रशियाचे पाकिस्तान, चीनबद्दलचे धोरण बदलत असून तो पाकिस्तान आणि चीनकडे झुकतो आहे, अशी चर्चा सुरू झाली आहे.
रशियाचे पाकिस्तान, चीनबद्दलचे धोरण बदलत असून तो पाकिस्तान आणि चीनकडे झुकतो आहे, अशी चर्चा सुरू झाली आहे. भारताचा पारंपारिक मित्र असलेला रशिया, चीन आणि पाकिस्तानची बाजू घेणे भारताच्यादृष्टीने हितावह नक्कीच नाही. विशेषत: चीनच्या सीमारेषेवर असलेला तणाव आणि पाकिस्तानकडून सातत्याने दहशतवाद्यांची भारतात होणारी घुसखोरी पाहता रशियाचे होकायंत्र भारताकडून पाकिस्तान आणि चीनच्या दिशेने फिरणे भारताच्या सुरक्षेच्यादृष्टीने धोकादायक ठरणार आहे.
भारताचे सामरिक सामर्थ्य इतके आहे, की पाकिस्तान आता आपल्या खिजगिणतीतही नाही. आपले सैन्य विजयश्री खेचून आणेल यावर सर्वांचा विश्वास आहे. मोदी सरकारदेखील युद्धासाठी आवश्यक पैसे आणि साधने सैन्याला देऊ करेल तसेच कूटनीतीमध्ये सैन्याच्या हालचालींना पूरक नीती ठेवेल याची खात्री लोकांना आहे. प्रश्न एवढाच उरतो, की संकट आलेच तर कोणते देश आपल्या बाजूने उभे राहतील याची खरी चिंता आपणाला लागली आहे. 1971 च्या युद्धामध्ये जेव्हा भारतीय सैन्याने मोहीम आवरती घ्यावी, म्हणून भारतावर दडपण आणण्यासाठी अमेरिकेने आपले सातवे आरमार बंगालच्या उपसागरामध्ये पाठवले, तेव्हा त्याच्या तोडीस तोड जबाब देत रशियानेही आपले आरमार उपसागरामध्ये पाठवले होते. शिवाय हा प्रश्न जेव्हा युनोच्या सुरक्षा समितीसमोर चर्चेसाठी घेतला गेला तेव्हा रशियाने व्हेटो वापरून भारताची पाठराखण केली होती. सर्वसामान्य भारतीय माणूस आजही रशियाचे हे उपकार विसरलेला नाही. 1971 च्या युद्धापासून रशिया भारताला मदत करेल असे अढळ समीकरण भारतीयांच्या मनात ठसले आहे. शिवाय अमेरिका मात्र बेभरवशाची आहे असेही आपल्याला वाटत असते. अफगाणिस्तानचा अनुभव लक्षात घेता अमेरिका आज सोयीचे आहे म्हणून मदत करेल आणि वारे फिरताच आपल्याला वार्यावर सोडून निघूनही जाईल ही भीती आहे. भारताच्या समुद्रन हद्दीत नुकतीच घुसखोरी करून युद्धसराव केला. भारताची परवानगी घ्यावी, असेही त्याला वाटले नाही आणि आपण नियमांची आठवण करून दिल्यानंतर त्याला कचर्याची टोपली दाखवण्याचे काम अमेरिकेने केले. जागतिक सत्तासमीकरणासाठी आपली कोणाला तरी गरज आहे, हा दृढ विश्वास आता धोक्यात आला आहे. कोणताही देश मग तो रशिया असो की अमेरिका; शंभर टक्के बाबींकरिता आपल्या पाठीशी उभा राहणार नाही. भारत पूर्वी रशियाचा मित्र होता. आताही रशियाने भारताच्या मैत्रीपर्वाला धोका नाही, असे सांगितले असले, तरी बदलत्या जागतिक राजकारणात मात्र जुन्या मित्रांची मैत्री तशीच पुढे चालू राहण्याची शक्यता नाही. भारत आणि अमेरिकेतील वाढत्या मैत्रीपर्वाला शह देण्यासाठी पाकिस्तान आणि रशियाची मैत्री वाढत असेल, तर त्याचा आपण गांभीर्याने विचार करायला हवा.
जगात पूर्वी अमेरिका आणि रशियाच्या गटातील देश अशी उघडउघड विभागणी होत होती. भारत मात्र या दोन्ही गटांपासून अलिप्त होता. पाकिस्तान अमेरिकेच्या गटात मोडला जात होता. शीतयुद्ध संपल्यानंतर जगाची रचनाच बदलत गेली. शीतयुद्धापेक्षा आता व्यापारनीती महत्त्वाची ठरते आहे. अमेरिका आणि रशिया शस्त्रास्त्रांच्या विक्रीच्या नावाखाली जगातील अनेक देशांना आपल्या अंकित करून घेत. रशियात व्लादीमिर पुतीन यांनी सत्तेची सूत्रे हाती घेतल्यानंतर पुन्हा शीतयुद्धाला सुरुवात झाल्याचे दिसत आहे. रशियासारख्या देशाची अर्थव्यवस्था कच्चे तेल आणि शस्त्रास्त्रांच्या निर्यातीवर अवलंबून आहे. पुतीन एकाधिकारशाहीकडे झुकणारे आहेत. त्यांना रशियाला पुन्हा एकदा गतवैभव प्राप्त करून द्यायचे आहे. त्यासाठी त्याने शेजारच्या देशांचे लचके तोडून आपल्यात समाविष्ट करून घेण्याचे ठरविले आहे. क्रिमिया, युक्रेनबाबत जे घडले, ते जगाने पाहिले. मध्य पूर्वेतील रशियाचा वाढता हस्तक्षेप दिसला. ’इसिस’ ला शह देण्यासाठी रशियाने आखाती राष्ट्रात जे केले, ते ही दिसले आहे. आता अफगाणिस्तानमधून अमेरिकेचे सैन्य काढून घेण्याची तयारी सुरू असताना तिथे पाय पसरता येतील का, याकडे रशियाचे लक्ष आहे. अफगाणिस्तानातून सैन्य माघार घेण्याच्या वाटाघाटीत रशियाही सहभागी झाला आहे. अफगाणिस्तानातील सध्याचे सरकार भारताशी मैत्री ठेवणारे आहे. त्याला मुळात तालिबानला वाटाघाटीत सहभागी करून घ्यायचेच नव्हते; परंतु अमेरिकेने पाकिस्तान, रशिया, तालिबानला जेवढे स्थान दिले, तेवढे भारत आणि अफगाणिस्तानमधील सरकारला दिलेले नाही. अफगाणिस्तानातील तालिबान्यांना पाकिस्तानची असलेली फूस जगजाहीर आहे. त्यामुळे रशियाने आता अफगाणिस्तानसह दक्षिण आशियात आपले जाळे विस्तारण्यासाठी पावले टाकायला सुरुवात केली आहे. भारत हा रशियाचा जुना मित्र असला, तरी सध्या तो अमेरिकेच्या आहारी गेला आहे, याची जाणीव रशियाला आहे; परंतु अर्थचक्र सुरळीत ठेवण्यासाठी भारताशीही मैत्री सुरू ठेवायची आणि पाकिस्तानशी ती वाढवायची, अशी व्यूहनीती पुतीन यांनी आखली आहे. अमेरिकेबरोबर संबंध दृढ करण्याची गेल्या पंधरा वर्षांची प्रक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काळात चालूच राहिली आहे; मात्र मोदी सरकारने अमेरिकेबरोबरचे संबंध इतके वाढविले, की रशिया भारतापासून दुरावत चालला आहे. आता भारताबरोबरचे मैत्रीचे संबंध नावालाच उरले आहेत. भारताने अमेरिकेबरोबर राजकीय आणि लष्करी क्षेत्रात ज्या प्रकारचे करार केले आहेत, त्यामुळे रशिया नाराज आहे. रशिया व पाकिस्तान यांचे संबंध सोबत लष्करी सराव करणे, काही लष्करी उपकरणे देणं या टप्प्यावर आले आहेत. अफगाणिस्तानबाबतसुद्धा रशिया आणि पाकिस्तान यांच्या भूमिका एकमेकांना पूरक ठरू लागल्या आहेत. रशिया आणि पाकिस्तान मैत्रीला जोड मिळाली आहे, ती चीन आणि रशिया यांच्या अमेरिकेविरोधी युतीची. आशिया खंडात पाकिस्तान, रशिया आणि चीन हा त्रिकोण तयार होणे भारताच्या दृष्टीने अजिबात हिताचे नाही. त्यामुळे एकाच वेळी रशिया, चीन आणि पाकिस्तान या तिन्ही आघाड्यांवर भारतीय परराष्ट्र धोरणाची कसोटी लागत आहे. आता पाकिस्तान आणि रशियात झालेल्या कराराकडे पाहिले, तर भारताने चिंता करावी, अशी स्थिती आहे. पुतीन पाकिस्तानला मोकळेपणाने मदत करण्यास तयार आहेत. गॅस पाइपलाइन, कॉरिडोर, संरक्षण यासह इतर क्षेत्रात सहकार्याची आवश्यकता असल्यास रशिया मदतीस तयार असल्याचे रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्गेवू लावरोव यांनी स्पष्ट केले. पाकिस्तान-रशिया आधीपासून उत्तर-दक्षिण गॅस पाइपलाइन प्रकल्पावर एकत्र काम करत आहेत. रशिया पाकिस्तानमध्ये आठ अब्ज डॉलर गुंतवणूक करण्यास उत्सुक आहे. रशियन एअर डिफेन्स सिस्टीम खरेदी करण्याच्या शक्यतेबाबत पाकिस्तानी अधिकार्याने सांगितले, की रशिया पाकिस्तानसोबत संरक्षण क्षेत्रातही सहकार्य करण्यास उत्सुक आहे. लावरोव यांनी पाकिस्तानच्या दौर्यात केलेल्या घोषणेमुळे भारताची चिंता काही प्रमाणात वाढणार आहे.
COMMENTS