शांतीब्रह्म नवनाथ बाबा महाराज यांचा भव्य पालखी सोहळाबीड । प्रतिनिधीगुरुवर्य वैकुंठवासी किसन बाबा महाराज यांनी सुरू केलेली गर्भगिरी पर्वत प्रदक्षिण

शांतीब्रह्म नवनाथ बाबा महाराज यांचा भव्य पालखी सोहळा
बीड । प्रतिनिधी
गुरुवर्य वैकुंठवासी किसन बाबा महाराज यांनी सुरू केलेली गर्भगिरी पर्वत प्रदक्षिणा श्री क्षेत्र गोरक्षनाथ टेकडी येथे भक्तिभावात पार पडली. यावेळी गुरुवर्य महंत शांतीब्रह्म नवनाथ बाबा महाराज यांच्या भव्य-दिव्य पालखी सोहळ्याने गर्भगिरी पर्वत प्रदक्षिणेस प्रारंभ झाला.
दरवर्षी पौष वद्य एकादशीला श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे संत निवृत्तीनाथ महाराज यांची ब्रह्मगिरी पर्वत प्रदक्षिणा यात्रा निघते. मात्र, जे भाविक ब्रह्मगिरी येथे प्रदक्षिणेस जाऊ शकत नाहीत, अशा भक्तांसाठी गुरुवर्य किसन बाबा महाराज यांनी श्री क्षेत्र गोरक्षनाथ टेकडी येथे गुरुवर्य गोरक्षनाथ महाराज यांच्या सान्निध्यात गर्भगिरी पर्वत प्रदक्षिणेची परंपरा सुरू केली आहे. या सोहळ्यात शांतीब्रह्म नवनाथ बाबा महाराज यांच्या पालखीसमवेत टाळ, मृदंग, वीणा, ढोल-ताशे, हलगी पथकांच्या गजरात हरिनामाचा जयघोष करण्यात आला. संत, महंत, टाळकरी, विणेकरी, वारकरी व ध्वजधारी यांच्या मागे हजारो भाविक भक्त मोठ्या श्रद्धेने गर्भगिरी पर्वत प्रदक्षिणेत सहभागी झाले होते.
गर्भगिरी पर्वत प्रदक्षिणेचे अध्यात्मिक महत्त्व
संत गहिनीनाथ महाराज यांना गुरु गोरक्षनाथ महाराज यांचा कृपाशीर्वाद होता. गहिनीनाथ महाराजांनी ब्रह्मगिरी पर्वत प्रदक्षिणेदरम्यान संत निवृत्तीनाथ महाराजांना अनुग्रह दिला. पुढे हा अनुग्रह संत ज्ञानेश्वर महाराजांना प्राप्त झाला. याच उपदेशातून वारकरी संप्रदायाची स्थापना झाली. त्र्यंबकेश्वर (नाशिक) येथे ब्रह्मगिरी प्रदक्षिणा करणे शक्य नसलेल्या भाविकांसाठी गोरक्षनाथ टेकडी येथे गर्भगिरी पर्वत प्रदक्षिणेची परंपरा सुरू करण्यात आली.

COMMENTS