सोलापूर : देशातील मुलींचे भविष्य उज्ज्वल करायचे असेल, तर त्यांना सक्षम करणे ही काळाची गरज आहे. मुली सक्षम तेव्हाच होऊ शकतात, जेव्हा कुटुंब, समाज
सोलापूर : देशातील मुलींचे भविष्य उज्ज्वल करायचे असेल, तर त्यांना सक्षम करणे ही काळाची गरज आहे. मुली सक्षम तेव्हाच होऊ शकतात, जेव्हा कुटुंब, समाज आणि सरकार त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील. बालिका ही कुटुंबाची आणि समाजाची जबाबदारी आहे, हे मानून त्यांच्यावर विश्वास ठेवणे आणि त्यांना समान संधी दिली पाहिजे, असे प्रतिपादन बाल विकास प्रकल्प अधिकारी विशाल भोसले यांनी आज सोलापूर इथे केले. राष्ट्रीय बालिका दिनानिमित्त माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या केंद्रीय संचार ब्यूरो सोलापूर यांच्या वतीने सु.रा. मुलींची प्रशाला, सेवासदन येथे बालिका संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सहायक क्षेत्रीय प्रचार अधिकारी अंबादास यादव, बाल सरंक्षण अधिकारी रेश्मा गायकवाड, मुख्याध्यापिका राजश्री रणपिसे आणि माजी अधिकारी सतीश घोडके, पर्यवेक्षक स्वाती पोतदार, विस्तार अधिकारी ऋषिकेश जाधव उपस्थित होते.
रेश्मा गायकवाड म्हणाल्या की, राष्ट्रीय बालिका दिनाचे औचित्य साधून, मुलींच्या आकांक्षा आणि मेहनतीने समाजाला प्रेरणा मिळत आहे. मुलींनी शिक्षण आणि विविध क्षेत्रांमध्ये केलेल्या प्रगतीमुळे समाजात सकारात्मक बदल होत आहे. आजच्या मुली या फक्त घरासाठी नव्हे, तर देशाच्या उज्ज्वल भवितव्यासाठीही महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. मुलींच्या स्वप्नांना पाठबळ देऊन त्यांना यशस्वी करण्यासाठी पालक, शिक्षक आणि समाजाने सातत्याने प्रयत्नशील राहावे. मुख्याध्यापिका रणपिसे यांनी सेवासदन संस्थेच्या संस्थापिका तथा थोर महिला समाजसुधारक रमाबाई रानडे यांनी महिलांच्या सामाजिक सुधारणाविषयी केलेल्या कार्याची माहिती दिली. देशातील मुलींना सक्षम, शिक्षित आणि स्वावलंबी बनवणे हा राष्ट्रीय बालिका दिनामागचा खास उद्देश असून देशातील मुलींना त्यांचे अधिकार आणि हक्क यांबाबत जागृत करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. त्यासाठी केंद्र व राज्य सरकाकडून बेटी बचाओ बेटी पढाओ, सुकन्या समृद्धी योजना, उडान, किशोरवयीन सक्षमीकरण योजना, मिशन वासल्य, पोषण अभियान, विविध क्रीडा व शैक्षणिक उपक्रम आणि योजनांच्या माध्यमातून मुलींचे सक्षमीकरण होत आहे, असे अंबादास यादव यांनी प्रास्तविकेतून सांगितले. बालिका दिनानिमित्त विद्यार्थीनीसाठी मला अपेक्षित असेलेला भारत देश, सुकन्या समृद्धी योजनेची 10 वर्ष, विकसित भारतामध्ये महिलांचे योगदान विषयावर निबंध स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी बेटी बचाओ बेटी पढाओची सामूहिक प्रतिज्ञा घेण्यात आली.
COMMENTS