भाजप ही संघटनात्मक मूल्यांवर उभी असलेली चळवळ ः पंतप्रधान मोदीनवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाच्या 12व्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नितीन नबीन यांची बिनवि

भाजप ही संघटनात्मक मूल्यांवर उभी असलेली चळवळ ः पंतप्रधान मोदी
नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाच्या 12व्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नितीन नबीन यांची बिनविरोध निवड झाली असून, मंगळवारी पक्षाच्या केंद्रीय कार्यालयात याची औपचारिक घोषणा करण्यात आली. या प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह पक्षातील अनेक ज्येष्ठ नेते उपस्थित होते. पंतप्रधानांनी नितीन नवीन यांना पुष्पहार अर्पण करून त्यांचे अभिनंदन केले आणि शुभेच्छा दिल्या.
पदभार स्वीकारण्याच्या प्रक्रियेपूर्वीच पंतप्रधान मोदी यांनी नितीन नबीन यांच्या नेतृत्वगुणांचे कौतुक केले. जगातील सर्वात मोठ्या राजकीय पक्षाच्या अध्यक्षपदी त्यांची निवड ही कार्यकर्ताकेंद्रित विचारसरणीचे प्रतीक असल्याचे त्यांनी नमूद केले. भाजपा ही केवळ निवडणूक जिंकणारी यंत्रणा नसून, संघटनात्मक मूल्यांवर उभी असलेली चळवळ असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पंतप्रधान मोदी म्हणाले, नेतृत्व हे परंपरेतून घडते, अनुभवातून अधिक परिपक्व होते आणि जनसेवा व राष्ट्रसेवेच्या भावनेतून संघटनेला दिशा देते. भाजपाने शून्यापासून शिखरापर्यंतचा प्रवास अनुभवला असून, त्यामागे कार्यकर्त्यांचे योगदान अमूल्य असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी पक्षाच्या सर्व माजी राष्ट्रीय अध्यक्षांचा सन्मानपूर्वक उल्लेख केला.
संघटनेच्या विस्ताराइतकेच कार्यकर्त्यांच्या घडणीला महत्त्व देणे ही भाजपाची ओळख असल्याचे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. मी मुख्यमंत्री आणि पंतप्रधान झालो, तरी आजही स्वतःला भाजपाचा कार्यकर्ता मानतो, असे सांगत त्यांनी कार्यकर्त्यांच्या भूमिकेचे महत्त्व स्पष्ट केले. मी कार्यकर्ता आहे आणि नितीन नवीन माझे बॉस आहेत, या विधानाने सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. नव्या अध्यक्षांसमोर केवळ भाजपच नव्हे, तर राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील सर्व घटक पक्षांशी समन्वय साधण्याचेही महत्त्वाचे आव्हान असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. नितीन नबीन यांनी आतापर्यंत सक्षम आणि समन्वयक नेतृत्व म्हणून स्वतःला सिद्ध केले असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यंदा जनसंघाच्या स्थापनेला 75 वर्षे पूर्ण होत असल्याची आठवण करून देत, संघटनेसाठी पिढ्यान्पिढ्या त्याग आणि समर्पण करणार्या सर्व कुटुंबांप्रती पंतप्रधानांनी कृतज्ञता व्यक्त केली.
दरम्यान, अध्यक्षपद स्वीकारण्यापूर्वी नितीन नवीन यांनी राजधानीतील झंडेवाला देवी मंदिर, वाल्मीकि मंदिर, प्राचीन हनुमान मंदिर आणि गुरुद्वारा बंगला साहिब येथे जाऊन दर्शन घेतले. अवघ्या 45व्या वर्षी ते भाजपाचे सर्वात तरुण राष्ट्रीय अध्यक्ष ठरले असून, यापूर्वी अमित शहा यांनी 49व्या वर्षी हे पद भूषवले होते. सोमवारी पार पडलेल्या निवडणूक प्रक्रियेत अन्य कोणतेही नामांकन दाखल न झाल्याने नितीन नवीन यांची बिनविरोध निवड निश्चित झाली. यापूर्वी 14 डिसेंबर 2025 रोजी त्यांची पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती.
देशासाठी पुढील 25 वर्षे निर्णायक
देशासाठी पुढील 25 वर्षे निर्णायक असतील, असे सांगत मोदी म्हणाले की, याच कालखंडात ‘विकसित भारत’ हे स्वप्न प्रत्यक्षात उतरवायचे आहे. नितीन नवीन हे नव्या पिढीचे प्रतिनिधित्व करत असून, आधुनिक तंत्रज्ञानाशी सुसंगत विचार असलेले नेतृत्व पक्षाला नवी ऊर्जा देईल, असेही त्यांनी नमूद केले. 21व्या शतकाच्या निर्णायक टप्प्यावर देश उभा असून, भाजपाची समृद्ध परंपरा पुढे नेण्याची जबाबदारी नितीन नवीन समर्थपणे पार पाडतील, असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला. रेडिओच्या युगापासून कृत्रिम बुद्धिमत्तेच्या काळापर्यंतचा प्रवास अनुभवणार्या पिढीचे प्रतिनिधित्व ते करतात, त्यामुळे कार्यकर्त्यांना सतत शिकण्याची प्रेरणा मिळेल, असेही ते म्हणाले.

COMMENTS