औंध / वार्ताहर : सरसेनापती प्रतापराव गुजर यांची जन्मभूमी असलेल्या भोसरे, ता. खटाव येथील सुजित संपत जाधव यांची भारतीय सैन्यात लेफ्टनंट पदी निवड

औंध / वार्ताहर : सरसेनापती प्रतापराव गुजर यांची जन्मभूमी असलेल्या भोसरे, ता. खटाव येथील सुजित संपत जाधव यांची भारतीय सैन्यात लेफ्टनंट पदी निवड झाली आहे. त्यांच्या निवडीमुळे भोसरे ग्रामस्थांनी एकच जल्लोष केला आहे.
सुजित यांनी एका सामान्य, कष्टकरी शेतकरी कुटुंबात जन्म घेतला असून आपल्या जिद्द, चिकाटी आणि अखंड परिश्रमाच्या बळावर असामान्य अशी कामगिरी करत भारतीय सैन्यात ’लेफ्टनंट’ ही मानाची पदवी मिळवली आहे. त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण मराठी माध्यमातून भोसरे गावातील शाळेत झाले. त्यानंतर 12 वी पर्यंतचे शिक्षण सातारा येथे घेतले. पुणे येथून बी टेक ही पदवी प्राप्त केली. अभियांत्रिकी शिक्षणासोबतच पुढील परीक्षांची तयारी सातत्याने सुरू ठेवत सन 2024 मध्ये पदवी पूर्ण केली. प्रशिक्षणासाठी सुजित यांनी जानेवारी 2025 पासून डेहराडून येथील प्रतिष्ठित इंडियन मिलिटरी अकादमीत दाखल झाले. भारतीय सेनेच्या संपूर्ण वर्षभराच्या यशस्वी खडतर प्रशिक्षण पूर्तीनंतर दिनांक डिसेंबर 2025 रोजी त्याने लेफ्टनंट पदाची शपथ घेतली. इंडियन मिलिटरी अकादमी, डेहराडून येथे झालेल्या टीजीसी कोर्समध्ये प्रथम क्रमांक पटकावत त्यांनी महाराष्ट्राचा गौरव वाढवला आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांच्या हस्ते सिल्व्हर मेडल प्रदान करण्यात आले.
कठोर प्रशिक्षण, शिस्त, समर्पण आणि देशसेवेचे स्वप्न यामुळेच ही मोठी सिध्दी शक्य झाली. हा संपूर्ण खडतर प्रवास कुटुंबाच्या सहकार्याशिवाय अशक्य होता. या यशस्वी प्रवासात आई-वडिलांचे संस्कार, भावंडांची साथ, नातेवाईकांचे पाठबळ आणि सर्वांचे आशीर्वाद मला लाभले.
सुजित जाधव लेफ्टनंट

COMMENTS