पश्चिम महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्त रूग्णांसाठी आधारवड ठरलेल्या कृष्णा हॉस्पिटलने कोरोनाच्या दुसर्या लाटेतही 1 हजार 100 हून अधिक रूग्णांना कोरोनामुक्त करत, कोरोनामुक्तीचे सहस्त्रक पूर्ण केले आहे.
1100 हून अधिक रूग्णांना डिस्चार्ज; आजअखेर 4378 रुग्ण कोरोनामुक्त
कराड / प्रतिनिधी : पश्चिम महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्त रूग्णांसाठी आधारवड ठरलेल्या कृष्णा हॉस्पिटलने कोरोनाच्या दुसर्या लाटेतही 1 हजार 100 हून अधिक रूग्णांना कोरोनामुक्त करत, कोरोनामुक्तीचे सहस्त्रक पूर्ण केले आहे. आजअखेर एकूण 4 हजार 378 रुग्ण कोरोनामुक्त करण्यात कृष्णा हॉस्पिटलला यश आले असून, कोरोनाच्या लढ्यात कृष्णा हॉस्पिटलने दिलेल्या या अथक वैद्यकीय सेवेचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.
कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कृष्णा हॉस्पिटलने प्रारंभीपासूनच कोरोनाच्या लढ्यात महत्वाचे योगदान दिले आहे. हॉस्पिटलच्या कोरोना विशेष वॉर्डमध्ये सुरू असलेल्या उपचारांमुळे 18 एप्रिल 2020 रोजी पहिल्या कोरोनाच्या रूग्णाला डिस्चार्ज देण्यात आला. त्यानंतर कृष्णा हॉस्पिटलमध्ये कोरोनामुक्तीची मालिका सुरू झाली. तज्ज्ञ डॉक्टरांच्या निगरानीखाली दिवसेंदिवस कोरोनामुक्त होणार्या रुग्णांचा आकडा वाढत आजअखेर कृष्णा हॉस्पिटलने 4 हजार 378 रुग्णांना कोरोनामुक्त केले.
याबाबत सविस्तर माहिती देताना कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले यांनी सांगितले, की गेल्या वर्षी आपण कोरोनाच्या पहिल्या लाटेचा सामना केला. यावर्षी दुसर्या लाटेचा सामना करतोय. कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट ही गंभीर स्वरूपाची आहे. या दुसर्या लाटेत जलद गतीने संक्रमण होताना आढळले. किंबहुना तरूणांमध्ये याचे संक्रमण अधिक आढळून आले. त्यातही या लाटेत सुरवातीच्या काळात रूग्णात फारशी लक्षणे दिसून येत नसल्याने, अनेकांनी गंभीर स्थिती झाल्यावर दवाखान्यात दाखल होण्याचा मार्ग पत्करलेला दिसतो. कृष्णा हॉस्पिटलमध्ये दुसर्या लाटेत आजअखेर सुमारे 1500 कोरोनाग्रस्त रूग्ण दाखल झाले. त्यापैकी 1100 कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांना डिस्जार्च देण्यात आला. तर उर्वरित रूग्णांवर उपचार सुरू आहेत.
कोरोनाच्या या दुसरा लाटेचा सामना करण्यासाठी कृष्णा हॉस्पिटलने 400 बेडचा स्वतंत्र कोरोना वॉर्ड करून, याठिकाणी ऑक्सिजन व व्हेंटीलेटर बेडची संख्याही वाढविण्यात आली आहे. इतरांप्रमाणे ऑक्सिजन, औषधे व इंजेक्शनचा तुडवडा भासला असला, तरी या आव्हानांना तोंड देत अधिकाधिक रूग्णांवर यशस्वी उपचार करण्यात कृष्णा हॉस्पिटलला यश आले आहे.
दरम्यान, यावर्षी म्युकरमायकोसिस या नव्या आजारानेही डोके वर काढले आहे. या आजाराचा प्रादुर्भाव झालेले 5 रूग्ण कृष्णा हॉस्पिटलमध्ये उपचाराचा दाखल झाले आहेत. या आजाराच्या उपचारासाठी फिजिशियन, नेत्ररोग तज्ज्ञ, कान-नाक-घसा तज्ज्ञ यांची संयुक्त टीम तयार करण्यात आली आहे. दाखल रूग्णांपैकी 3 बरे झाले असून एकावर उपचार सुरू आहेत. मात्र, या आजारावरील औषधांचा तुटवडा सध्या जाणवतोय. गेल्या काही दिवसांत दुसरी लाट ओसरत असल्याचे चित्र आहे. ही सकारात्मक बाब आहे. मात्र, तज्ज्ञांनी पुन्हा तिसर्या लाटेचा इशारा दिला आहे. या लाटेचा सामना करण्यासाठी कृष्णा हॉस्पिटल सज्ज आहे. कोरोना साथीचे गांभीर्य ओळखून रूग्णांनी स्वत:च घरात उपचार घेत न बसता, दवाखान्याशी संपर्क साधून डॉक्टरांच्या सल्ल्यानेच रूग्णालयात अथवा घरात उपचार घ्यावेत, असे आवाहन डॉ. भोसले यांनी केले आहे.
COMMENTS