Homeताज्या बातम्यादेश

काँगे्रसचे बुडते जहाज

पंजाबमध्ये काँगे्रसने जहाजाच्या कॅप्टनाला पायउतार केल्यानंतर पंजाबमध्ये काँगे्रसच्या जहाजाला सावरू शकेल असा कोणताही कॅप्टन राहिलेला नाही. त्यामुळे का

महसूलमंत्री थोरात म्हणाले… सामान्य जनता काँग्रेसशी निष्ठावान व प्रामाणीक
वीजवितरण कंपनीच्या विभागिय कार्यालयात कॉंग्रेस धडकली (Video)
कोल्हापूर जिल्हापरिषद अध्‍यक्षपदी काँग्रेसची वर्णी ?LokNews24


पंजाबमध्ये काँगे्रसने जहाजाच्या कॅप्टनाला पायउतार केल्यानंतर पंजाबमध्ये काँगे्रसच्या जहाजाला सावरू शकेल असा कोणताही कॅप्टन राहिलेला नाही. त्यामुळे काँगे्रसचे पंजाबमधील जहाज कसे वाचवायचे हा प्रश्‍न काँगे्रसश्रेष्ठीसमोर उभा आहे. देशभरात मोदी लाट असतांना देखील पंजाबमधील विधानसभा निवडणूकीत भाजपचे पानीपत करण्याची ताकद असणार्‍या कॅप्टनला पदावरून दूर केल्यानंतर काँगे्रसची पंजाबमध्ये वाताहात होतांना दिसून येत आहे. जहाज बुडू लागल्यानंतर त्याला सावरणारा कॅप्टन असावा लागतो, असा कॅप्टन आता काँगे्रसजवळ नाही. त्यामुळे काँगे्रस नावाचे जहाज अजून किती जणांना घेऊन बुडणार हे आगामी काळच ठरवणार आहे.
पंजाबमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी चांगलाच जम बसवला होता. संघटनात्मक पातळीवर काँगे्रसची मोठया प्रमाणावर बांधणी त्यांनी केली होती. नवज्योतसिंग सिद्धू राजकारणात आपले अस्तित्व सिद्ध करण्यासाठी या पक्षातून त्या पक्षात जाण्याचा दोरीवर उडया मारण्यासारखा उद्योग सुरू होता. हा उद्योग काँगे्रस पक्षात प्रवेश केल्यानंतर थांबेल असे, असतांना सिद्धू यांनी अमरिंदर सिंग यांनाच शह देण्याचा प्रयत्न केला. अमरिंदर सिंग यांच्यासारख्या खमक्या माणसाने हे शह देण्याचे राजकारण मोडीत काढले. मात्र पक्षालाच आता अमरिंदर सिंग नको म्हणून, पक्षाच्या हायकमांडने सिद्धू यांना पाठबळ पुरवत सिंग यांच्याविरोधात आघाडी उघडण्यास रसद पुरवली. त्यामुळे सिद्धू यांना भावी मुख्यमंत्री म्हणून स्वप्न पडू लागले. मात्र सिद्धू यांचे पंजाबच्या राजकारणात, किंवा विकासकामांमध्ये त्यांचे अद्यापतरी योगदान नाही. त्यामुळे पंजाबची जनता त्यांना मुख्यमंत्री म्हणून स्वीकारणार नाही, याची एव्हाना सिद्धू आणि काँगे्रसच्या हायकमांडला जाणीव देखील झाली असावी.
काँगे्रसमध्ये नेत्यांची फळी राहिली नाही. त्यामुळे काँगे्रसमध्ये उभे राहणारे बंड मोडून काढण्याची कुणाची हिमंत नाही. शिवाय जे जुने-जाणते मंडळी आहेत, ती जी-23 म्हणून प्रसिद्ध झाल्यामुळे काँगे्रस नेतृत्व त्यांच्यावर विश्‍वास ठेवण्यास तयार नाही. त्यामुळे काँगे्रसचे जहाज बुडतांना दिसून येत आहे. पंजाबमध्ये खर्‍या अर्‍थानं राजकीय भूकंप होतोय की काय, अशी चर्चा आता फक्त पंजाबच नाही तर दिल्लीच्या देखील राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. काही दिवसांपूर्वी 18 सप्टेंबर रोजी पंजाबचे तत्कालीन मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी राजीनामा दिला. त्यानंतर चरणजीतसिंग चन्नी यांना मुख्यमंत्री म्हणून नियुक्त केलं. आज सकाळी पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांनी राजीनामा दिल्यानंतर आता दोनच दिवसांपूर्वी मंत्रिपदाची शपथ घेतलेल्या महिला मंत्री रजिया सुलताना यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे पंजाबमध्ये नेमके घडते काय? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. एकीकडे काँगे्रसमध्ये बंडाळी सुरू असतांना, अमरिंदर सिंग दिल्लीत दाखल होत त्यांनी भाजप नेते अमित शहा यांची भेट घेतल्यामुळे ते भाजपच्या वाटेवर असल्याचे बोलले जात आहे. सिंग जर भाजपात गेले, तर पंजाबमध्ये त्यांना मोठी ताकद मिळणार असून, काँगे्रसला आपला गड राखणे अवघड जाणार आहे.
पंजाबमध्ये काही दिवसांवर विधानसभेच्या निवडणुका येऊन ठेपल्या आहेत. अशावेळी काँगे्रस पक्षातील बंडाळी त्यांना परवडणारे नाही. त्याचा परिणाम निश्‍चित या निवडणूकांत दिसून येणार आहे. शिवाय पंजाबमध्ये 32 टक्के लोकसंख्या दलित असल्यामुळे काँग्रसने दलित मुख्यमंत्री दिला असला तरी, त्यांचा पंजाबच्या राजकारणात फारसा प्रभाव नाही. त्यामुळे काँगे्रसची गाडी पुन्हा रूळावर आणू शकतील का ? हा महत्वाचा प्रश्‍न आहे. खरेतर काँगे्रसमध्ये अलीकडच्या काळात मुरब्बी आणि मुत्सद्दी राजकारणाचा स्पष्ट अभाव दिसून येतो. काँगे्रसला आगामी विधानसभा निवडणूक अमरिंदर सिंग यांच्या नेतृत्वाखाली लढवून मग त्यांना शह देता आला असता. किंवा त्यांचे राजकीय पुनर्वसन करता आले असते. मात्र काँगे्रसने ऐन विधानसभा निवडणूकीच्या तोंडावर खेळलेली खेळी ही त्यांनाच तोंडावर पाडणारी आहे. त्यामुळे काँगे्रसने म्हणण्यापेक्षा प्रामुख्याने राहुल गांधी यांनी जुने नेते आणि नवीन उदयाला येणार्‍या नेत्यांमध्ये कुठेतरी समन्वय साधण्याची गरज आहे. अनेक दशकांपासून काँगे्रसची सेवा करणार्‍या नेत्यांना पक्षातून सोडचिठ्ठी देण्यासाठी काँगे्रसचे नेतृत्वच जर तशी खेळी खेळत असेल, तर पुढील काही वर्षात काँगेसला सावरणे अवघड होईल.

COMMENTS