अपूर्ण अशीच राहतात. नांदेड जिल्ह्याला पाणी, आरोग्य, रस्ते, शिक्षण, रोजगार, औद्योगिकीकरण यांसारख्या अनेक आघाड्यांवर ठोस नेतृत्वाची गरज आहे. पण नेतृत्वाऐवजी केवळ औपचारिकतेचा खेळ सुरू असेल, तर जिल्ह्याचा विकास हा फक्त घोषणांपुरताच मर्यादित राहणार, हे निश्चित. नांदेड जिल्हा हा केवळ भौगोलिकदृष्ट्या मोठा जिल्हा नाही, तर विकासाच्या प्रचंड भुकेने अस्वस्थ झालेला जिल्हा आहे. येथील शहरी भाग असो वा ग्रामीण परिसर, सर्वत्र मूलभूत सुविधांची कमतरता ठळकपणे जाणवते. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अद्याप अनेक गावांमध्ये गंभीर आहे. उन्हाळा सुरू झाला की टँकरवरची भिस्त, विहिरींची आटलेली पातळी आणि नळयोजनांची अर्धवट कामे ही नांदेडची ओळख बनली आहे. रस्त्यांची अवस्था पाहिली तर अपघात हे रोजचेच वास्तव झाले आहे. खड्ड्यांतून मार्ग काढत प्रवास करणारे नागरिक जणू विकासाची भीक मागत आहेत, अशी परिस्थिती आहे. आरोग्य व्यवस्थेची अवस्था तर अधिकच विदारक आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयापासून तालुकास्तरीय दवाखान्यांपर्यंत डॉक्टरांची कमतरता, औषधांचा तुटवडा आणि अपुर्‍या सुविधा यामुळे सामान्य माणूस अक्षरशः हतबल झाला आहे. शिक्षण क्षेत्रातही परिस्थिती फारशी समाधानकारक नाही. अनेक शाळांमध्ये शिक्षक अपुरे, इमारती जीर्ण, तर ग्रामीण भागातील विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी शहरांकडे स्थलांतर करण्यास मजबूर आहेत. औद्योगिक विकासाच्या बाबतीत नांदेड आजही मागेच आहे. रोजगाराच्या संधी अत्यल्प असल्याने तरुणाई मोठ्या शहरांकडे वळत आहे. शेती हा जिल्ह्याचा कणा असतानाही शेतकर्‍यांना सिंचन सुविधा, हमीभाव आणि प्रक्रिया उद्योगांचा अभाव सतत भेडसावत आहे. हे सगळे वास्तव पाहिले तर नांदेडचा प्रत्येक कोपरा विकास हवा, खरा विकास हवा अशी आर्त हाक देताना दिसतो. जिल्ह्याची ही विकासाची भूक केवळ योजनांच्या घोषणा ऐकून भागणारी नाही, तर ठोस अंमलबजावणीची मागणी करणारी आहे. केवळ कागदावर विकास दाखवून चालणार नाही, तर प्रत्यक्षात बदल दिसायला हवा. नांदेडला आज अशा नेतृत्वाची गरज आहे जे फाईलमध्ये नाही तर फिल्डमध्ये काम करणारे असेल. जिल्ह्याच्या समस्या ऐकून घेणारे, त्या समजून घेणारे आणि त्यावर वेळेत निर्णय घेणारे नेतृत्वच नांदेडची विकासाची भूक शमवू शकते. अन्यथा हा जिल्हा केवळ आश्वासनांच्या ओझ्याखाली दबलेला आणि विकासाच्या प्रतीक्षेत राहिलेला जिल्हा म्हणूनच ओळखला जाईल. पालकमंत्री अतुल सावे यांनी आता तरी नांदेडकडे गांभीर्याने पाहावे, जिल्ह्यात नियमित दौरे करावेत, सामान्य नागरिकांशी संवाद साधावा आणि प्रत्यक्षात समस्यांच्या मुळाशी जाऊन निर्णय घ्यावेत, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे. अन्यथा झेंडावंदन मंत्री ही उपाधी त्यांना कायमची चिकटून राहील आणि नांदेडचा विकास हा केवळ फाईलपुरताच सीमित राहील, यात शंका नाही.

COMMENTS