Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

हजारो भाविकांच्या उपस्थितीत श्री यमाईदेवीचा रथोत्सव

औंध / वार्ताहर : महाराष्ट्रासह उत्तर कर्नाटकातील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या औंध येथील श्री यमाईदेवीचा वार्षिक रथोत्सव मोठ्या उत्साही

पुरंदरमधील जिल्हा बँकेस 22 कोटींचा नफा
पळशी-सिध्देश्‍वर कुरोली रस्ता खुला करण्याची मागणी; रस्त्यात चरी खणल्याने लोकांची गैरसोय; न्याय देण्याची मागणी
लोकशाहीच्या वृध्द्धीसाठी तरुणांनी मतदान करावे : जीवन गलांडे

औंध / वार्ताहर : महाराष्ट्रासह उत्तर कर्नाटकातील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या औंध येथील श्री यमाईदेवीचा वार्षिक रथोत्सव मोठ्या उत्साही वातावरणात हजारो भाविकांच्या उपस्थितीत झाला. आई उदे ग अंबे उदेच्या जयघोषाने औंधनगरी दुमदुमून गेली होती.
एका शतकाची परंपरा लाभलेल्या औंधच्या श्री यमाईदेवी रथोत्सवास दुपारी सव्वाबारा वाजता प्रारंभ झाला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ग्रामनिवासिनी श्री यमाई देवी मंदिरामध्ये श्री यमाईदेवीच्या उत्सवमूर्तीचे विधीवतपणे षोडषोपचारे पूजन करण्यात आले.
गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यांनी देवीची उत्थापना करून देवीची उत्सवमूर्ती सभामंडपात आणली. गायत्रीदेवी यांच्या हस्ते देवीच्या उत्सवमूर्तीचे विधिवतपणे पूजन करण्यात आले. यावेळी गणेश इंगळे (उपाध्ये), हेमंत हिंगे, प्रविण इंगळे, पुजारी बांधवांनी पौरोहित्य व मंत्रपठन केले. यावेळी दुध, दही, पुष्प अर्पण करून देवीची पूजा करण्यात आली. त्यानंतर देवीची चौपाळ्याजवळ प्रतिष्ठापणा करण्यात आली. ना. अजित पवार यांच्या हस्ते विधीवतपणे देवीचे पूजन करण्यात आले. त्यानंतर येथील ऐतिहासिक परंपरेनुसार सलामी देऊन प. पू. सुंदरगिरी महाराज यांंच्या हस्ते देवीची पालखीत प्रतिष्ठापना करण्यात आली. पालखीचे मानकरी भोई यांनी वाद्यवृदांच्या गजरात पालखीची फेरी रथापर्यंत नेली. यावेळी गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी, प. पू. सुंदरगिरी महाराज, प्रभाकर घार्गे, प्रभाकर देशमुख, भूमी इराणी, सुरेंद्र गुदगे, संदीप मांडवे, मनोज देशमुख, हणमंतराव शिंदे, राजेंद्र माने, आब्बास आत्तार, दिपक नलवडे, गणेश देशमुख, अमरशेठ देशमुख, तानाजी इंगळे, अनिल माने, शामपुरी महाराज, नवल थोरात, सपोनि गणेश वाघमोडे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
श्री यमाईदेवीच्या रथोत्सवास उत्साही वातावरणात सुरूवात झाल्यानंतर रथाचे मानकरी माळी, भाविक, ग्रामस्थांनी रथ ओढून मिरवणूकीस प्रारंभ केला. यावेळी राज्यासह परराज्यातून आलेल्या भाविकांनी श्री यमाई देवीचे दर्शन घेऊन रथावर एक रूपयांपासून ते दहा हजार रूपयांपर्यंतच्या नोटा, नारळाची तोरणे, फुलांच्या माळा, गुलाल खोबरे अर्पण केले व आई उदे ग अंबे उदेचा जयघोष केला. यावेळी रथाच्या अग्रभागी डवरी, सनईवाले, गोंधळी, दांडपट्टेवाले, आराधी, घडशी या देवीच्या सेवेकरी यांनी वेगवेगळ्या पेहरावात देवी चरणी आपली सेवा, कला सादर केली.
रथासमोर वाद्यवृंद पथके, लेझीम, बॅण्ड पथके, मोठ्या प्रमाणात सहभागी झाली होती. श्री यमाई श्रीनिवास विद्यालयाचे लेझीम, झांज पथकाने प्रात्यक्षिक सादर केली. ही रथोत्सव मिरवणूक चावडी चौक, मारूती मंदिर, बालविकास मार्गे ऐतिहासिक पद्माळे तळयावर नेण्यात आली. त्यानंतर सायंकाळी उशीरा पद्माळे तळ्यामध्ये देवीस अभिषेक करुन पंचोपचारे पूजन करण्यात आले. हा रथोत्सव सोहळा सुमारे सहा तास चालला. यावेळी परिसरातील विविध गावचे सरपंच, सोसायटी चेअरमन, विविध क्षेत्रातील मान्यवर ,पदाधिकारी उपस्थित होते.

COMMENTS