Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

गुत्तेदार व महामार्ग प्रशासनाचा भोंगळ कारभार

नगर रोड परिसरातील रहिवासी धुळीने त्रस्त बीड । प्रतिनिधी बीड-नगर महामार्गावरील बालेपीर येथील करपरा नदीवरील पुलापासून ते ग्रामसेवक कॉलनीपर्यंत सुमारे अर

मनमाड महामार्गाच्या दुरावस्थेबाबत फलक लावून निषेध
Yeola : नगर – मनमाड महामार्ग रोखला…. (Video)
कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवरही मनमाड महामार्ग रखडलेला

नगर रोड परिसरातील रहिवासी धुळीने त्रस्त
बीड । प्रतिनिधी
बीड-नगर महामार्गावरील बालेपीर येथील करपरा नदीवरील पुलापासून ते ग्रामसेवक कॉलनीपर्यंत सुमारे अर्धा किलोमीटर अंतरावरील रस्त्याचे काम अर्धवट सोडून संबंधित गुत्तेदार पसार झाल्याने परिसरातील नागरिकांना प्रचंड धुळीचा त्रास सहन करावा लागत आहे. या गंभीर समस्येकडे महामार्ग प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे.
या परिसरातील रस्त्याचे काम वर्ष 2025 मध्ये अत्यंत संथ गतीने करण्यात आले. करपरा नदी पुलाजवळील भागापासून मुंडे हॉस्पिटल, भगवान नगर, पंडित नगर ते ग्रामसेवक कॉलनीपर्यंत एका बाजूचे डांबरीकरण अद्याप झालेले नाही. सध्या या कच्च्या रस्त्यावरून वाहतूक सुरू असल्याने वाहनांमुळे मोठ्या प्रमाणावर धूळ उडत असून ती पोलिस पेट्रोल पंप परिसर, इंद्रगस्त कॉलनी, काझी नगर, बालेपीर मस्जिदच्या पाठीमागील चार-पाच कॉलन्या तसेच भगवान नगर ते ग्रामसेवक कॉलनीतील घरांमध्ये शिरत आहे. धुळीमुळे घरातील भांडी, कपडे, फरशी तसेच स्वयंपाकघरातील अन्नपदार्थही दूषित होत असून महिलांमध्ये तीव्र नाराजी आहे. लहान मुले, वृद्ध नागरिक यांना श्वसनाचे व डोळ्यांचे आजार होऊ लागल्याने आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. नागरिकांचा स्वच्छ व शुद्ध हवेचा मूलभूत अधिकार गुत्तेदार व महामार्ग प्रशासनाकडून पायदळी तुडवला जात असल्याची भावना व्यक्त होत आहे. बालेपीर मस्जिद व महामार्गाच्या हद्दीवरून काही वाद असल्याचे समजते; मात्र या वादाचा त्रास सर्वसामान्य नागरिकांनी का सहन करावा, असा प्रश्न उपस्थित होत आहे. वादग्रस्त भाग वगळून उर्वरित रस्त्याचे काम तात्काळ पूर्ण करणे शक्य असतानाही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कार्यवाही होत नसल्याचा आरोप आहे. किमान वाद मिटेपर्यंत उरलेल्या भागावर एकपदरी डांबरीकरण तरी करावे, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. जिल्हाधिकारी हे कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळखले जात असल्याने त्यांनी तात्काळ हस्तक्षेप करून अर्धवट राहिलेले महामार्गाचे काम पूर्ण करावे व नागरिकांना धुळीच्या त्रासातून मुक्त करावे, अशी जोरदार मागणी होत आहे. अन्यथा हा प्रश्न पालकमंत्री ना. अजितदादा पवार यांच्यापर्यंत पत्रकारांमार्फत पोहोचवला जाईल, असा इशाराही नागरिकांकडून देण्यात येत आहे.

COMMENTS