Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुण्यात पोलिस भरतीत धावतांना तरूणाचा मृत्यू

पुणे : पोलिस दलात भरती होऊन वर्दी परिधान करण्याचे स्वप्न डोळ्यांत साठवून आलेल्या एका तरुणाचा मैदानी चाचणीदरम्यान मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना

१५० कोटींचा एफआरपी घोटाळा?सोलापूर-पंढरपूरमधील साखर कारखान्यांवर आरोप; पवार यांचा आंदोलनाचा इशारा
पुण्यात बालविवाहाचा गुन्हा दाखल
मंत्री भुजबळांचे हेलिकॉप्टर उतरवले वाहनतळावर;हेलिपॅडवर न उतरवल्याने संताप ; कोणतीही जीवितहानी नाही

पुणे : पोलिस दलात भरती होऊन वर्दी परिधान करण्याचे स्वप्न डोळ्यांत साठवून आलेल्या एका तरुणाचा मैदानी चाचणीदरम्यान मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना शनिवारी सकाळी शिवाजीनगर येथील पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर घडली. या घटनेमुळे भरती प्रक्रियेवर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले असून, उमेदवारांच्या आरोग्यसुरक्षेबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.
पुरुषोत्तम बारकुल (वय 23, रा. देऊळगाव राजा, जि. बुलडाणा) असे मृत तरुणाचे नाव आहे. पुणे शहर पोलिसांकडून गेल्या काही दिवसांपासून भरती प्रक्रिया सुरू असून, त्याअंतर्गत मैदानी चाचण्या घेतल्या जात आहेत. यामध्ये सोळाशे मीटर धावण्याची चाचणी हा अत्यंत महत्त्वाचा आणि कठीण टप्पा मानला जातो. शनिवारी सकाळी पुरुषोत्तम धावण्याच्या चाचणीत सहभागी झाला होता. दोन फेर्‍या पूर्ण केल्यानंतर तिसर्‍या फेरीदरम्यान त्याला अचानक झटका आला आणि तो धावत असतानाच मैदानावर कोसळला. हा प्रकार पाहून उपस्थित उमेदवार आणि पोलिस कर्मचारी यांच्यात एकच खळबळ उडाली. घटनेनंतर तात्काळ वैद्यकीय पथकाने धाव घेत त्याची तपासणी केली. प्राथमिक तपासणीत त्याचे हृदयाचे ठोके मंदावल्याचे आढळले. परिस्थिती गंभीर असल्याचे लक्षात येताच त्याला तातडीने रुग्णवाहिकेद्वारे ससून सर्वोपचार रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकार्‍यांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले. या अचानक घडलेल्या घटनेमुळे भरती प्रक्रियेत सहभागी असलेल्या इतर उमेदवारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, पुरुषोत्तमच्या अकाली निधनाने त्याच्या मूळ गावी शोककळा पसरली असून, कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अशा प्रकारच्या घटना केवळ दुर्दैवी नसून व्यवस्थेतील त्रुटीही अधोरेखित करतात. कठोर शारीरिक चाचण्या घेताना उमेदवारांची पूर्व वैद्यकीय तपासणी अधिक काटेकोरपणे होणे गरजेचे आहे. तसेच, प्रत्येक चाचणीस्थळी अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा आणि तत्पर आपत्कालीन सेवा उपलब्ध असणे अत्यावश्यक आहे.

COMMENTS