Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मराठवाड्यात सोयाबीनचे दर पाच हजारांच्या वर

सरकारी खरेदीपेक्षा खुल्या बाजारातच अधिक व्यवहारछ. संभाजीनगर : मराठवाड्यात सोयाबीनचे बाजारभाव सध्या पाच हजार रुपयांचा टप्पा पार करत असले तरी या दरव

साहित्य संमेलने ही माझ्यासाठी माणुसकीची तीर्थस्थळे – डॉ. बाबुराव उपाध्ये
निळवंड्याच्या लेबर ठेकेदारानेच विकले पुलाच्या कामाचे गज
क्रिसन परेरा अभिनेत्रीची तुरुंगातून सुटका

सरकारी खरेदीपेक्षा खुल्या बाजारातच अधिक व्यवहार
छ. संभाजीनगर : मराठवाड्यात सोयाबीनचे बाजारभाव सध्या पाच हजार रुपयांचा टप्पा पार करत असले तरी या दरवाढीचा प्रत्यक्ष फायदा बहुतांश शेतकर्‍यांना मिळताना दिसत नाही. हंगामाच्या सुरुवातीलाच मोठ्या प्रमाणावर विक्री झाल्याने शेतकर्‍यांकडील सोयाबीन जवळपास संपले असून मोजक्याच उत्पादकांकडे साठा शिल्लक आहे.
तीन महिन्यांनंतर सोयाबीनचे दर हमीभावाच्या जवळ पोहोचले असले तरी ही वाढ उशिरा झाल्याने शेतकर्‍यांची अपेक्षा अपूर्णच राहिली आहे. छत्रपती संभाजीनगर कृषी उत्पन्न बाजार समितीत अलीकडे सोयाबीनचा दर प्रतिक्विंटल 4,975 रुपये नोंदवण्यात आला. केंद्र सरकारने यंदा सोयाबीनसाठी प्रतिक्विंटल 5,328 रुपये हमीभाव जाहीर केला आहे. मात्र, हंगामाच्या बहुतांश काळात बाजारभाव चार हजार ते 4,400 रुपयांच्या दरम्यानच राहिल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले होते. राज्य सरकारने ‘नाफेड’मार्फत सोयाबीन खरेदी सुरू केली असली, तरी खरेदी केंद्रांवरील मर्यादित खरेदीच्या तुलनेत खुल्या बाजारातच अधिक उलाढाल झाल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात नऊ खरेदी-विक्री संघांच्या माध्यमातून तसेच खासगी व्यापार्‍यांकडून सोयाबीनची खरेदी करण्यात आली. मात्र, साठवणूक क्षमतेअभावी आणि रोख रकमेच्या गरजेमुळे अनेक शेतकर्‍यांनी सुरुवातीलाच माल विकला. जानेवारीच्या मध्यापासून आवक घटल्यानंतर बाजारभावात झपाट्याने वाढ झाली. त्यामुळे सध्या साठवणूकदार आणि व्यापार्‍यांना लाभ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, शेतकर्‍यांकडील शेतमाल संपल्याने वाढलेल्या दरांचा फायदा त्यांच्यापर्यंत पोहोचणार नसल्याचे वास्तव समोर आले आहे. दरम्यान, मराठवाड्यात सोयाबीनचे लागवड क्षेत्र दरवर्षी वाढत आहे. कापूस लागवडीचा वाढलेला खर्च आणि अपेक्षित दर न मिळाल्याने अनेक शेतकरी सोयाबीनकडे वळले आहेत. मात्र, हमीभाव आणि प्रत्यक्ष बाजारभावातील दरी कायम राहिल्यास या पिकाबाबतही शेतकर्‍यांमध्ये नाराजी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

COMMENTS