नगरसह दहा जिल्हे उद्यापासून निर्बंधमुक्त ; सर्व व्यवहार खुले

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नगरसह दहा जिल्हे उद्यापासून निर्बंधमुक्त ; सर्व व्यवहार खुले

राज्य सरकारने गोंधळानंतर अखेर अनलॉकची नवी नियमावली जाहीर केली.  महाराष्ट्रात पाच स्तरावर अनलॉक केले जाणार आहे.

देशसेवा व समाज कार्यात युवकांनी पुढाकार घ्यावा – हरिभाऊ डोळसे
जुनी पेन्शन योजना लागू करा – मा. आ. डॉ. सुधीर तांबे
दारुसाठी पैसे न दिल्याने मारहाण

मुंबई / प्रतिनिधी : राज्य सरकारने गोंधळानंतर अखेर अनलॉकची नवी नियमावली जाहीर केली.  महाराष्ट्रात पाच स्तरावर अनलॉक केले जाणार आहे. पहिल्या टप्प्यात अहमदनगरसह दहा जिल्हे असून, याल दहा जिल्ह्यांतील निर्बंध पूर्णतः उठवले आहेत. दर गुरूवारी स्थानिक स्तरावर आढावा घेऊन त्यापुढच्या सोमवारी निर्बंध आणखी सैल करायचे, की वाढवायचे याचा निर्णय घेण्याचे अधिकार स्थानिक स्तरावर देण्यात आले आहेत. 

     राज्य सरकारने जारी केलेल्या अनलॉकच्या 5 टप्प्यांच्या नियोजनानुसार राज्यातील जिल्हे, महानगरपालिकांची वर्गवारी पाच गटांमध्ये केली जाणार आहे. यामध्ये स्थानिक कोरोना पॉझिटिव्हिटी रेट आणि एकूण ऑक्सिजन बेड्सची ऑक्युपन्सी या प्रमाणावरून एक ते पाच टप्प्यांमध्ये ही वर्गवारी करण्यात आली आहे. त्यानुसार तिथले नियम बदलणार आहेत. अत्यावश्यकसह इतर दुकाने नियमित वेळेत सुरू राहतील. रेस्टॉरंट, मॉल्स, गार्डन, वॉकिंग ट्रेक सुरू होतील. खासगी, सरकारी कार्यालये शंभर टक्के क्षमतेने  सुरू होतील. थिएटर सुरू होतील. चित्रपट शूटिंगला परवानगी देण्यात आली आहे. सार्वजनिक कार्यक्रम, लग्न सोहळा यांना शंभर टक्के सूट दिली आहे. ई-कॉमर्स सुरू राहील. पहिल्या टप्प्यात जमावबंदी राहणार नाही. जिम, सलून सुरू राहणार आहेत. बस शंभर टक्के क्षमतेने सुरू होतील. इतर राज्यांतून येणार्‍यांवर काही निर्बंध असतील. त्याबाबतचे आदेश नंतर काढले जातील.

दुसर्‍या टप्प्यात अत्यावश्यकसह इतर दुकाने नियमित वेळेत सुरू राहतील. रेस्टॉरंट 50 टक्के क्षमतेसह सुरू होतील. मॉल्स, थिएटर्स पन्नास टक्के क्षमतेसह सुरू राहतील. सार्वजनिक जागा, मैदाने, वॉकिंग ट्रॅक पूर्ण सुरू राहतील. लग्नकार्यात हॉलच्या पन्नास टक्के क्षमता वा शंभर माणसांपेक्षा जास्त लोकांना परवानगी नाही. कार्यालयांत शंभर टक्के उपस्थिती असू शकेल. बांधकामे, कृषी कामे, ई-सेवा पूर्ण क्षमतेने सुरू राहतील. जिम, सलून, स्पा, वेलनेस सेंटर 50 टक्के क्षमतेने सुरू राहतील. बस पूर्ण क्षमतेने सुरू राहतील. जिल्ह्याच्या बाहेर खासगी कार, बसेस, लाँग ट्रेन, खासगी गाड्या, टॅक्सी यांना परवानगी आहे. तिसर्‍या टप्प्यात अत्यावश्यक दुकाने सायंकाळी चार वाजेपर्यंत सुरू राहतील. इतर दुकाने सोमवार ते शुक्रवार सायंकाळी चार वाजेपर्यंत खुली राहतील. मॉल्स आणि थिएटर्स सर्व बंद राहतील. सोमवार ते शुक्रवार हॉटेल्स 50 टक्के खुली, दुपारी 2 पर्यंत खुली राहतील. त्यानंतर पार्सल व्यवस्था असेल. ही सुविधा शनिवार-रविवार बंद राहील. मॉर्निंग वॉक, मैदाने, सायकलिंग पहाटे पाच ते सकाळी नऊ वाजेपर्यंत सुरू राहतील. खासगी आणि शासकीय कार्यालये 50 टक्के क्षमतेने सुरू. आऊटडोअर खेळ सोमवार ते शुक्रवार दरम्यान पहाटे पाच ते सकाळी नऊ वाजेपर्यंत सुरू असतील. स्टुडिओत चित्रीकरणास परवानगी; मात्र ते सोमवार ते शनिवार करता येईल. मनोरंजन कार्यक्रम 50 टक्के क्षमतेने दुपारी दोन वाजेपर्यंत खुले असतील. हे सोमवार ते शुक्रवार या वेळेत घ्यावे लागतील. लग्नसोहळे 50 लोक क्षमतेने तर अंत्यविधी 20 लोकांना उपस्थित राहण्याची मुभा असेल. बांधकाम दुपारी दोनपर्यंत सुरू ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे. शेतीविषयक सर्व कामे करता येतील. ई-कॉमर्स दुपारी दोन वाजेपर्यंत सुरू असेल. जमावबंदी आणि संचारबंदी कायम राहील. चौथ्या टप्प्यात अत्यावश्यक सेवा सायंकाळी चार वाजेपर्यंत सुरू असतील. इतर दुकाने बंदच राहतील. चित्रपटगृहे, मॉलही बंदच राहतील. रेस्तराँमध्ये फक्त पार्सललाच परवानगी असेल. सरकारी, खासगी कार्यालयांत 25 टक्के उपस्थितीसह कामकाज करता येईल. क्रीडा, मैदानांवर पहाटे पाच ते सकाळी नऊ पर्यंत आऊटडोअर गेम्स सुरू राहतील. सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रमांना परवानगी नाही. लग्न समारंभाला 25 लोकांची उपस्थिती ठेवता येणार आहे. अंत्ययात्रेला 20 लोक उपस्थित राहू शकतील. संचारबंदी लागू असणार आहे. सलून, जिम सायंकाळी चार वाजेपर्यंत 50 टक्के क्षमतेने सुरू राहणार आहेत. बस 50 टक्के क्षमतेने सुरू राहतील. पाचव्या टप्प्यात सोमवार ते शुक्रवारी अत्यावश्यक दुकाने सायंकाळी चार वाजेपर्यंत खुली राहतील. शनिवार-रविवार मेडिकल वगळता सर्वच दुकाने बंद राहतील.  रेस्टारंटमध्ये फक्त पार्सलला परवानगी. संचारबंदी लागू असेल.

वडेट्टीवारांचा गैरसमजः ठाकरे

आपत्ती व्यवस्थापन समितीची बैठक होती. त्यात दहावी-बारावी परीक्षेचा निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले. त्यात टाळेबंदी उठवण्याचे निकष सुचवण्यात आले. विजय वडेट्टीवारांचा गैरसमज झाला. त्यांना वाटले, की हा  अंतिम निर्णय आहे. त्यामुळे त्यांनी जाहीर केले; पण प्रशासनाला आढावा घेण्याची सूचना करण्यात आली होती, असे स्पष्टीकरण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.

कोणत्या टप्प्यात किती जिल्हे

पहिल्या टप्प्यात दहा जिल्हे

दुसर्‍या टप्प्यात दोन  जिल्हे

तिसर्‍या टप्पयात 15 जिल्हे

चौथ्या टप्प्यांत आठ जिल्हे

* पाचव्या टप्प्यांत एकही जिल्हा नाही

पहिल्या टप्प्यातील जिल्हे

अहमदनगर, चंद्रपूर, धुळे, गोंदिया, जळगाव, जालना, लातूर, नागपूर, नांदेड, यवतमाळ

COMMENTS