भाविकांच्या दर्शन सुलभतेसाठी मंदिर प्रशासनाचा महत्त्वाचा निर्णयडेहराडून : चारधाम यात्रेतील प्रमुख तीर्थस्थळे असलेल्या बद्रीनाथ आणि केदारनाथ मंदिर

भाविकांच्या दर्शन सुलभतेसाठी मंदिर प्रशासनाचा महत्त्वाचा निर्णय
डेहराडून : चारधाम यात्रेतील प्रमुख तीर्थस्थळे असलेल्या बद्रीनाथ आणि केदारनाथ मंदिर परिसरात मोबाईल फोन नेण्यावर आता पूर्णतः बंदी घालण्यात आली आहे. दर्शनावेळी होणारी गर्दी, दिरंगाई आणि शिस्तभंग टाळण्यासाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून, तो तत्काळ अंमलात आणण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
ऋषिकेश येथील ट्रान्झिट कॅम्प कार्यालयात गढवाल विभागीय आयुक्त विनय शंकर पांडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले. बैठकीत चारधाम यात्रेतील व्यवस्थापन, भाविकांची सुरक्षितता आणि दर्शन व्यवस्था अधिक सुलभ करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. मंदिर प्रशासनाच्या निदर्शनास आले होते की, गर्भगृहात दर्शन घेतल्यानंतर अनेक भाविक फोटो आणि सेल्फी काढण्यात गुंतून राहतात. त्यामुळे दर्शनाचा वेग मंदावतो, रांगा लांबतात आणि इतर भाविकांना अधिक वेळ प्रतीक्षा करावी लागते. काही वेळा यामुळे गोंधळाची स्थितीही निर्माण होत असल्याचे आढळून आले होते. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने कठोर पावले उचलण्याचा निर्णय घेतला. भाविकांना कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी मंदिर परिसराबाहेर मोबाईल फोन सुरक्षित ठेवण्याची योग्य व्यवस्था उभारण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला देण्यात आले आहेत. मंदिरांच्या जवळ सुसज्ज मोबाईल जमा केंद्रे उभारण्यात येणार असून, तेथे भाविक आपले मोबाईल सुरक्षितरीत्या ठेवू शकतील, अशी माहिती देण्यात आली आहे. भाविकांना शांत, सुलभ आणि सुरक्षित दर्शन मिळावे, ही बद्री-केदार मंदिर समितीची प्राथमिक जबाबदारी आहे. दर्शन प्रक्रियेत अडथळा ठरणार्या बाबींवर कठोर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे, असे विभागीय आयुक्त विनय शंकर पांडे यांनी स्पष्ट केले.
चौकट——-
50 मीटर परिसरात आधीच फोटोग्राफीस बंदी
प्रशासनाने यापूर्वीच, म्हणजे 2024 मध्ये, चारधाम मंदिरांच्या 50 मीटर परिसरात फोटोग्राफी आणि सेल्फी घेण्यावर बंदी लागू केली होती. मात्र, या नियमाचे अनेक वेळा उल्लंघन होत असल्याचे दिसून आले. छुप्या पद्धतीने मोबाईल वापरून फोटो काढल्याने दर्शनाच्या रांगांमध्ये वारंवार खोळंबा होत होता. त्यामुळेच आता मोबाईल फोन नेण्यावरच थेट बंदी घालण्याचा निर्णय घ्यावा लागल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

COMMENTS