नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतील हवेच्या गुणवत्तेत पुन्हा एकदा चिंताजनक घसरण नोंदवण्यात आली आहे. एअर क्वालिटी अर्ली वॉर्निंग सिस्टीम फॉर दिल्लीच्या

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतील हवेच्या गुणवत्तेत पुन्हा एकदा चिंताजनक घसरण नोंदवण्यात आली आहे. एअर क्वालिटी अर्ली वॉर्निंग सिस्टीम फॉर दिल्लीच्या ताज्या अहवालानुसार, मंगळवारी सकाळी दिल्लीचा वायू गुणवत्ता निर्देशांक 281 इतका नोंदवण्यात आला असून तो ‘खराब’ श्रेणीत मोडतो.
गेल्या आठवड्यात हवामानातील बदलामुळे वार्याचा वेग आणि दिशा बदलली होती. त्यामुळे काही काळासाठी प्रदूषणाच्या पातळीत घट होऊन नागरिकांना दिलासा मिळाला होता. त्या कालावधीत हवेची गुणवत्ता ‘मध्यम’ स्तरावर पोहोचली होती. शनिवारी एक्यूआय 192, तर रविवारी 152 इतका नोंदवण्यात आला होता. मात्र, हा दिलासा अल्पकाळ टिकला असून पुन्हा प्रदूषणात वाढ झाल्याचे चित्र आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (सीपीसीबी) माहितीनुसार, दिल्लीतील अनेक भागांमध्ये मंगळवारी एक्यूआय अत्यंत उच्च पातळीवर नोंदवण्यात आला. अलीपूर, आनंद विहार, वजीरपूर, जहांगीरपुरी, रोहिणी आणि विवेक विहार या भागांमध्ये एक्यूआय 350 च्या पुढे गेल्याने परिस्थिती अधिक गंभीर असल्याचे दिसून येते. काही भागांत मात्र तुलनेने कमी, म्हणजेच मध्यम पातळीचा एक्यूआय नोंदवण्यात आला आहे. हवेची गुणवत्ता मोजण्यासाठी एक्यूआयचे वर्गीकरण करण्यात आले असून 0 ते 50 स्वच्छ हवा, 51 ते 100 समाधानकारक, 101 ते 200 मध्यम, 201 ते 300 खराब, 301 ते 400 अत्यंत खराब, तर 401 ते 500 दरम्यानचा निर्देशांक ‘गंभीर’ स्थिती दर्शवतो. तज्ज्ञांच्या मते, सतत खराब व अत्यंत खराब हवेचा श्वास घेतल्यास श्वसनसंस्थेचे विकार, डोळ्यांची जळजळ, हृदयविकार तसेच इतर गंभीर आरोग्य समस्या उद्भवू शकतात. विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि आधीपासून आजार असलेल्या व्यक्तींनी अतिरिक्त खबरदारी घेणे आवश्यक असल्याचे आवाहन करण्यात येत आहे.

COMMENTS