विक्रमासाठी सारं काही!

Homeसंपादकीयदखल

विक्रमासाठी सारं काही!

कोणताही विक्रम केला, तर तो कायम राहत नाही. विक्रम चांगल्या कारणासाठी मोडला, तर त्याचा आनंदच व्हायला हवा. आरोग्यासारख्या क्षेत्रात एकदा विक्रम करून भागत नसतं. तिथं कामगिरीत सातत्य ठेवावं लागतं.

सॅम पित्रोदा आणि विवाद ! 
मुंबई – महाराष्ट्राचे आर्थिक शोषक !
बिळात लपलेले मनुवादी अन् उतावीळ आव्हाड !

कोणताही विक्रम केला, तर तो कायम राहत नाही. विक्रम चांगल्या कारणासाठी मोडला, तर त्याचा आनंदच व्हायला हवा. आरोग्यासारख्या क्षेत्रात एकदा विक्रम करून भागत नसतं. तिथं कामगिरीत सातत्य ठेवावं लागतं. एका दिवशी अधिक काम आणि दुसर्‍या दिवशी शांत असं राहून चालत नसतं. त्यामुळं पहिल्या दिवशीच्या कामावर त्यामुळं पाणी फेरलं जातं. 

    धावण्याच्या शर्यतीत भाग घ्यायचा असेल, तर तो दररोज सराव करावा लागतो. एका दिवशी दहा किलोमीटर पळायचं आणि सात दिवस घरातून बाहेर पडायचं नाही. त्यामुळं धावण्याच्या शर्यतीत यश मिळत नसतं. कोरोनाच्या लसीकरणाचंही तसंच आहे. अमेरिका, जपान, ब्रिटन, इस्त्रायलसारख्या देशांनी लसीकरणात सातत्य ठेवलं. काही देश आता कोरोनामुक्त झालं. तिथं मुखपट्टी हद्दपार झाली. या देशांची लोकसंख्या कमी असल्याचं कारण पुढं केलं जाईलही; परंतु लस धोरणात तार्किकता आणि सातत्य असेल, तर लोकसंख्या हे कारण त्याआड येत नाही. चीननं हे दाखवून दिलं. विक्रमासाठी कोणत्याही गोष्टीचा इव्हेंट करण्यापेक्षा तिच्यात सातत्य किती आणि लोकांना त्याचा खरंच फायदा किती, याचा विचार व्हायला हवा. आपल्याला जागतिक विक्रम करण्याची घाई झालेली असते; परंतु एकदा विक्रम केला, की संपलं अशी आपली स्थिती होती. ज्यांच्या कामगिरीत सातत्य असतं, त्याचीच जग दखल घेत असते. ब्रायन लारापेक्षा सचिन तेंडूलकरची कामगिरी का लक्षात राहते, त्याचं कारणही विक्रमापेक्षा कामगिरीत सातत्य आणि प्रतिकूल परिस्थितीवर मात करून यश खेचून आणण्याची जिद्द हेच आहे. कामगिरीत सातत्य असलं, तरच खेळाडू जसा लक्षात राहतो आणि त्याला यशामागून यश मिळत जातं, तसंच सरकारी मोहिमांचंही असायला हवं. एकदा एखादं लक्ष्य प्राप्त झालं, की आपली इतिकर्तव्यता संपली असं मानण्यावर आपले नेते आणि प्रशासनही धन्यता मानायला लागते. कोरोना लसीकरणाचंही असंच झालं. एकदा नव्हे, तर दोनदा असाच प्रकार घडला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एप्रिलमध्ये लसोत्सव साजरा केला. एका दिवशी कोरोना लसीकरणाचा विक्रम झाला आणि त्यांनतर लसीकरणाचे आकडे सातत्यानं घटत गेले. त्यानंतर आता 21 जूनलाही सरकारनं तेच केले. एकाच दिवशी विक्रम करण्यासाठी अगोदरचे काही दिवस लसीकरणाचा वेग अतिशय कमी होता. विक्रमासाठी लसीचे डोस जणू राखून ठेवले होते, असंच आकडेवारी सांगते. त्यांनतरच्या दुसर्‍या दिवशी लसीकरणाचे आकडे एकदम कमी व्हायला लागले. लसीकरणाचा विश्‍वविक्रम जगाच्या लक्षात राहत नाही; परंतु देशात लसीकरणात किती गोंधळ झाला आणि धोरणात कशी धरसोड होते, हे सर्वोच्च न्यायालयानं निदर्शनास आणलेलं जगाच्या जास्त लक्षात राहिलं. लसीकरणातील गोंधळ, धोरणात्मक निर्णयातील अतार्किकता याचीच जास्त चर्चा होत राहिली.

नव्या मार्गदर्शक सूचनांनुसार कोरोनावरील लसीकरण सुरू होण्याच्या पहिल्याच दिवशी 81 लाखांहून अधिक नागरिकांना डोस देण्यात आला. एका दिवसात इतक्या मोठ्या संख्येत नागरिकांचं लसीकरण करण्याचा हा नवा विक्रम आहे. यापूर्वी पाच एप्रिलला 43 लाख नागरिकांना कोरोनावरील लसीचा डोस देण्यात आला होता. केंद्र सरकारनं आपल्या अधिकृत ट्वीटर हँडलवरून ट्वीट करत ही माहिती दिली. देशात आतापर्यंत 28 कोटी नागरिकांना कोरोनावरील लस देण्यात आली आहे. देशाची लोकसंख्या विचारात घेतली, तर हे प्रमाण 25 टक्क्यांच्या आत आहे. त्यातही पहिला डोस घेतलेल्यांची संख्या आणि दोन्ही लस घेतलेल्यांची संख्या विचारात घेतली, तर अजून आपल्याला मोठं उद्दिष्ट गाठायचं आहे, हे लक्षात येतं. विक्रमाच्या नावाखाली आव्हानं झाकली जाऊ शकत नाहीत. कोविन अ‍ॅपनुसार सोमवारी सर्वाधिक लसीकरण हे मध्य प्रदेशात झालं. राज्यात 14 लाख 71 हजार नागरिकांना लस दिली गेली. त्यानंतर कर्नाटकमध्ये दहा लाख 36 हजार आणि उत्तर प्रदेशात सहा लाख 57 हजार नागरिकांना डोस देण्यात आला. ही सर्व राज्यं भाजपशासित आहेत. विक्रमी लसीकरण झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला आहे. आजचं विक्रमी लसीकरण म्हणजे आनंदची गोष्ट आहे. कोरोनाविरोधी लढाईत लसीकरण हे आपलं सर्वात मोठं शस्त्र आहे, असं त्यांनी सांगितलं. कोरोनाविरोधाील लढ्यात लसीकरण हे शस्त्र असेल, तर ते एका दिवशी वापरायचं आणि महिनाभर खुंटीला टांगून ठेवायचं, असं चालत नसतं. ओडिशात एका 51 वर्षाच्या व्यक्तीनं 30 मिनिटांत लसीचे दोन्ही डोस घेतले. विक्रम करण्याच्या नादात असे काही अनुचित प्रकार घडले. भाजपशासित अनेक राज्यांमध्ये दररोज दिल्या जाणार्‍या कोविड-19 लसींची संख्या मंगळवारी नाट्यमयरित्या घसरल्यामुळं, सोमवारचा लसीकरणाचा ‘विक्रम’ कृत्रिमरित्या घडवलेला होता या शंकेला चांगलंच बळ आले आहे. ’स्क्रोल.इन’ या न्यूजपोर्टलनं मंगळवारी दिलेल्या बातमीनुसार, सोमवारच्या आधी अनेक दिवस भाजपशासित राज्यांमध्ये दररोज दिल्या जाणार्‍या लसींच्या सरासरी संख्येच्या तुलनेत खूप कमी लसी दिल्या जात होत्या. त्यामुळं सोमवारी या राज्यांमध्ये खूप मोठ्या संख्येनं लसी देणं शक्य झालं आणि ‘विक्रम’ प्रस्थापित झाला. 21 जून रोजी केंद्र सरकारनं बहुसंख्य लसींची खरेदी करण्यावरील व त्या राज्यांना मोफत वितरित करण्यावरील नियंत्रण पुन्हा आपल्या हाती घेतलं. एकंदर सोमवारी घडवण्यात आलेला हा विक्रम केंद्र सरकारची प्रतिमा उंचावण्यासाठी होता. गेल्या दोन महिन्यांत लसींचा तुटवडा निर्माण झाल्यामुळं केंद्र सरकारवर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती. त्या पार्श्‍वभूमीवर, हा विक्रम ठरवून घडवण्यात आला असावा, अशी शंका घेण्यास जागा आहे. को-विन पोर्टलवरील मंगळवारचा डेटा बघता, अनेक मोठ्या भाजपशासित राज्यांमध्ये देण्यात आलेल्या लसींचा आकडा सोमवारच्या तुलनेत लक्षणीयरित्या कमी होता. हा फरक मध्य प्रदेशात अधिक प्रकर्षानं दिसून आला. सोमवारी राज्यात 17 लाख 44 हजार नागरिकांना लस देण्यात आली. मंगळवारी मात्र पाच हजार नागरिकांना लस देण्यात आली. याचा अर्थ मंगळवारी देण्यात आलेल्या लसींचं प्रमाण सोमवारी देण्यात आलेल्या लसींच्या केवळ 0.3 टक्के होतं. हरयाणा आणि कर्नाटक या राज्यांमध्येही सोमवारी देण्यात आलेल्या लसीच्या तुलनेत मंगळवारी देण्यात आलेल्या लसींची संख्या खूपच कमी होती. हरयाणात सोमवारी पाच लाख 45 हजार डोस देण्यात आले, तर मंगळवारी केवळ 76 हजार डोस देण्यात आले. ही तब्बल 85 टक्के घट आहे. कर्नाटकात सोमवारी 11 लाख 59 हजार नागरिकांना लस दिल्यानंतर मंगळवारी केवळ तीन लाख 95 हजार नागरिकांचं लसीकरण झालं. त्या तुलनेत गुजरातची कामगिरी समाधानकारक आहे. सोमवारी देण्यात आलेल्या लसींच्या तुलनेत मंगळवारी देण्यात आलेल्या लसींच्या प्रमाणात किंचित घट दिसून आली. सोमवारी पाच लाख वीस हजार नागरिकांना लस देण्यात आली, तर मंगळवारी चार लाख 27 हजार नागरिकांचं लसीकरण करण्यात आलं. इतपत चढउतार यापूर्वीही अनेकदा अनेकविध घटकांमुळे आढळून आले आहेत. आसाममध्येही हीच स्थिती होती. सोमवारी आसाममध्ये दोन लाख 74 हजार नागरिकांचं लसीकरण करण्यात आलं, तर मंगळवारी दोन लाख 49 हजार नागरिकांना  डोस देण्यात आले. उत्तर प्रदेशात तर सोमवारच्या तुलनेत मंगळवारी अधिक नागरिकांचं लसीकरण झालं. सोमवारी सात लाख 68 हजार नागरिकांना, तर मंगळवारी आठ लाख 21 हजार नागरिकांना लस देण्यात आली. उत्तर प्रदेशनं सोमवारी नाही, तर मंगळवारी विक्रम केला. भाजपची सत्ता नसलेल्या मोठ्या राज्यांमध्ये हा प्रवाह दिसत नाही. केरळमध्ये सोमवारी दोन लाख 63 नागरिकांना डोस देण्यात आले, तर मंगळवारी दोन लाख तीस हजार डोस देण्यात आले. पश्‍चिम बंगालमधील सोमवार व मंगळवारचे आकडे अनुक्रमे तीन लाख 34 हजार व तीन लाख एक हजार होते. तेलंगणमध्ये सोमवार व मंगळवार या दोन्ही दिवशी सुमारे दीड लाख लोकांना डोस देण्यात आले. तमीळनाडूत मात्र लक्षणीय फरक दिसून आला. सोमवारी चार लाख 44 हजार नागरिकांना लस देण्यात आली, तर मंगळवारी दोन लाख 23 हजार नागरिकांचं लसीकरण करण्यात आलं. आंध्र प्रदेशानेही रविवारीच ‘विक्रम’ प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. रविवारी राज्यात 13 लाख 74 लाख डोस देण्यात आले. कोविन पोर्टलवरील डेटावरून असं दिसतं, की हा आकडा साध्य करण्यासाठी राज्य सरकारने यापूर्वी लसींची चांगलीच साठेबाजी केली आहे. ‘विक्रमी’ दिवसाच्या आधीचे पाच दिवस पाहिले, तर 15 जून रोजी सर्वाधिक 81 हजार 695 डोस देण्यात आले होते. रविवारी विक्रमी लसीकरण केल्यानंतर सोमवारी आणि मंगळवारी राज्यांतील लसीकरणाचे आकडे पुन्हा घसरले. या दोन्ही दिवशी केवळ 40 हजार डोस राज्यात देण्यात आले. महाराष्ट्राची मात्र मंगळवारची कामगिरी सोमवारच्या तुलनेत चांगली होती. राज्यानं सोमवारी तीन लाख 87 हजार लसी दिल्या, तर मंगळवारी पाच लाख 59 हजार डोस दिले गेले. 

COMMENTS