Homeताज्या बातम्यासंपादकीय

जात-वर्ग-स्त्री विषमतेविरूध्द लढ्यांचे विद्यापीठ हरपले!

विसाव्या शतकाचे पाऊण शतक आणि एकविसाव्या शतकाचे पाव शतक, अशा जवळपास एकूण शतकाच्या आयुष्यात वेगवेगळे लढे लढलेले डॉ. बाबा आढाव यांच्या जाण्याने सक्र

भाजप प्रवक्त्या ते हाय कोर्टाच्या न्यायमूर्ती देशाच्या लोकशाहीचा उलटा प्रवास सुरू !
चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सल्फर, ऑक्सिजन असल्याचे पुरावे; इस्त्रोने दिली मोठी अपडेट
आम्ला गावात 14 वर्षीय मुलीचा बालविवाह उधळला

विसाव्या शतकाचे पाऊण शतक आणि एकविसाव्या शतकाचे पाव शतक, अशा जवळपास एकूण शतकाच्या आयुष्यात वेगवेगळे लढे लढलेले डॉ. बाबा आढाव यांच्या जाण्याने सक्रिय लढ्यांचे एक विश्व हरवले. सुरूवातीला समाजवादी विचारसरणीतून आपल्या सार्वजनिक आयुष्याची सुरुवात करणारे, डॉ. बाबा आढाव यांनी वैद्यकीय क्षेत्रातील पदवी घेऊनही प्रॅक्टिस मध्ये ते रमले नाहीत. सुरूवातीला १४ वर्षे प्रॅक्टिस केली असली तरी, त्या दरम्यान वेगवेगळ्या लढ्यात ते सामिल राहिले. याचा परिणाम पूर्णवेळ चळवळीत उतरण्यासाठी त्यांनी वैद्यकीय प्रॅक्टिस ला पूर्णविराम दिला. ज्या मुळशी तालुक्यातील धरणाविरोधात केलेल्या लढ्यात, बाबांनी सरकारला तर धारेवर धरलेच; परंतु, सरकारपेक्षा सरकारी व्यवस्थेचे लाभार्थी ठरणारे भांडवलदार असलेल्या व्यक्ती आणि प्रवृत्तींना त्या काळात बाबांनी आंदोलनाच्या माध्यमातून धडा शिकवला.‌ अर्थात, लढवय्या बाबांना याच आंदोलनाच्या काळात क्रूर पोलीसी लाठीमारात आपला एक डोळा गमवावा लागला होता. खरेतर, तत्कालीन सर्वात मोठे भांडवलदार असलेल्या टाटा उद्योगाने शेतकऱ्यांच्या जमिनी हडपण्याचे एक सुनियोजित षडयंत्र यशस्वी करण्याचा डाव आखलेला असताना, बाबांच्या आंदोलनामुळे सरकारला कायदा करावा लागला, ‘आधी पुनर्वसन मग धरण’, या मागणीतून ‘महाराष्ट्र राज्य धरण व पुनर्वसन कायदा – १९७६’ हा कायदा अस्तित्वात आला. डॉ. बाबा आढाव यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनाला मिळालेल्या या यशाचे श्रेय बाबांना देण्यास समाजवादी आणि कम्युनिस्ट राजी नव्हते. वास्तविक, बाबांच्या या आंदोलनाला मिळालेले यश म्हणजे शेतकऱ्यांसाठी दिलेला आणि यशस्वी केलेला वर्ग लढाच होता. वर्गलढ्यात अन्य कुणालाही यश मिळणे म्हणजे समाजवादी आणि डाव्या वर्णवर्चस्ववादी व्यवस्थेला स्वीकार्य राहत नाही. डॉ. बाबा आढाव यांनी स्थापन केलेल्या हमाल-मापाडी पंचायत आणि त्या माध्यमातून दिलेला लढा यशस्वीतेपर्यंत नेला. असंघटित कामगार असणाऱ्या हमाल-मापाडींना आज महाराष्ट्रात जे अधिकार आणि सुविधा मिळाल्या त्याचे करविते फक्त बाबा आहेत, असं म्हटलं तर अधिक उचित ठरेल. ६० च्या दशकात त्यांनी सुरू केलेला हा लढा त्यांच्या आयुष्यातील अखेरच्या क्षणापर्यंत सुरू राहिला. ‘कष्टाची भाकर’ या त्यांच्या संकल्पनेला त्यांनी प्रत्यक्ष साकार करून दाखवले. याचा परिणाम असा झाला की, १९९५ च्या काळात युती सरकारने ‘झुणका भाकर’, केंद्र महाराष्ट्रात सुरू केले. केंद्र सरकारमध्ये रेल्वे मंत्री असणाऱ्या ममता बॅनर्जी यांनी याच संकल्पनेवर आधारित ‘जनता भोजन’ ही योजना देशाच्या प्रत्येक रेल्वे स्टेशनवर सुरू केली. अजूनही ही योजना अधिकृतपणे बंद केलेली नाही.
      डॉ. बाबा आढाव यांच्या सार्वजनिक आयुष्याची सुरुवात समाजवादी म्हणून झाली असली तरी, त्यांनी १९७२ मध्ये थेट महात्मा फुले यांच्या सत्यशोधक चळवळीला महाराष्ट्रात सक्रिय करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयाला समाजवादी सेम यांनी साथ दिली नाही; किंबहुना, त्यांनी सत्यशोधक होण्यापासून बाबांना रोखण्याचा प्रयत्न केला.‌पण, रोखले जातील ते बाबा कसले! बाबांनी सत्यशोधक बनताना तो वैचारिक पातळीवर बहीप्रवाही करण्याचा प्रयत्न केला.‌ महात्मा फुले, महात्मा गांधी, जातीव्यवस्था व स्त्रीदास्य विरोधी डॉ. आंबेडकर आणि डॉ राममनोहर लोहिया यांच्या विचारांची एक गोळाबेरीज करून त्यांनी सत्यशोधकाचा  नवा प्रवाह सुरू केला. त्यांचे हे विचार समाजवादी नेतृत्वाला पटणारे नव्हतेच. पण, पुढे जेव्हा तुरूगवासाचे अनुभव लिहीताना त्यांनी आर‌एस‌एसवर केलेली टीका एस. एम. जोशी सारख्या नेत्यांना सहन झाली नाही. २८ नोव्हेंबर १९७२ लाच त्यांनी ‘महात्मा जोतिबा फुले समता प्रतिष्ठान ‘ ची स्थापना केली. अर्थात, समाजवादी पक्षाचे राजकारण त्यांनी त्याआधीच म्हणजे १९७१ लाच त्यागून दिले होते. महात्मा जोतिबा फुले समता प्रतिष्ठान च्या माध्यमातून त्यांनी सामाजिक लढे उभारले. मात्र, याच काळात महाराष्ट्रात शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली पुरोगामी लोकशाही दल म्हणजे ‘पुलोद’ ची स्थापना होऊन महाराष्ट्राच्या राजकारणात जनसंघ आणि संघाशी हातमिळवणी केली गेली होती. ही बाब सामाजिक पातळीवर अतिशय चिंतेची होती. त्यामुळे,  डॉ. बाबा आढाव यांनी असे मानले की, महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर जातीयवाद्यांशी सत्ताधाऱ्यांनी हात मिळवणी केली असून; याविरोधात लढा द्यावा लागेल, असा निर्धार केला.यातूनच त्यांनी पुणे ते औरंगाबाद असा लाॅंगमार्च काढला. ज्यातून त्यांनी नामांतराच्या लढ्यात सक्रिय सहभाग घेतला. या लढ्यातून त्यांनी जातीयवादाविरूध्द सक्रिय लढे उभारले. ‘एक गाव एक पाणवठा’ ही चळवळ याच दरम्यान त्यांनी सुरू केली.  राजस्थान उच्च न्यायालयाच्या आवारात बसवण्यात आलेल्या मनु’चा पुतळा हटविण्याची मागणी करित पुणे ते जयपूर पदयात्रा ही त्यांनी काढली. त्याचा परिणाम असा झाला की, आजही तेथील मनुच्या पुतळ्याचे अनावरण होऊ शकले नाही; तो पुतळा झाकलेल्या अवस्थेतच आहे. स्त्री मुक्ती लढ्याचे तर ते कृतीशील विद्यापीठ होते. स्त्री मुक्तीवर भाषण देण्याने नव्हे; तर, स्त्री घरात ज्या विना मोबदला श्रमते ते काम करण्यास पुरूषानेही हातभार लावावा, अशी केवळ भूमिकाच घेतली नाही; तर, प्रत्यक्ष घरापासून त्यांनी त्या कामाची सुरुवात केली आहे. महाराष्ट्राच्या समाजजीवनात डॉ. बाबा आढाव यांच्या जाण्याने खूप मोठी पोकळी निर्माण झाली आहे. ती भरून काढण्याचे आव्हान महाराष्ट्रासमोर असले तरी ते कठीण आहे !

COMMENTS