बुडत्या जहाजातून उंदीरही उड्या मारतात. राजकीय नेते तर जास्त धुरंधर असतात. त्यातही काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्याच जवळचे म्हणविणारे नेतेच काँग्रेस सोडायला लागले आहेत.
बुडत्या जहाजातून उंदीरही उड्या मारतात. राजकीय नेते तर जास्त धुरंधर असतात. त्यातही काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्याच जवळचे म्हणविणारे नेतेच काँग्रेस सोडायला लागले आहेत. सोडणार्या व्यक्तीचा प्रभाव किती आणि त्यांच्या जाण्यामुळे किती परिणाम होतो, हा वेगळ्या संशोधनाचा विषय असला, तरी 136वर्षांच्या पक्षात कोणी राहते, की नाही, असा प्रश्न पडावा, अशी स्थिती झाली आहे.
राजीव गांधी आणि नरसिंह राव यांच्या अतिशय जवळचे असलेल्या आणि सोनिया गांधी यांच्याविरोधात काँग्रेसच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढविलेल्या जितेंद्र प्रसाद यांचे चिरंजीव जितीन प्रसाद यांनी काँग्रेसचा राजीनामा देऊन भाजपत प्रवेश केला. त्यांच्या भाजप प्रवेशाने भाजपचा किती फायदा होईल, यापेक्षा अगोदरच अस्तित्त्वासाठी झगडणार्या काँग्रेसला उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर तोंडावर एक चपराक बसली आहे. ज्येष्ठांनाच पदे देण्याच्या हव्यासापोटी युवक नेत्यांना काँग्रेस गमावून बसते आहे, हे काँग्रेसश्रेष्ठींच्या लक्षात येत नाही. गेल्या वर्षी ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली. त्यामुळे काँग्रेसची मध्य प्रदेशची सत्ता गेली. राजेश पायलट आणि जितेंद्र प्रसाद हे मित्र होते. तसेच जितीन प्रसाद व सचिन पायलट हे ही मित्र आहेत. सचिन पायलट यांनी गेल्या वर्षी बंड केले होते. पक्षश्रेष्ठींनी त्या वेळी मनधरणी करून बंड तात्पुरते थांबविले असले, तरी आता पुन्हा सचिन पायलट यांनी बंडाचा झेंडा हाती घेतला आहे. केंद्रीय मंत्री पियूष गोयल व भाजपचे खासदार अनिल बलूनी यांच्या उपस्थितीत प्रसाद यांना दिल्लीतील भाजपच्या कार्यालयात भाजप सदस्यत्वाची शपथ दिली. भाजपमध्ये प्रवेश घेण्याआधी जितीन यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. जितीन यांच्या भाजप प्रवेशानंतर उत्तदर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ट्वीट केले. या ट्वीटमध्ये जितीन प्रसाद यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश घेतल्याने राज्यातील भाजपची शक्ती अधिक वाढली असल्याचे म्हटले आहे. काँग्रेसमध्ये सक्रिय अध्यक्ष हवा व पक्षामध्ये संघटनात्मक पातळीवर निवडणुका व्हावी, अशी मागणी करणार्या 23 असंतुष्ट काँग्रेस नेत्यांमध्ये जितीन प्रसाद यांचे नाव होते. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना हे पत्र पाठवल्यानंतर उत्तर प्रदेश काँग्रेसमध्ये जितीन यांच्याविरोधात गटबाजी सुरू झाली होती. काही दिवसांनी उत्तर प्रदेशच्या लखीमपुर खीरी जिल्हा काँग्रेस समितीने एक प्रस्ताव मंजूर करत जितीन प्रसाद यांच्याविरोधात कारवाई करावी अशी मागणी केली होती. त्यावरही वाद झाला होता. जितीन प्रसाद हे पश्चिम उत्तर प्रदेशातील जातीय समीकरणाच्या दृष्टीने प्रभावशाली काँग्रेस नेता नव्हते. ते स्वतः सलग दोन लोकसभा निवडणुका व एक विधानसभा निवडणूक हरले होते. त्यामुळे त्यांच्या भाजप प्रवेशाचा काँग्रेसला निवडणुकांच्या दृष्टीने फारसा फरक पडेल याची शक्यता नाही; पण गेल्या तीन पिढ्या त्यांचे कुटुंब काँग्रेसशी जोडले गेले होते. भाजपमध्ये प्रवेश करताना जितीन प्रसाद यांनी भाजप हा सच्चा राष्ट्रीय पक्ष असून तो देशहितासाठी कार्यरत असल्याचा दावा केला. आपण लोकांची मदत करू शकत नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. 2004च्या लोकसभा निवडणुकांत पहिल्यांदा जितीन प्रसाद शाहजहांपूर लोकसभा मतदारसंघातून निवडून आले होते. त्या वेळी ते काँग्रेसच्या सरकारमध्ये पोलाद मंत्रालयाचे राज्यमंत्री होते. त्यानंतर 2009मध्ये त्यांनी धौरहरा मतदारसंघातून विजय मिळवला. त्यामुळे त्यांना पेट्रोलियन, नैसर्गिक वायू, रस्ते परिवहन, महामार्ग, मनुष्यबळ विकास खात्याचे राज्यमंत्रिपद मिळाले; पण 2014मध्ये त्यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव पत्करावा लागला. उत्तर प्रदेशच्या राजकारणातील एक ब्राह्मण जातीचा चेहरा म्हणून त्यांनी पुढे यायचा प्रयत्न केला होता. त्यादृष्टीने 2017 ची उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीत त्यांनी तिलहर येथून निवडणूक लढवली; पण त्या ठिकाणी त्यांना पराभव पत्करावा लागला. पुढे 2019च्या लोकसभा निवडणुकांत त्यांनी धौरहरा येथून निवडणूक लढवली, त्याही वेळेस त्यांना पराभव पत्करावा लागला होता. पराभवाची हॅटट्रीक झाल्यानंतर त्यांची पक्षात उपेक्षा व्हायला लागली. प्रियंका गांधी यांनी उत्तर प्रदेशची सूत्रे हाती घेतल्यानंतर जितीन प्रसाद यांना सापत्नभावाची वागणूक मिळते, असे वाटायला लागले. जितीन यांनी प्रियंका गांधी यांच्यामुळे काँग्रेस सोडल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. यामुळे 2022 मधील उत्तर प्रदेश निवडणुकीमध्ये काँग्रेसला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.
जितीन प्रसाद 2019 मध्येच काँग्रेस सोडून भाजपत जाणार असल्याची चर्चा होती. दोन वर्षांपासून त्यांच्या मनात एक सल होता. प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनीच समोर येत प्रसारमाध्यमांना जितीन काँग्रेस सोडत नसल्याचे सांगितले होते; परंतु काँग्रेस सोडत नसल्याचे सांगण्यासाठी जितीन कधीच समोर आले नव्हते. उत्तर प्रदेशच्या राजकारणातील एक बडे प्रस्थ म्हणून जितीन यांना ओळखले जाते; परंतु प्रियंका यांनी उत्तर प्रदेशमध्ये राजकीय हस्तक्षेपास सुरुवात केली, तेव्हाच जितीन यांच्या नाराजीची बिजे रोवली गेली होती. तेव्हापासून जितीन यांना पक्षाच्या निर्णयांमध्ये बाजूला केले जाऊ लागले होते. राहुल गांधी त्यांना जेवढे महत्व देत होते, तेवढे त्यांना मिळत नव्हते. 2019 मध्ये लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवामुळे राज बब्बर यांनी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. यानंतर जितीन प्रसाद यांना अध्यक्ष बनविण्याची चर्चा सुरू होती; मात्र प्रियंका यांनी जितीन यांना बाजूला सारून अजय लल्लूंकडे पक्षाचे नेतृत्व सोपविले होते. एवढेच नाही तर प्रसाद यांना उत्तर प्रदेशच्या निर्णयप्रक्रियेपासून दूर ठेवले जात होते. त्यांच्या जवळच्या नेत्यांनाही जिल्हा संघटनेतून बाहेरचा रस्ता दाखविण्यात आला होता. त्यामुळे अखेर जितीन यांनी कमळ हाती धरले.
COMMENTS