सातारा / प्रतिनिधी : या देशाच्या भूत-भविष्याच्या विचाराला आरंभ होण्याआधी मराठी साहित्य आणि संस्कृतीच्या गाभ्याला साहित्य संमेलनाने हात घातला आह

सातारा / प्रतिनिधी : या देशाच्या भूत-भविष्याच्या विचाराला आरंभ होण्याआधी मराठी साहित्य आणि संस्कृतीच्या गाभ्याला साहित्य संमेलनाने हात घातला आहे. मायमराठीच्या अस्तित्वाची लढाई आता आपल्या प्रत्येकाच्या उंबरठ्यावर येऊन पोचली आहे. उद्या तुमच्या देव्हार्यावर विठोबा समवेत ज्ञानेश्वर आणि तुकारामाच्या प्रतिमा टिकाव्यात असे वाटत असेल, तर वेळीच झोपेतून जागे व्हा. तुमच्या खांद्यावर झेंडा कोणत्याही जातीचा, पक्षाचा वा धर्माचा असुदे. त्याचा दांडा हा मराठीच असायला हवा. तुमच्या खांद्यावर पालखी कोणाचीही असुदे तिचा गोंडा मराठीच असायला हवा, अशी आग्रही भूमिका 99 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, ‘पानिपत’कार विश्वास पाटील यांनी मांडली.
धान्य पिकवणार्या प्रत्येक शेतकर्याच्या पत्नीचा व मातेचा गौरव व्हायला पाहिजे. त्यासाठी ‘लढाऊ धरतीमाता’ नावाची नवी योजना हाती घ्यावी, माफक दरात पुस्तक विक्रीच्या दुकानांना परवानगी द्यावी, ग्रंथालये, मराठी शाळा टिकविण्यासाठी प्रयत्न व्हावेत, महाराष्ट्रातच माय मराठीचे अध:पत होऊ नये या करीता सर्व स्तरांवर प्रयत्न व्हावेत, अशा सूचनाही त्यांनी केल्या.
साहित्य संमेलन म्हणजे केवळ हौशागौशांची जत्रा नसते, कोणा वधू-वरांच्या लग्नाचे ते वर्हाडही नव्हे; तर महाराष्ट्राच्या साहित्य, संस्कृती आणि अस्तित्वाला आकार व दिशा देणारी सर्वमान्य अशी प्रागतिक संघटना म्हणजे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होय, असे सांगून विश्वास पाटील पुढे म्हणाले, लेखक किंवा कवीला कोणतीही जात नसते. मात्र, त्याला धर्म असतो. जो धर्म असतो तो फक्त मानवता धर्म! जेव्हा जेव्हा भाषेवर, राष्ट्रावर आणि संस्कृतीवर संकट येते. तेंव्हा-तेंव्हा गेल्या दोनशे वर्षात सामाजिक नेतृत्वाची आणि प्रसंगी राजकीय पुढाकाराची भूमिकासुध्दा साहित्यिकांनी उचललेली आहे. कवीच्या हृदयातून आलेले सच्चे शब्द प्रसंगी सत्तेच्या सिहांसनासमोर झुकत नाहीत. हे या भूमितल्या साहित्यिकांनी वेळोवेळी दाखवून दिले आहे.
मराठीचे दालन दलित आत्मचरित्रांनी आणि कवितांनी, तसेच भटक्या विमुक्तांच्या कसदार लेखणीने समृध्द केले आहे. महाराष्ट्राच्या जिल्हा परिषदा आणि ग्रामीण भागातून अनेक कवयित्री आणि बालसाहित्यातील मंडळी साहित्य शारदेच्या दरबारात जोमाने पुढे येऊन भर घालताना दिसतात.
महानगर पालिकेच्या निवडणुकीसाठी आचारसंहिता घोषित झाली आहे. तुमची आचार संहिता असेल तर आमची विचार संहिता असते. तुमच्या आचारसंहितेची मुदत फक्त चारदोन आठवड्यांपुरती असते, तर साहित्य संमेलनाच्या मंथनातून निघालेल्या विचार शलाकांचा अंमल चार चार दशके सुध्दा टिकून राहतो हा या भूमीचा इतिहास आहे.
या संमेलनाचा अध्यक्ष या नात्याने ही संधी देशाच्या आझादीसाठी आणि संयुक्त महाराष्ट्रासाठी झुंज दिलेल्या एका कार्यकर्त्याच्या मुलाला मिळाली आहेच. पण त्याही पेक्षा एका अशिक्षित शेतकरी मातेच्या लेकरांकडे हे पद चालून आले आहे या गोष्टीचा मला अतिशय आनंद वाटतो. माझ्या साहित्यिक कारकीर्दीचा विचार करताना मला हाच प्रश्न पडतो, मी नेमका कोण आहे? झाडाझडती, लस्ट फॉर मुंबई, नागकेशर, दुडिया, अण्णाभाऊंची दर्दभरी दास्तान सारखी ग्रंथ संपदा लिहिणारा सामाजिक लेखक? की ऐतिहासिक कादंबरीकार? उजवा की डावा? मात्र माझ्या हाती मानवतेचे निशाण आहे. माझ्यातल्या कादंबरीकाराला सातारच्या सकस मातीने घडवले आहे ही वस्तुस्थिती आहे.

COMMENTS