Homeदखल

दादा, बेमूर्वत आणि अहंकाराचा फुगा फुटणारच!

 महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एकाच नावाची चर्चा असते, ती म्हणजे 'अजितदादा'. पण ही चर्चा त्यांच्या विकासकामांची नाही, तर त्यांच्या बेमूर्वतखोर व

अजित पवार यांचा राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल
आशुतोष पठ्ठ्या कामाला माझ्यासारखाच
टग्या नामोल्लेखाची सार्थकता !
 महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एकाच नावाची चर्चा असते, ती म्हणजे ‘अजितदादा’. पण ही चर्चा त्यांच्या विकासकामांची नाही, तर त्यांच्या बेमूर्वतखोर वागण्याची आणि सत्तेच्या माजानी आलेल्या बेजबाबदारपणाची आहे. “मी म्हणेन तीच पूर्व दिशा” अशा थाटात वागणाऱ्या या नेत्याला आता सामाजिक भानाचा पूर्ण विसर पडल्याचं स्पष्ट दिसत आहे.
    अजितदादांवर सर्वात गंभीर आरोप होतोय तो म्हणजे मागासवर्गीयांच्या निधीवर डल्ला मारण्याचा. दलित, आदिवासी आणि उपेक्षितांच्या कल्याणासाठी असलेला हक्काचा पैसा स्वतःच्या मर्जीतील कामांकडे वळवण्यात अजितदादांना असूरी आनंद होतो.
   समाजकल्याण विभागाचा पैसा आपल्या ‘मर्जीतील’ मतदारसंघांत आणि मर्जीतील कंत्राटदारांच्या घशात घालण्याचे पाप त्यांनी केले आहे. ज्या हातांना मदतीची गरज होती, त्या हातांना रिकामं ठेवून स्वतःची सत्ता टिकवण्यासाठी तिजोरीची लूट करणे, हा कोणत्या प्रकारचा न्याय आहे? हा निव्वळ मागासवर्गीयांच्या हक्कावर मारलेला दरोडा आहे.
त्यांनी अलीकडेच ‘बार्टी’च्या (डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था) पीएचडी संशोधक विद्यार्थ्यांबाबत जे गरळ ओकलं आहे, ते पाहून उभ्या महाराष्ट्राने कपाळावर हात मारून घेतला आहे. “सगळ्यांनाच फेलोशिप द्यायला सरकार काय बापाचं आहे का?” अशा आशयाची भाषा वापरून दादांनी केवळ विद्यार्थ्यांचाच नाही, तर ज्या महामानवाच्या नावाने ही संस्था चालते, त्या विचारांचाही अपमान केला आहे.
  अजित पवारांची बोलीभाषा म्हणजे जणू काही समोरच्याला तुच्छ लेखण्याचा परवानाच. त्यांच्या सडेतोडपणाच्या नावाखाली चालणारा उद्धटपणा अख्ख्या महाराष्ट्रानं पाहिला आहे. “आमचं ठरलंय” म्हणत लोकशाहीचा गळा आवळताना त्यांना कसलीच शरम वाटत नाही. त्यांना वाटतं की महाराष्ट्र म्हणजे त्यांची खासगी जहागीर आहे. अधिकाऱ्यांना झापणं असो किंवा पत्रकारांना उडवून लावणं, यातच त्यांना पुरुषार्थ वाटतो. ही बेमूर्वत वृत्ती महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकारणाला लागलेली कीड आहे.
    राज्यात शेतकरी आत्महत्या करत आहेत, तरुण बेरोजगार फिरत आहेत, पण दादांना फक्त ‘सत्तेची समीकरणं’ जुळवण्यात रस आहे. सकाळी शपथ घेणं आणि संध्याकाळी भूमिका बदलणं, यात त्यांनी पीएचडी केली आहे. या सत्तेच्या हव्यासापोटी त्यांनी नाती जपली नाहीत, ना विचारधारा. ज्यांना समाजाच्या प्रश्नांशी काही घेणं-देणं नाही, ज्यांना फक्त ‘तिजोरीच्या चाव्या’ महत्त्वाच्या वाटतात, तो लोकनेता असूच शकत नाही.अजितदादांच्या मते, सगळ्यांनीच पीएचडी कशाला करायची? मग काय, बहुजनांच्या मुलांनी फक्त हातावर पोट भरायचं आणि सत्तेच्या पाठीमागे सतरंज्या उचलायच्या का?
“बाबासाहेबांनी सांगितलं होतं ‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा’. पण दादांना वाटतंय ‘शिकू नका, फक्त आमचा जयजयकार करा’.” संशोधनामुळे समाजाची प्रगती होते, हे समजून घेण्याइतकी वैचारिक प्रगल्भताच काय पण, साधी पात्रता देखील त्यांची नाही. बार्टीचा निधी रोखणे किंवा फेलोशिपमध्ये कपात करणे हा या विद्यार्थ्यांच्या भविष्यावर केलेला सर्जिकल स्ट्राईक आहे. बार्टीच्या (BARTI) पीएचडी संशोधक विद्यार्थ्यांनी आपल्या हक्काच्या फेलोशिपसाठी आझाद मैदानावर उन्हातान्हात बसून आंदोलन केलं, तेव्हा या ‘दादा’ सरकारला पाझर फुटला नाही. उलट, “सगळ्यांनाच कशाला हवी फेलोशिप?” असा निर्लज्ज सवाल विचारून अजित पवारांनी या कष्टकरी, अभ्यासू तरुणांच्या जखमेवर मीठ चोळलं आहे. ही केवळ शाब्दिक चकमक नाही, तर बहुजन विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीला लाथ मारण्याचा प्रकार आहे. लक्षात ठेवा, बार्टीच्या विद्यार्थ्यांनी जे सोसलं आहे, त्याचा हिशोब ते मतपेटीतून नक्कीच पूर्ण करतील. तुम्ही निधी पळवाल, तुम्ही फेलोशिप रोखाल, पण तुम्ही त्यांच्या डोळ्यांतला जिद्दीचा अंगार विझवू शकणार नाही. हा ‘बेमूर्वतखोर’ आणि ‘मुजोर’ कारभार आता महाराष्ट्र जास्त काळ खपवून घेणार नाही! अजितदादा, लक्षात ठेवा, सत्तेची खुर्ची कायमस्वरूपी नसते. आज तुम्ही मागासवर्गीयांचा निधी पळवून स्वतःचं घर भरत असाल, पण उद्या हाच समाज तुम्हाला सत्तेच्या खाली खेचल्याशिवाय राहणार नाही. बेजबाबदारपणा आणि अहंकाराचा फुगा कधी ना कधी फुटतोच, आणि महाराष्ट्राच्या राजकारणात तो दिवस आता जवळ आला आहे! 

COMMENTS