Homeताज्या बातम्या

१०० व्या ‘अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलना’साठी १८ कोटींचा निधी; मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांची घोषणा

पुणे: शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजनासाठी राज्य शासनाच्या मराठी भाषा विभागामार्फत एकूण १८ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून द

शेतकर्‍यांनी रोखला महामार्ग; अंबाजोगाई-लातूर वाहतूक विस्कळीत; हजारो शेतकर्‍यांच्या आंदोलनाने प्रशासनाचे वेधले लक्ष
साहित्यिक रुचिरा बेटकर यांना ‘डॉ. अण्णा भाऊ साठे गौरव पुरस्कार’; १ ऑगस्ट रोजी नांदेड येथे वितरण
स्व. अजित पवार व घुले पाटलांचे जिव्हाळ्याचे नाते होते : पाऊलबुद्धे
Marathi Sahitya Sammelan Funding; Minister Uday Samant Announces 18 Cr

पुणे: शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजनासाठी राज्य शासनाच्या मराठी भाषा विभागामार्फत एकूण १८ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला जाणार असल्याची घोषणा मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी गुरुवारी केली. पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात हे ऐतिहासिक संमेलन होणार असून, त्यासाठी शासनाकडून विविध उपक्रमांसाठी स्वतंत्र आर्थिक तरतूद करण्यात आली आहे.

महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कार्यालयाला भेट दिल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत सामंत यांनी ही माहिती दिली. शतकपूर्तीचे संमेलन अधिक व्यापक, दर्जेदार आणि सर्वसमावेशक पद्धतीने आयोजित करण्याचा शासनाचा मानस असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

अशी असणार निधीची विभागणी:

  • मुख्य संमेलन: यंदाच्या १०० व्या साहित्य संमेलनासाठी ३ कोटी रुपये दिले जाणार आहेत.
  • परदेशातील संमेलने: परदेशातील १२ देशांमध्ये आयोजित होणाऱ्या मराठी साहित्य संमेलनांसाठी २ कोटी रुपये उपलब्ध करून दिले जातील.
  • युवा साहित्य संमेलन: नव्याने सुरू करण्यात येणाऱ्या युवा साहित्य संमेलनासाठी राज्यातील १३ विद्यापीठांना प्रत्येकी २५ लाख रुपये, अशी एकूण साडेचार कोटी रुपयांची मदत दिली जाईल.
  • इतर तरतूद: ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी ५ कोटी रुपयांचा निधी, तसेच मराठी भाषा विभागाच्या प्रदर्शन दालनासाठी ५० लाख रुपयांची तरतूद करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी सामंत यांच्या हस्ते महाराष्ट्र साहित्य परिषदेला मागील वर्षी जाहीर करण्यात आलेल्या १ कोटी रुपयांच्या निधीचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. या पत्रकार परिषदेला महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष मिलिंद जोशी, कार्यवाह प्रकाश पायगुडे, तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.

साहित्य संमेलन हे केवळ शहरापुरते मर्यादित न राहता ग्रामीण भागातील साहित्यिकांनाही समान संधी मिळावी, यासाठी प्रयत्न केले जातील, असे सामंत यांनी सांगितले. मराठीतील उत्कृष्ट साहित्य इतर भाषांमध्ये आणि इतर भाषांतील दर्जेदार साहित्य मराठीत उपलब्ध व्हावे, यासाठी अनुवाद समिती पुन्हा सक्रिय करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच राज्यातील विविध बोलीभाषांचे जतन करण्यासाठी त्यांचे शब्दकोश तयार करून पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचे काम हाती घेतले जाईल, असेही त्यांनी नमूद केले.

COMMENTS