निवडणूक आयोग आणि वाद हा अलिकडचा एक शिरस्ता बनला आहे. याचे मुख्य कारण, जे सकृतदर्शनी दिसते ते हेच आहे की, लोकांच्या मनात निवडणूक विषयी ज्या अन

निवडणूक आयोग आणि वाद हा अलिकडचा एक शिरस्ता बनला आहे. याचे मुख्य कारण, जे सकृतदर्शनी दिसते ते हेच आहे की, लोकांच्या मनात निवडणूक विषयी ज्या अनेक शंका आहेत, त्यांच निरसन निवडणूक आयोग करताना दिसत नाही. याउलट, राजकीय पक्षांप्रमाणे आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडण्याचं काम आयोग सध्याच्या काळात करताना दिसतो, जे लोकांच्या बुद्धिला पटत नाही. काल, देखील निवडणूक आयोगाने दीर्घ काळानंतर आणि खासकरुन विरोधी पक्षाने ‘मतचोरी’, चे आरोप केल्यानंतर ही निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेणं टाळलं. मात्र, काल अचानक आयोगाने पत्रकार परिषदेचे आयोजन केले; ज्याचा विषय शेवटपर्यंत कळवला गेला नव्हता. थोडक्यात, म्हणजे निवडणूक आयोग आपला विषय देखील पारदर्शकपणे मांडू शकत नाही, हे वास्तव त्यात दिसते, असा आरोप त्यांच्यावर आता केला जातोय. खरेतर, कालची पत्रकार परिषद ही राहुल गांधी यांच्या बिहार मधील मत अधिकार यात्रेच्या प्रारंभावरून लोकांचे आणि प्रसार माध्यमांचे लक्ष हटवणे, हेच होते. याचा अर्थ, सत्ताधारी पक्षाला मदत व्हावी, हा जो आरोप विरोधी पक्षनेते सातत्याने करित आहेत, त्यात तथ्य आहे, असेच वाटून जाते. या पत्रकार परिषदेत मुख्य निवडणूक आयुक्त यांचा रोख नाव न घेता लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांच्या विरोधात होता, हे स्पष्ट जाणवत होते. आयुक्तांनी सुरूवातीला निवेदन करतानाच असे म्हटले की, मतदार यादी आणि मतदान या दोन्ही भिन्न बाबी आहेत. एक मतदार दोन ठिकाणी नावे असली तरी एकाच ठिकाणी मतदान करू शकतो. आयुक्त जमिनी हकिकत ज्याला म्हणावं त्यापासून अनभिज्ञ आहेत. काही दिवसांपूर्वी सोशल मिडियावर एका मतदाराने कॅमेरा समोर अशी जाहीर कबुली दिली की, त्याने एकाच दिवशी सहा वेळा मतदान केले. दुसरी गोष्ट म्हणजे, मतचोरीचा जो आरोप विरोधी पक्ष नेत्याने केला तो आयोगाने प्रसूत केलेल्या मतदार यादी नुसारच केला होता. याचे वस्तुनिष्ठ निरसन अजूनही झालेले नाही.तसेच निवडणूक निकालानंतर ४५ दिवसांत मतदारांकडून विजयी उमेदवाराबाबत आक्षेप घेत न्यायालयात निवडणूक संदर्भात याचिका दाखल न केल्यास, पुन्हा मत चोरीचा आरोप करणे योग्य नाही. मतचोरीसारख्या शब्दाचा प्रयोग करुन जनतेची दिशाभूल करण्याचा अयशस्वी प्रयत्न असल्याचेही निवडणूक आयोगाने म्हटलं आहे. भारतीय संविधानाचा हा अपमान असल्याचेही मुख्य निवडणूक आयुक्तांनी म्हटले. निवडणूक आयोगाने एवढा स्वच्छ कारभार केला असेल तर, माजी निवडणूक आयुक्तांविषयी देश सोडून पळून गेल्याचे आरोप का होताहेत. ते पळून गेले नसतील तर, त्यावर माजी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांचे स्पष्टीकरण का आले नाही. काल ज्या वर्तमान मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांनी शेरोशायरी केली नसेल, परंतु, विरोधी पक्षांना जनतेच्या समोर ते शत्रुवत ठरवण्याचा केविलवाणा प्रयत्न करत होते. एका पत्रकाराने त्यांना थेट प्रश्न केला की, बिहारमध्ये सध्या पुराचे दिवस असताना आणि ते देखील अगदी कमी वेळ उरलेला असताना मतदार पुनर्निरीक्षण का करताहेत? बिहारचे वगळलेले ६५ लाख मतदारांची यादी विरोधी पक्ष मागणी करित असताना देण्यास नाकारणारे आता सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने यादी कशी देताहेत? शिवाय, महाराष्ट्रात अतिरिक्त मते आणि संध्याकाळी ६ वाजेनंतर वाढलेल्या मतदानाविषयी आयोग अजूनही उत्तर का देऊ शकला नाही? त्या पत्रकाराच्या या प्रश्नाचे उत्तर देणे मुख्य आयुक्तांना बंधनकारक वाटले नाही. तर, दुसऱ्या बाजूला म्हणजे थेट बिहारमध्ये राहुल गांधी यांच्या मत अधिकार यात्रेला लोकांनी तुफान गर्दी केली. यात बिहारच्या भागलपूर जिल्ह्यातील तराडी या मतदारसंघात ५० हजार मतदारांना मतदार यादीतून समाविष्ट न केल्याचा आरोप करून स्थानिक आणि प्रशासनातील अधिकारी मिळून हे करित असल्याचा आरोप मत अधिकार यात्रेतील अनेकांनी केला. बिहार च्या मत अधिकार यात्रेतील अनेकांनी कथन केलेल्या बाबी आणि निवडणूक आयोग सांगत असलेल्या बाबी परस्परविरोधी आहेत. त्यामुळे, आयोगाच्या कृतीकडे लोक संशयाने पाहत आहेत. परंतु, निवडणूक आयोग लोकांना वारंवार अपिल करताना दिसले.

COMMENTS