गेवराईकरांसाठी वैचारिक मेजवानी गेवराई । प्रतिनिधी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले (3 जानेवारी), शिक्षणप्रेरिका फातिमा शेख (9 जानेवारी) आणि राजमाता जिजा
गेवराईकरांसाठी वैचारिक मेजवानी
गेवराई । प्रतिनिधी
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले (3 जानेवारी), शिक्षणप्रेरिका फातिमा शेख (9 जानेवारी) आणि राजमाता जिजाऊ (12 जानेवारी) यांच्या जयंतीनिमित्त मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित र. भ. अट्टल कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, गेवराई यांच्या वतीने दरवर्षी आयोजित करण्यात येणारी ‘जिजाऊ-सावित्री-फातिमा व्याख्यानमाला’ यंदा सातव्या व आठव्या जानेवारी 2026 रोजी संपन्न होणार आहे. या उपक्रमाचे हे पाचवे वर्ष आहे.
बुधवार, दि. 7 जानेवारी 2026 रोजी दुपारी 12.30 वाजता ‘गाऊ जिजाऊस आम्ही’ या विषयावर मराठीतील प्रख्यात कवी प्रा. इंद्रजीत भालेराव यांचे व्याख्यान होणार आहे. ग्रामीण जीवन, शेतकरी आणि सामाजिक जाणिवांचे प्रभावी दर्शन घडविणार्या त्यांच्या कविता मराठी साहित्यात विशेष स्थान राखून आहेत. ‘कुणब्याच्या पोरा आता लढायला शिक’, ‘माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता’, ‘शेतामध्ये माझी खोप’ यांसारख्या कवितांनी त्यांनी लोकप्रियतेचे शिखर गाठले आहे. त्यानंतर गुरुवार, दि. 8 जानेवारी 2026 रोजी दुपारी 12 वाजता महाराष्ट्रासह महाराष्ट्राबाहेरही गाजलेला एकपात्री नाट्यप्रयोग ‘मी सावित्री ज्योतिराव फुले’ सादर होणार आहे. या नाट्यप्रयोगाचे सादरीकरण म्हसवड (जि. सातारा) येथील सुप्रसिद्ध अभिनेत्री व सामाजिक कार्यकर्त्या प्रा. कविता म्हेत्रे करणार आहेत. विविध सामाजिक प्रश्नांवर लढाऊ भूमिका घेणार्या नेत्या म्हणूनही त्या परिचित आहेत. अट्टल महाविद्यालयाच्या गोदावरी सभागृहात होणार्या या दोन दिवसीय व्याख्यानमालेसाठी गेवराईकर रसिक व श्रोत्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. रजनी शिखरे यांनी केले आहे. या व्याख्यानमालेचे संयोजन महाविद्यालय विकास समितीचे सदस्य, वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व प्राध्यापकवृंद, प्रशासकीय कर्मचारी व विद्यार्थ्यांच्या सहकार्याने करण्यात आले आहे.

COMMENTS