Homeअग्रलेख

दादांची अखेर चटका लावणारी !

राज्यातील बारामतीतील काटेवाडीच्या मातीत गुरूवारच्या दिवशी केवळ माणसांची गर्दी नव्हती; ती होती एका नात्याची, एका विश्‍वासाची आणि एका काळजाच्या ओलाव

आमच्यात फाटले, उगीच शंका ठेवू नका
अजित पवार : टग्या ते लाचार नेता !
अजितदादांनी बीडच्या कलावंत व रसिकांना पावले

राज्यातील बारामतीतील काटेवाडीच्या मातीत गुरूवारच्या दिवशी केवळ माणसांची गर्दी नव्हती; ती होती एका नात्याची, एका विश्‍वासाची आणि एका काळजाच्या ओलाव्याची. अजित पवार यांच्या पार्थिवाच्या अंतिम दर्शनासाठी जमलेली गर्दी पाहता, हा केवळ एका नेत्याचा निरोप नव्हता, तर लाखो मनांच्या आधाराचा, धीराचा आणि आश्‍वासक आवाजाचा अंत होता. प्रत्येक डोळ्यात पाणी, प्रत्येक ओठांवर एकच प्रश्‍न-आता आमचं काय? प्रत्येकासाठी धावून जाणारा आमचा नेता आज आम्हाला सोडून गेला, ही भावना केवळ शब्दांत व्यक्त झालेली नव्हती, ती प्रत्येक चेहर्‍यावर कोरलेली होती. काटेवाडी, बारामती आणि परिसरातील नागरिकांनीच नव्हे तर राज्यातील विविध जिल्हा, तालुक्यातील कार्यकर्त्यांनी, नेत्यांनी स्वतःला पोरके झाल्याची जी भावना व्यक्त केली, ती राजकीय नेत्याच्या जाण्यापेक्षा माणुसकीच्या नात्याच्या तुटण्याची जाणीव करून देणारी होती. राजकारणाच्या पलीकडे जाऊन, जनतेच्या दैनंदिन प्रश्‍नांशी थेट जोडले गेलेले नेतृत्व हरपल्याची ही वेदना होती.
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँगे्रसचे अध्यक्ष अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र हळहळतांना दिसून येत असतांनाच गुरूवारी त्यांच्यावर बारामतीमध्ये अंत्यंसंस्कार करण्यात आला. यावेळी कार्यकर्ते धाय मोकळून रडत होते. हॉस्पिटलमधून त्यांचा मृतदेह घेऊन जाऊ देत नव्हते, आमच्या दादांना घेऊन जाऊ नका, असं विनवत होते. एखाद्या नेत्यांसाठी इतकं प्रेम मिळणं दुर्मिळ. खरंतर अजितपवार यांच्यात एक शिस्त होती, तसाच त्यांच्यात खोडकरपणा देखील होता. अनेक सभांमधील वातावरण ते नेहमीच हलके-फुलके करायचे, सर्वांचा ताण हलका करायचे, मात्र त्याचबरोबर कुणी चुकत असेल तर, त्यांच्या बोलण्यात एक जरब असायची. त्यामुळे दादा सर्वांना आपलेसे वाटायचे. खरंतर दादांचे निधन झाल्यानंतर त्यांचे अंगरक्षक, कर्मचारी, सहकारी धाय मोकळून रडतांना दिसून आले. अनेक आमदार, खासदार, नेते, कार्यकर्ते आमचे अस्तित्व संपलं, अशा भावना व्यक्त करतांना दिसून येत होते, त्यामागचे प्रमुख कारण म्हणजे दादांचा विकासाचा वेग, निर्णय घेण्याची क्षमता मोठी होती. कोणतंही काम होत असेल तर, तात्काळ ते करण्याचे धाडस त्यांच्यात होते. निर्णय घेतांना त्याचे परिणाम नेमके काय होतील, याची ते कधीही पर्वा करत नसत. तर लोकांच्या हिताचा निर्णय घेऊन ते मोकळे होत असत. खरंतर दादांचे असं अकाली जाणं संपूर्ण महाराष्ट्राला पटलेलं नाही. दादांमध्ये वक्तशीरपणा होता. रात्री 11 वाजता झोपणे आणि सकाळी साडेपाच वाजता उठून, सात वाजता लोकांच्या गाठीभेठी घेऊन त्यांच्या कामाचा धडाका सुरू व्हायचा. दादांचे राहणीमान देखील कमालीचे भारी होते. कोणत्या वेळी कोणते कपडे घालायचे, त्याचबरोबर आपले कपडे नीट-नेटके राहायला हवे, याची ते कमालीची दक्षता घ्यायचे. त्यामुळे एकीकडे वक्तशीरपणा तर दुसरीकडे नीट-नेटकेपणा त्यांच्यात नेहमी दिसून येतो.
अजित पवार हे केवळ सत्तेतील पद नव्हते; ते अनेकांसाठी थेट मदतीचा, निर्णयक्षमतेचा आणि तत्काळ प्रतिसादाचा चेहरा होते. पाणी, शेती, रोजगार, आरोग्य, शिक्षण-प्रत्येक विषयात ‘दादा आहेत’ ही भावना लोकांना आधार देत होती. म्हणूनच एका निवृत्त सैनिकाने व्यक्त केलेली भावना फार बोलकी आहे-अजित दादांची जागा कोणीच घेऊ शकत नाही. हे वाक्य केवळ श्रद्धांजली नाही, तर नेतृत्वाच्या दुर्मिळतेची कबुली आहे. तरीही, त्या सैनिकाच्या शब्दांत आशेची एक काडी होती-कोणीतरी त्यांची जागा घेण्यासाठी देवाने तयार करावे. हा विरोधाभासच आजच्या परिस्थितीचं वास्तव सांगतो. माणूस अमरत्व नसतो, पण व्यवस्था चालू राहावी लागते. मात्र, त्या व्यवस्थेला आत्मा देणारे नेतृत्व पुन्हा निर्माण होणे किती कठीण असते, हे अशा प्रसंगी प्रकर्षाने जाणवते. महिलांच्या भावना तर अधिक हृदयद्रावक होत्या. दादा महाराष्ट्राचे वाघ होते. आता आमचा वाघ आम्हाला सोडून गेला, असे म्हणताना त्या महिलेच्या शब्दांत अभिमानही होता आणि असहाय्य वेदनाही. ‘लाडक्या बहिणी’ म्हणून त्यांनी ज्यांना संबोधले, त्या नात्यातील जिव्हाळा हा कोणत्याही राजकीय भाषणात मावणारा नव्हता. आयुष्यभर विसरणार नाही ही घोषणा म्हणजे स्मृतींच्या शाश्‍वततेची हमी होती. बारामतीच्या पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर रुग्णालयात उसळलेली गर्दी आणि गगनभेदी घोषणा हे त्या नात्याचं सार्वजनिक प्रकटीकरण होतं. ‘अजित पवार अमर रहे’, ‘परत या, परत या’ या घोषणा वास्तव बदलू शकत नसल्या, तरी त्या लोकांच्या मनातील रिकामेपणाला शब्द देत होत्या. एकच वादा, अजितदादा हा नारा म्हणजे पर्यायहीनतेची कबुलीच होती.अग्रलेख म्हणून या घटनेचा विचार करताना, केवळ भावनांपुरते थांबणे पुरेसे नाही. अजित पवार यांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या राजकारणात निर्माण झालेली पोकळी ही व्यक्ती-केंद्रित राजकारणाच्या मर्यादा आणि ताकद दोन्ही दाखवते. लोकांशी थेट जोडलेले नेतृत्व किती प्रभावी असते, हे या गर्दीतून स्पष्ट होते. मात्र, अशी व्यक्ती व्यवस्था बनून उभी न राहिल्यास, तिच्या जाण्यानंतर निर्माण होणारी पोकळी अधिक वेदनादायक ठरते.आज जनतेची अपेक्षा केवळ श्रद्धांजलीपुरती नाही; ती वारसा जपण्याची आहे. निर्णयक्षमतेचा, संवेदनशीलतेचा आणि लोकाभिमुखतेचा वारसा पुढे नेण्याची जबाबदारी आता उरलेल्यांवर आहे. अजित पवार परत येणार नाहीत, ही कटू वस्तुस्थिती आहे. पण त्यांनी निर्माण केलेली कामाची पद्धत, लोकांशी संवादाची शैली आणि प्रश्‍न सोडवण्याची तत्परता जिवंत ठेवता येऊ शकते. काटेवाडीतील अश्रू, बारामतीतील घोषणा आणि महाराष्ट्रभरातील शोकभावना एकच सांगते-नेते जातात, पण काही जण इतिहासात नाही, तर लोकांच्या काळजात कायमचे स्थान मिळवतात. अजित पवार हे त्याच प्रकारचे नेतृत्व होते. त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी भरून निघेल की नाही, हा प्रश्‍न उघडाच आहे. पण त्यांच्या आठवणी मात्र महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनात दीर्घकाळ मार्गदर्शक ठरत राहतील, यात शंका नाही.

COMMENTS