सामान्य श्रेणीतील विरोध अन्याय्य ः मायावतीलखनौ : विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यूजीसी) नव्या नियमांविरोधात देशभरात सुरू असलेल्या आंदोलनांच्या पार्श्

सामान्य श्रेणीतील विरोध अन्याय्य ः मायावती
लखनौ : विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यूजीसी) नव्या नियमांविरोधात देशभरात सुरू असलेल्या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर, बहुजन समाज पक्षाने (बसपा) या नियमांचे समर्थन केले आहे. विशेषतः उच्च शिक्षण संस्थांमध्ये समता समिती (इक्विटी कमिटी) स्थापन करण्याच्या निर्णयाला बसपा प्रमुख मायावती यांनी ठाम पाठिंबा दिला असून, सामान्य श्रेणीतील काही घटकांकडून होत असलेला विरोध चुकीचा असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे.
मायावती यांनी बुधवारी सोशल मीडियावर प्रतिक्रिया देताना स्पष्ट केले की, देशातील सरकारी महाविद्यालये आणि खासगी विद्यापीठांमध्ये जातीय भेदभाव रोखण्यासाठी यूजीसीने समता समितीची तरतूद केली आहे. मात्र, या तरतुदींना काही सामान्य श्रेणीतील लोकांकडून भेदभावपूर्ण आणि स्वतःविरुद्धचे असल्याचा आरोप करत विरोध केला जात आहे, जो पूर्णपणे अन्यायकारक आहे, असे त्यांनी नमूद केले. त्याचवेळी, अशा महत्त्वाच्या नियमांची अंमलबजावणी करताना सर्व संबंधित घटकांना विश्वासात घेणे अधिक योग्य ठरले असते, असेही मायावती यांनी सांगितले. तसे झाले असते तर समाजात निर्माण होणारा अनावश्यक तणाव टाळता आला असता. या संदर्भात केंद्र आणि राज्य सरकारांसह शैक्षणिक संस्थांनीही संवेदनशीलतेने विचार करण्याची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. दलित आणि मागासवर्गीय समाजातील लोकांना उद्देशून त्यांनी आवाहन केले की, काही स्वार्थी आणि भ्रष्ट नेत्यांच्या भडकाऊ वक्तव्यांना बळी पडू नये. समाजात द्वेष पसरवणार्या राजकारणापासून सावध राहणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
दरम्यान, बारामती येथे झालेल्या विमान अपघातात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाबद्दलही मायावती यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातील एक अनुभवी आणि प्रभावी नेतृत्व हरपल्याची भावना व्यक्त करत, त्यांच्या कुटुंबीयांप्रती आणि पक्षातील सहकार्यांप्रती त्यांनी मनापासून संवेदना व्यक्त केल्या आहेत. देव त्यांना हे दु:ख सहन करण्याची शक्ती देवो, अशी प्रार्थनाही त्यांनी केली आहे.

COMMENTS